
अभिष्टचिंतन…
विष्णूभाऊ वाकळे : पडद्याआड उभं असलेलं माणुसकीचं विद्यापीठ
काही व्यक्तिमत्त्वे ही गर्दीत दिसत नाहीत किंवा आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांसारखी नसतात की त्यांचा झगमगाट दूरवरून दिसेल; ती तर मातीच्या गाभाऱ्यात शांतपणे रुजलेल्या त्या वटवृक्षासारखी असतात, ज्यांच्या अस्तित्वाची जाणीव उन्हाच्या तडाख्यात सावली शोधताना होते. त्यांच्या नावाचा गजर होत नाही, त्यांच्या कार्याचे मोठमोठे फलक लागत नाहीत; पण काळाच्या प्रत्येक कठीण वळणावर त्यांची साथ एखाद्या निःशब्द आधारासारखी जाणवत राहते. ही माणसं स्वतःसाठी जगत नाहीत; ती दुसऱ्यांच्या आयुष्याला उभारी देण्यासाठी जगत असतात. स्वतःच्या वेदना मनात दडवून दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी, स्वतः अंधारात राहून इतरांच्या वाटा उजळवणारी आणि संकटात न बोलता खांद्यावर हात ठेवून “मी आहे…” असा विश्वास देणारी ही माणसं समाजाची खरी संपत्ती असतात.
वादळं जेव्हा प्रचंड वेगाने धावत असतात, तेव्हा अनेक झाडं क्षणात कोसळून जातात; पण एखादा विशाल वटवृक्ष मात्र शांतपणे उभा राहतो. तो स्वतः वादळाचे घाव सहन करतो; पण आपल्या छायेखाली उभ्या असंख्य जीवांना सुरक्षित ठेवतो. त्याच्या मुळांची ताकद वरून दिसत नाही; पण त्याच मुळांवर अनेकांचे आयुष्य उभे असते. समाजातही काही माणसं अशीच असतात. पडद्याआड राहणारी, पण अनेकांच्या आयुष्याचा अदृश्य आधार बनणारी. स्वतःच्या कर्तृत्वाचा गवगवा न करता शांतपणे इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारी. अशाच सावलीसारख्या, विशाल मनाच्या आणि निस्वार्थ माणुसकी जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे नाव म्हणजे विष्णूभाऊ वाकळे.
मेहकर तालुक्याच्या सामाजिक, वैचारिक आणि माणुसकीच्या विश्वात हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. कारण विष्णूभाऊ हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नाहीत; ते एक विचार आहेत, एक संस्कार आहेत आणि नात्यांना जपण्याची एक जिवंत शाळा आहेत. त्यांच्या सहवासात माणूस नकळत माणुसकी शिकतो. त्यांच्याकडे पाहताना जाणवतं की खरा मोठेपणा हा पदात नसतो, प्रसिद्धीत नसतो; तर माणसं जोडण्यात असतो. आजच्या स्वार्थी आणि दिखाऊ युगात जिथे नाती व्यवहारापुरती मर्यादित होत चालली आहेत, तिथे विष्णूभाऊंसारखी माणसं अजूनही नात्यांना आत्म्याची ऊब देत आहेत.
आज जिल्हाभर “माणसं जोडणारा सेतू” म्हणून ओळख निर्माण केलेले काँग्रेसचे तालुका समन्वयक देवानंद पवार यांच्या आयुष्याच्या प्रत्येक संघर्षात, प्रत्येक यशात आणि प्रत्येक भावनिक वळणावर जर कोणीतरी निस्वार्थपणे खंबीर उभे राहिले असेल, तर ते आर्दश शिक्षक विष्णूभाऊ वाकळे. कारण प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एक असा माणूस असतो, जो स्वतः प्रकाशझोतात येत नाही; पण त्या व्यक्तीच्या आयुष्याचा अदृश्य कणा बनून उभा राहतो. यशाचा गजर होत असताना पडद्यामागे शांतपणे उभा राहून टाळ्यांचा आवाज ऐकणारा माणूस फार मोठा असतो. विष्णूभाऊ हे असेच नात्यांना जपणारे, भावनांना समजून घेणारे आणि संकटात ढाल बनून उभे राहणारे व्यक्तिमत्त्व आहेत.
आजच्या काळात मैत्रीचे अर्थ बदलले आहेत. नाती आता अनेकदा उपयोगापुरती उरली आहेत. सुखात सोबत करणारे अनेक भेटतात; पण दुःखाच्या अंधारात न बोलता हात धरून उभे राहणारे फार थोडे असतात. आयुष्याच्या कठीण क्षणी शब्दांची गरज नसते; गरज असते ती विश्वासाच्या सावलीची. विष्णूभाऊ अनेकांच्या आयुष्यात अशीच विश्वासाची सावली बनून उभे राहिले. त्यांनी कधी कोणाला उपकारांची जाणीव करून दिली नाही; उलट संकटात माणसाला उभं करण्याचं सामर्थ्य दिलं. त्यांच्या एका शब्दाने खचलेला माणूस पुन्हा उभा राहतो, त्यांच्या एका स्पर्शाने निराश मनात नव्या आशेचा किरण जागा होतो.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक विलक्षण शांतता आहे. चेहऱ्यावर कमालीचा साधेपणा, नजरेत प्रामाणिकपणा आणि विचारांत अफाट प्रगल्भता दिसून येते. ते बोलतात कमी; पण त्यांच्या प्रत्येक शब्दात अनुभवाची खोली आणि माणुसकीची ऊब असते. त्यांच्या सहवासात माणूस स्वतःकडे नव्या नजरेने पाहू लागतो. कारण विष्णूभाऊंकडे अनुभवांचे, विचारांचे आणि संस्कारांचे एक स्वतंत्र विद्यापीठ आहे. त्यांच्या शब्दांमध्ये दिखाऊपणा नसतो; पण त्यात आयुष्य जगण्याचं शहाणपण असतं. त्यांनी आयुष्य फक्त जगले नाही; तर ते समजून घेतले आहे.
पतसंस्थेचे कार्य असो, पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील वास्तव मांडण्याचे कार्य असो किंवा विद्यार्थ्यांना ज्ञानाचे संस्कार देण्याचे पवित्र कार्य असो, विष्णूभाऊंनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांनी कधी प्रसिद्धीची अपेक्षा ठेवली नाही, ना स्वतःच्या कार्याचा गवगवा केला. त्यांनी फक्त माणसं जोडली, नाती जपली आणि आपल्या शांत स्वभावातून अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. त्यांनी जिथे पाऊल ठेवलं, तिथे विश्वास निर्माण झाला; त्यांनी ज्या माणसाला स्पर्श केला, त्याच्या आयुष्यात आत्मीयतेचा प्रकाश निर्माण झाला.
पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी समाजातील वास्तवाला स्पर्श केला. समाजातील वेदना, सामान्य माणसाच्या समस्या, ग्रामीण भागातील संघर्ष आणि दुर्लक्षित प्रश्न यांना त्यांनी संवेदनशीलतेने शब्द दिले. त्यांची लेखणी ही केवळ अक्षरांची नव्हती; ती समाजाच्या वेदनांना आवाज देणारी आहे. त्यांनी कधीही खोटेपणाला खतपाणी घातले नाही. सत्य मांडण्याची ताकद आणि अन्यायाविरोधात उभं राहण्याची वृत्ती त्यांच्या विचारांत ठामपणे दिसून येते.
विद्यार्थ्यांबद्दल त्यांना असलेली आपुलकी ही विशेष उल्लेखनीय आहे. शिक्षण ही केवळ पदवी मिळवण्याची प्रक्रिया नसून संस्कार घडवण्याचं माध्यम आहे, हा विचार त्यांनी कायम जपला. त्यांच्या सहवासात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकांचं ज्ञान नाही, तर आयुष्य जगण्याचं शहाणपण शिकले. त्यांच्या शब्दांत प्रेरणा असते, विचारांत सकारात्मकता असते आणि व्यक्तिमत्त्वात विश्वास निर्माण करण्याची विलक्षण ताकद असते.
त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा केवळ एका व्यक्तीचा प्रवास नाही; तो मूल्यांचा, विचारांचा आणि माणुसकीचा प्रवास आहे. त्यांनी समाजात राहून माणसांना फक्त ओळखले नाही; तर त्यांना मनापासून जपले. म्हणूनच त्यांच्या सभोवताली निर्माण झालेली नाती ही औपचारिक नाहीत; ती आत्मीयतेने ओथंबलेली आहेत. त्यांच्या सहवासात माणसाला स्वतःच्या अस्तित्वाची किंमत जाणवते. कारण ते माणसांकडे फक्त चेहऱ्याने पाहत नाहीत; तर मनाने पाहतात.
विष्णूभाऊंच्या आयुष्यातील सर्वात मोठं यश म्हणजे त्यांनी उभारलेलं सुंदर कुटुंब. आपल्या कर्माची गोड फळं त्यांच्या संसारात फुलताना दिसतात. मोठा मुलगा राज्यसेवेतून आरोग्य विभागात कार्यरत आहे, तर छोटा विशाल नावालाच छोटा; पण कर्तृत्वाने मोठा ठरत महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. दीदी बी.सी.ए.चे शिक्षण घेत आहे. हे सगळं पाहताना त्यांचा संसार एखाद्या गोकुळासारखा वाटतो परिपूर्ण, समृद्ध आणि संस्कारांनी भरलेला. कारण ज्या घरात मूल्यांची पेरणी होते, तिथे यशाची फळं आपोआप उमलतात.
एखाद्या व्यक्तीची खरी संपत्ती ही त्याच्या बँक खात्यात नसते; ती त्याने कमावलेल्या माणसांमध्ये असते. विष्णूभाऊंनी आयुष्यभर माणसं कमावली. त्यांनी नात्यांमध्ये विश्वास कमावला. म्हणूनच आज त्यांच्या नावाचा उच्चार झाला की लोकांच्या चेहऱ्यावर आदर दिसतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दांभिकपणा नाही, दिखाऊपणा नाही; आहे ती फक्त माणुसकीची नितांत ओल.
वृत्तीने अत्यंत संयमी, विचाराने शुद्ध आणि विवेकवाद व विज्ञानवादाचा अंगीकार करणारे विष्णूभाऊ हे आधुनिक विचारांचे प्रतिनिधित्व करणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी कधी अंधश्रद्धेला खतपाणी घातले नाही, ना खोट्या प्रतिष्ठेच्या मागे धाव घेतली. त्यांनी नेहमीच सत्य, प्रामाणिकपणा आणि माणुसकीला सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या विचारांत आधुनिकता आहे; पण त्या आधुनिकतेला संस्कारांची आणि विवेकाची जोड आहे. म्हणूनच त्यांचे विचार माणसाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात.
आज समाजाला अशा माणसांची गरज आहे, जी माणसांना तोडत नाहीत; तर जोडतात. जी प्रसिद्धीपेक्षा नात्यांना महत्त्व देतात. जी स्वार्थापेक्षा माणुसकी जपतात. विष्णूभाऊ वाकळे हे अशाच विचारांचे जिवंत प्रतीक आहेत. ते स्वतः शांत राहतात; पण इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करत राहतात. त्यांच्या अस्तित्वामुळे अजूनही माणुसकी जिवंत असल्याची जाणीव होते.
आजच्या वेगवान जगात माणूस यशाच्या मागे धावत आहे; पण त्या धावपळीत तो नाती, माणुसकी आणि आत्मीयता हरवत चालला आहे. अशा वेळी विष्णूभाऊंसारखी व्यक्तिमत्त्वे आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतात. ती शिकवतात की आयुष्य मोठं होण्यासाठी पदाची गरज नसते; मोठं मन असावं लागतं. माणसाला जिंकण्यासाठी पैशांची गरज नसते; प्रेमाची गरज असते. आणि समाजात आदर मिळवण्यासाठी प्रसिद्धीची गरज नसते; प्रामाणिकपणे माणसं जपण्याची गरज असते.
आपल्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनाच्या या मंगलक्षणी मन अगदी भावनांनी ओलावून जाते. शब्द अपुरे पडतात, विचार थबकतात आणि मन आदराने नतमस्तक होते. आपल्यासाठी एवढंच म्हणावंसं वाटतं,
“अशी सृजनशील साहसे हवी आहेत जी बीज पेरून वाट पाहू शकतील… भान ठेवून योजना आखतील आणि बेभान होऊन त्या अमलात आणतील… कारण पंखांना क्षितिज नसतं; असतं ते झेपेच्या कवेत मावणारं आकाश…!”
त्या विशाल आकाशात विहंगासारखी मुक्त झेप घेण्याचं सामर्थ्य परमेश्वराने आपणास सदैव द्यावं, आपल्या विचारांचा प्रकाश असाच अनेकांच्या आयुष्याला दिशा देत राहावा आणि आपल्या सावलीत अजून असंख्य माणसांना माणुसकीची ऊब मिळत राहावी, हीच मनःपूर्वक प्रार्थना…!
पडद्याआड राहून दुसऱ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या, संकटात सावलीसारखे उभे राहणाऱ्या, निस्वार्थ मैत्रीचा खरा अर्थ जगणाऱ्या आणि माणुसकीला आयुष्याचं सर्वोच्च मूल्य मानणाऱ्या त्या विशाल मनाच्या व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक अभिवादन आणि कोटी कोटी शुभेच्छा…!
——————————————–
संतोष अवसरमोल
मु.पो.घाटबोरी, ता. मेहकर
मो:-9689777129



