पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!
घाटबोरी, प्रतिनिधी

पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!
घाटबोरीत विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप; वृक्षारोपण
वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा सोहळा नसतो, तर समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करून विधायक कार्याची नवी वाट उजळविण्याची संधी असते. या विचाराला कृतीची जोड देत उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त घाटबोरी येथे शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. पत्रकार संतोष अवसरमोल यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात घाटबोरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले. शिक्षणासाठी आवश्यक साहित्य हाती पडताच चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य हा या कार्यक्रमाचा सर्वात मोठा सन्मान ठरला.
ज्ञानाची ओढ वाढावी, शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नांना बळ मिळावे, या उदात्त हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत भविष्याची नवी स्वप्ने आणि हातात शिक्षणाची साधने देण्याचा हा प्रयत्न उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख राजूभाऊ शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डोणगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश इंगोले, पत्रकार संतोष अवसरमोल, सरपंच राजू पाखरे, संस्थाचालक संतोष डोंबळे, राजूपाटील नवले, शंकर गिरी, आकाश नवले, देवराव नवले तसेच मुख्याध्यापक प्रमोद देशमुख यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही व पेनचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक आणि ग्रामस्थांचीही उल्लेखनीय उपस्थिती लाभली.
यावेळी मार्गदर्शन करताना डोणगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश इंगोले म्हणाले, “वाढदिवस हा केवळ शुभेच्छा स्वीकारण्याचा किंवा उत्सव साजरा करण्याचा दिवस नसून समाजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि काहीतरी विधायक कार्य करण्याची संधी असते. विद्यार्थ्यांना वही-पेनसारखे शैक्षणिक साहित्य देणे म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्यात आशेचा एक दिवा प्रज्वलित करण्यासारखे आहे. शिक्षण हीच समाजपरिवर्तनाची सर्वात प्रभावी ताकद असून प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची समान संधी मिळणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत.
वृक्षारोपण हा केवळ एक उपक्रम नसून भावी पिढीला हिरवाईचा आणि शाश्वत विकासाचा अमूल्य वारसा देण्याचा संकल्प आहे.
पत्रकार संतोष अवसरमोल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप आणि वृक्षारोपणासारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याचा एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे. अशा विधायक उपक्रमांमधून समाजात सकारात्मक विचारांची पेरणी होते आणि इतरांनाही समाजकार्यासाठी प्रेरणा मिळते. असे प्रतिपादन ठाणेदार गणेश इंगोले यांनी केले. यावेळी पत्रकार संतोष अवसरमोल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या कर्तव्यनिष्ठ, संवेदनशील आणि लोकाभिमुख कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. समाजात कायद्याबाबत जनजागृती करण्याबरोबरच शिक्षण, संस्कार आणि सामाजिक मूल्ये जोपासत विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहून नियमित अभ्यास, वाचन करावे असे आवाहन त्यांनी करत सर्वांसाठी दुआ मागीतली. कार्यक्रमानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, घाटबोरी विद्यालयाच्या परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले. लावलेले वृक्ष जगविण्याची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे असे आवाहन यावेळी करण्यात आले.विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



