विद्यार्थ्यांनो, सुजाण नागरिक बना; सायबर गुन्ह्यांविरोधात जागरूक राहा : ठाणेदार शरदजी माळी
घाटबोरी, प्रतिनिधी

विद्यार्थ्यांनो, सुजाण नागरिक बना; सायबर गुन्ह्यांविरोधात जागरूक राहा : ठाणेदार शरदजी माळी
“आजचे विद्यार्थी हे उद्याचे राष्ट्रनिर्माते आहेत. सुजाण विचारसरणी, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवा. आपल्या अंगभूत गुणांना वाव देत मोठी स्वप्ने पाहा आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करा. त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक राहून समाजमाध्यमांचा जबाबदारीने वापर करा. ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करत डिजिटल युगात जबाबदार नागरिक म्हणून भूमिका बजावा आणि आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करा,” असे आवाहन जानेफळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार शरदजी माळी यांनी केले.
स्थानिक श्री सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जानेफळ येथे सायबर गुन्हे प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास धामोडकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ठाणेदार शरद माळी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर सुरक्षेच्या विविध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे संचालक संतोषभाऊ तोंडे, प्रवीणभाऊ रेदासनी, सरस्वती कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मीनल जोहरे, उपप्राचार्य प्रा. डॉ. शिवाजीराव म्हस्के तसेच पर्यवेक्षक विष्णू गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी जानेफळ पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले ठाणेदार शरदजी माळी यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सरस्वती परिवाराच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचा यथोचित सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक संतोषभाऊ तोंडे यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना ठाणेदार शरदजी माळी यांनी “Aim Low is Crime” हा प्रेरणादायी संदेश देत विद्यार्थ्यांना आयुष्यात नेहमी मोठे ध्येय ठेवण्याचा आणि ते साध्य करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. सायबर गुन्ह्यांचे बदलते स्वरूप, ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या विविध क्लुप्त्या, मोबाईल व इंटरनेटद्वारे वैयक्तिक माहितीची होणारी चोरी तसेच डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची आवश्यक खबरदारी याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. समाजमाध्यमांवर प्रसारित होणारे भडक, दिशाभूल करणारे किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेश कोणतीही शहानिशा न करता पुढे पाठवू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. अशा संदेशांकडे दुर्लक्ष करून ते त्वरित हटवावेत आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जागरूकता, संयम आणि डिजिटल साक्षरता हीच सर्वात प्रभावी ढाल असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
ठाणेदार शरद माळी यांच्या अभ्यासपूर्ण, प्रभावी आणि संवादात्मक मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत नवी दिशा मिळाली. उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी त्यांच्या मार्गदर्शनाचे उत्स्फूर्त स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कृष्णा हावरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. शिवाजीराव म्हस्के यांनी मानले.



