माध्यमविश्व

अजीम नवाज राही; मोहल्ल्यातून वाहणारी शब्दांची नदी

घाटबोरी, प्रतिनिधी

 

अजीम नवाज राही; मोहल्ल्यातून वाहणारी शब्दांची नदी

संतोषजनक लेखणीतून….. 

मराठी साहित्याच्या विशाल, बहुअंगी आणि सतत विस्तारत जाणाऱ्या अवकाशात काही नावे अशी असतात की ती केवळ लेखक किंवा कवी म्हणून ओळखली जात नाहीत; ती एका काळाची बनतात. एका समाजघटकाचा आवाज ठरतात आणि संघर्षशील संवेदनशीलतेचे प्रतीक बनून उभी राहतात. अशाच नावांपैकी एक नाव म्हणजे अजीम नवाज राही. हे नाव उच्चारताच शब्दांना जणू पंख फुटतात. ते चालू लागतात. काही शब्द रानात जातात, झाडांच्या सावलीत थांबतात, पानांच्या रेषांमध्ये शिरून त्यांचे जीवन अनुभवतात. काही शब्द मोहल्ल्यात शिरतात, अरुंद गल्ल्यांच्या कोपऱ्यातल्या घरांमध्ये दडपलेले दुःख उलगडतात, आणि काही शब्द उपाशी आणि थकलेल्या, स्वप्नांनी गोंधळलेल्या लेकरांच्या डोळ्यांत डोकावतात, काही शब्द थेट माणसाच्या काळजाच्या दाराशी जाऊन थांबतात. त्याच्या अंतर्मनाशी संवाद साधतात. अजीम नवाज राही हे केवळ नाव नाही; ती एक अखंड वाहणारी शब्दनदी आहे, ही नदी अनुभव, वेदना, आशा, संघर्ष आणि माणुसकी यांचा प्रवाह आपल्या वाहण्यात मिसळते. या प्रवाहात अनुभवांचे दगड आहेत, वेदनांची वाळू आहे, संघर्षाचे भोवरे आहेत आणि तरीही त्या पाण्यात माणुसकीचा गारवा आहे, जो हाताला लागताच मन शांत करतो. विचारांना दिशा देतो आणि संवेदनशीलतेला धार देतो. त्यांच्या शब्दांत सोन्याची झळाळी नाही, कारण ते सोनाराच्या दुकानातून आलेले नाहीत. त्यांच्या शब्दांत मातीचा गंध आहे, कारण ते रानातून, शिवारातून, चिखलातून, घामातून आणि अश्रूंमधून जन्माला आलेले आहेत. त्यांच्या कवितेत चकाकी नाही, पण जळजळ आहे; सजावट नाही, पण जखम आहे; गोडवा नाही, पण खरी चव आहे, जी जिभेवर टिकते आणि मनात खोलवर रुजते. अजीम नवाज राही हे शब्दांचे घर आहेत. असे घर, जिथे शब्द विसावतात, अनुभव थांबतात, आणि वेदना निर्भीडपणे बोलू लागतात. हे घर आलिशान नाही, पण आपुलकीचं आहे. तिथे खोटेपणा नाही, तिथे मुखवटे नाहीत. तिथे माणूस आहे उघडा, असुरक्षित, प्रामाणिक, आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करणारा. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शब्दात बांधण्याचा प्रयत्न करणे जणू आभाळाला मुठीत घेण्यासारखे आहे. अशा अफाट मोहल्ल्यातील शब्दसूर्याला माझ्या संतोषजनक लेखणीने जणूकाही कंदिलाचा उजेड दाखवण्यासारखा हा प्रयत्न आहे, हे माहीत असूनही करावा लागतो. काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांच्याविषयी न लिहिणे म्हणजे शब्दांशी बेईमानी करणे असते. अजीम नवाज राही हे शब्दांमध्ये सामावणारे नाहीत; उलट, शब्दच त्यांच्या व्यक्तिमत्त्वापुढे लहान पडतात. तरीही लिहावेच लागते, कारण ही वेळ असते शब्दांची कसोटी पाहण्याची आणि लेखकाच्या प्रामाणिकपणाचीही. साखरखेर्डो या मातीशी नाळ जोडलेल्या या आडवळणी गावात अजीम नवाज राही यांचा जन्म झाला. हे गाव केवळ भौगोलिक स्थान नाही; ते त्यांच्या कवितेचे मूळ आहे. त्या मातीचा रंग, त्या रानाचा वास, त्या आकाशाची रूंदी, त्या लोकांच्या डोळ्यांतली थकवा आणि आशा सगळे त्यांच्या कवितेत श्वास घेत असते. गाव, भुई, रान, माणूस, जनावरं, ऊन, पाऊस, दुष्काळ, उपासमार, संघर्ष या सर्वांनी मिळून अजीम नवाज राही घडवले आहेत. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले. कागदावर ते अपयशी ठरले असतील, पण जीवनाच्या विशाल विद्यापीठात ते पहिल्या रांगेत बसून शिकले. परिस्थितीने त्यांना लवकर मोठं केलं. दारिद्र्य, अभाव, उपेक्षा आणि संकटांनी त्यांच्या जगण्याला धार दिली. म्हणूनच त्यांच्या शब्दांना टोक आहे, त्यांच्या कवितेला धार आहे, आणि त्यांच्या वाणीला वजन आहे. हे वजन फक्त भाषेचे किंवा शब्दांचे वजन नाही; हे अनुभवांचे, वेदनेचे, संघर्षाचे आणि आयुष्याच्या तळमळीतून आलेले आहे. त्यांच्या कवितेतून दिसते की शब्द फक्त सजावटीसाठी किंवा भावनिक उंची साधण्यासाठी वापरले गेले नाहीत; प्रत्येक शब्द जिवंत आहे, अनुभवलेला आहे, आणि वाचकाच्या मनाशी गाठ घालतो. त्यांनी शब्द शाळेत शिकले नाहीत. त्यांनी शब्द पुस्तकांतून उचलले नाहीत. त्यांनी शब्द माणसांतून गोळा केले. त्यांनी पुस्तकांपेक्षा माणसं अधिक वाचली, त्यांच्या आयुष्याचा अनुभव घेतला, त्यांच्या दुःखाचे आणि आनंदाचे क्षण समजून घेतले. त्यांनी ग्रंथांपेक्षा जीवन अधिक वाचले, आणि त्यामुळेच त्यांच्या कवितेत जणू सरस्वतीचं अवतरण आहे. त्यांच्या वाणीतील प्रवाह कृत्रिम नाही; तो अनुभवातून आलेला आहे. ते बोलतात तेव्हा असे वाटते की शब्द ओठांवरून नाही, तर थेट काळजातून बाहेर पडत आहेत. त्यांच्या वक्तृत्वात दिखाऊपणा नाही, नाटकीपणा नाही. आहे ती केवळ सहजता, ओघवता प्रवाह आणि प्रामाणिक तळमळ. श्रोते त्यांच्या भाषणाला खिळून राहतात. ते बोलत नाहीत, ते संवाद साधतात. ते प्रभाव पाडत नाहीत, ते नातं निर्माण करतात. त्यांच्या कवितेतून व्यक्त होणारे दुःख वैयक्तिक नाही. ते एका माणसापुरते मर्यादित नाही. ते शेतकऱ्याच्या उभ्या पिकावर कोसळलेल्या अवकाळी पावसाचे दुःख आहे, शेतमजुराच्या हातातल्या फाटलेल्या फावड्याचे दुःख आहे, कामगाराच्या थकलेल्या श्वासांचे दुःख आहे, मोहल्ल्यातल्या अरुंद गल्लीत वाढणाऱ्या मुलांच्या स्वप्नांचे दुःख आहे. ज्यांची नावे कुठे नोंदली जात नाहीत, ज्यांचे प्रश्न कोणत्याही व्यासपीठावर पोहोचत नाहीत, अशा माणसांचे दुःख त्यांच्या कवितेतून बोलते. म्हणूनच हे दुःख सार्वत्रिक आहे आणि अजीम नवाज राही यांची कविता देखील सार्वत्रिक ठरते. मराठी कवितेच्या इतिहासात अनेक कवींनी भाषेला नवे वळण दिले. कुणी रान आणले, कुणी कारखाना, कुणी प्रेमाची नवी भाषा दिली, कुणी बंडखोरीचा सूर दिला. पण अजीम नवाज राही यांनी मराठी कवितेला ‘मोहल्ला’ दिला. हा मोहल्ला केवळ भौगोलिक नाही. तो सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे, भावनिक आहे. तो माणसाच्या नात्यांचा गुंता उलगडणारा आहे. त्यांच्या कवितेतली बोलीभाषा कृत्रिम नाही; ती त्यांच्या आयुष्यातून, त्यांच्या बालपणातून, त्यांच्या आसपासच्या जग्यातून, त्यांच्या रोजच्या श्वासातून आलेली आहे.
अजीम नवाज राही हे लेखणी आणि वाणी या दोन्ही क्षेत्रांत तितकेच प्रभावी आहेत. अनेकांना लिहिता येते पण बोलता येत नाही; अनेकांना बोलता येते पण लिहिता येत नाही. राही या दोन्ही गडांवर झेंडा रोवून उभे आहेत. निवेदक म्हणून, वक्ता म्हणून, सूत्रसंचालक म्हणून त्यांनी राज्यभरातील श्रोत्यांच्या मनावर गारुड घातले आहे. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला केवळ शोभा नाही तर आत्मा, गांभीर्य आणि अर्थ प्राप्त होतो. ते मंचावर येतात तेव्हा सर्वत्र एक संवेदनशील, जागरूक आणि जागृत वातावरण निर्माण होते.
त्यांचे कवितासंग्रह हे फक्त साहित्यिक निर्मिती नाही; ते काळाचे दस्तऐवज आहेत. त्यांच्या कवितेतून व्यवहार, एकांत, वर्तमान, तळमळ हे सर्व बोलतात. त्यांच्या कवितेत वस्तुनिष्ठता आहे, सच्चाई आहे, आणि अनुभवांची खोल उतरंड आहे. प्रतिमांची घनदाट रचना, मातीचा सुवास घेऊन आलेली भाषा आणि स्वतःची खास शब्दकळा ही त्यांच्या कवितेची मोठी ताकद आहे. त्यांनी कोणत्याही लोकप्रिय किंवा पारंपारिक वाटेने चालण्याऐवजी स्वतःची वाट तयार केली, आणि त्या वाटेवरून चालत मराठी कवितेवर आपली नाममुद्रा ठसठशीत उमटवली. पुरस्कार त्यांच्या वाट्याला आले, पण पुरस्कार कधीच त्यांच्या डोक्यावर चढले नाहीत. उलट, पुरस्कारांनी त्यांना अधिक जबाबदार बनवलं. कारण त्यांच्या दृष्टीने खरा पुरस्कार म्हणजे वाचकांच्या मनात मिळालेली जागा. दहावी नापास झालेला कवी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात शिकवला जातो हे प्रतिभेचं उदाहरण आहे, पण ते संघर्षाचं, जिद्दीचं आणि प्रामाणिकपणाचं साक्षही आहे. उर्दू माध्यमातून मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात येणारा प्रवास सोपा नव्हता, पण त्यांनी कधीही उथळपणा स्वीकारला नाही. ते जे जगले तेच लिहिले. जगणे आणि लिहिणे यामध्ये त्यांनी कधीही अंतर ठेवले नाही. अजीम नवाज राहींच्या कवितेतून जगण्याची एक वेगळी भाषा उलगडते एक अशी भाषा, जिथे शब्द आणि अनुभव यांमध्ये कोणतीही दरी नाही.
त्यांनी अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन समाजाला, माणसाला, त्यांच्या भावनांना आणि त्यांच्या दु:खांना स्थान दिले. त्यांच्या कवितेतून लोकांच्या छोट्या छोट्या समस्या मोठ्या ऊर्जा आणि स्पष्टतेने मांडल्या जातात. त्यांनी कविता केली नाही, त्यांनी संवाद साधला आहे. त्यांच्या कवितेतून वाचकाला वाटतं की ती फक्त वाचायची नाही तर आत्मसात करायची आहे. त्यांच्या कवितेतून जगण्याची खरी भाषा उमटते एक अशी भाषा जी दुःख, संघर्ष, आशा, प्रेम, सामूहिक दुःख आणि सामूहिक आनंद सगळ्याला समर्पित आहे. ते जेव्हा लिहितात, तेव्हा त्यांच्या शब्दांचा प्रवाह इतका स्वच्छ आणि स्पष्ट असतो की वाचकाला प्रत्येक शब्दाची प्रतिज्ञा जाणवते. त्यांच्या लेखनात कोई अतिशयोक्ति नाही; प्रत्येक शब्द वास्तविकतेशी निगडित आहे. त्यांच्या कवितेतून जाणवणारी वेदना, अस्तित्वाची तळमळ, लोकांच्या हक्कांचा आवाज आणि मानवी भावना हे सर्व त्यांच्या शब्दांत अशी मिसळलेले आहेत की त्यांचे लेखन फक्त वाचण्यासारखं नाही; ते अनुभवण्यासारखं आहे. अजीम नवाज राहींची कविता फक्त काव्यात्मक लेखन नाही; ती समाजाचा आरसा आहे. त्यांनी समाजातल्या दुर्लक्षित, उपेक्षित आणि दुर्बल वर्गांना आवाज दिला आहे. त्यांच्या कवितेतून लोकांच्या स्वप्नांना आवाज मिळाला, त्यांच्या भीतींना शब्द मिळाले, त्यांच्या आशांना दिशा मिळाली. त्यांच्या कवितेतून माणूस अधिक संवेदनशील, जागरूक आणि जबाबदार होतो. अजीम नवाज राही; जेव्हा तुम्ही त्यांच्या नावाचा उच्चार करता, तेव्हा शब्द नुसते ओळखले जात नाहीत, ते जणू जीवंत होतात, उडतात, ओढतात, भिडतात, आणि निसर्ग, माणूस आणि जगाच्या वेदनांमध्ये मिसळतात. त्यांच्या कवितेतून जाणवते की शब्द हे फक्त अक्षरे नाहीत, तर अनुभवांचा, संघर्षांचा, आशेचा आणि माणुसकीचा प्रवाह आहेत. त्यांची कविता म्हणजे नदी आहे, जी प्रत्येक वळणावर काही नवीन सांगते, काही नवीन उमलते, काही जुन्या दुःखाला स्मरण करते, आणि काही नव्या आशेला जन्म देते. ही नदी थांबत नाही, कुठे जाऊन कुठे पोहोचते याची पर्वा करत नाही. ती फक्त वाहते…अखंड, प्रामाणिक, आणि माणुसकीने भरलेली.

———————————————————————–

अजीम नवाज राही यांच्या प्रतिभेचा झेंडा आज मराठी साहित्याच्या दोन समर्थ गडांवर लेखन आणि निवेदन, अभिमानाने फडकतो आहे. शब्दांच्या रणांगणात आणि स्वरांच्या अवकाशात समान ताकदीने वावरणारी ही प्रतिभा काळाच्या कपाळावर आपली स्पष्ट रेघ ओढते. व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत, वर्तमानाचा वतनदार, तळमळीचा तळ आणि अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव तर्फे अलीकडेच प्रकाशित झालेला वळीवाच्या वेळा, हे पाचही कवितासंग्रह आशयघनतेचा, वास्तवाच्या जाणिवेचा आणि संवेदनशील अभिव्यक्तीचा सघन पट उलगडतात. अजीम नवाज राही हे नाव म्हणजे नवसर्जनाची धग, प्रयोगशीलतेची धाडसपूर्ण वाटचाल आणि समकालीन मराठी कवितेला नवी दिशा देणारा एक जागता शब्दप्रवाह.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका