प्रा. डॉ. किशोर काकडे : संशोधन, अध्यापन आणि शैक्षणिक नेतृत्वाचा प्रेरणादायी प्रवास
घाटबोरी, प्रतिनिधी

प्रा. डॉ. किशोर काकडे : संशोधन, अध्यापन आणि शैक्षणिक नेतृत्वाचा प्रेरणादायी प्रवास
ज्ञानसाधनेच्या अखंड प्रवाहाला संशोधनाची तेजस्वी ऊर्जा लाभते आणि शैक्षणिक नेतृत्वाला समाजभानाची खोल जाण जोडली जाते, तेव्हा एक साधा अध्यापक नव्हे तर प्रेरणादायी शिक्षक घडतो. अशा विलक्षण व्यक्तिमत्वाचे प्रतीक म्हणून महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रात अध्यापन आणि संशोधन या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणारे नाव म्हणजे प्रा. डॉ. किशोर पंढरीनाथ काकडे. इलेक्ट्रॉनिक्स विषयातील अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक, म्हणून त्यांनी जवळपास 33 वर्षे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय आणि दिशादर्शक कार्य केले आहे. या दीर्घ प्रवासात त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला ज्ञानाचा प्रकाश, विचारांची दिशा आणि यशाचा आत्मविश्वास प्रदान केला आहे. दि.१ जुलै १९६६ रोजी जन्मलेल्या डॉ. किशोर काकडे यांनी अमरावती विद्यापीठातून १९८९ साली बी.एस्सी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९९१ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स विषयात एम.एस्सी. पूर्ण केले. त्यानंतर सेट आणि नेट परीक्षा उत्तीर्ण केली. संशोधन क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करत त्यांनी २००८ मध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून “ऑप्टिकल फायबर बेस्ड केमिकल सेन्सर्स फॉर रिमोट सेन्सिंग ” या विषयावर पीएच.डी. संपादन केली. अध्यापनातील मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. डॉ. काकडे यांनी १९९३ पासून अध्यापन क्षेत्रात कार्य सुरू केले. लोणंद जि सातारा, पुणे, मोखाडा जि पालघर, कोपरगाव जि. अहमदनगर, विटा जि सांगली आणि पंढरपूर जि सोलापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली. दरम्यान यातील काही महाविद्यालयांमध्ये त्यांनी प्राचार्य आणि उपप्राचार्य म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या. रयत शिक्षण संस्थेच्या पुण्यातील एस. एम. जोशी महाविद्यालयात ते उपप्राचार्य म्हणून कार्यरत होते. नियत वयोमानानुसार ते 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. डॉ. काकडे यांचे संशोधन प्रामुख्याने ऑप्टिकल फायबर संदर्भात आहे. त्यांचे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये ३१ संशोधन लेख प्रकाशित केले आहेत. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ४२ संशोधन निबंध सादर केले आहेत. संशोधन प्रकल्प त्यांनी यूजीसी, पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि एस. एम. जोशी महाविद्यालयाच्या संशोधन निधीतून अनेक संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यामध्ये विषारी वायू शोधण्यासाठी सेन्सर, रासायनिक सेन्सर आणि नॅनो मटेरियल्सवरील संशोधनाचा समावेश आहे. २०२४ मध्ये डॉ. काकडे यांच्या नावावर दोन पेटंट प्रकाशित झाली आहेत. ही पेटंट्स त्यांच्या संशोधन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कार्याची साक्ष देतात. प्राचार्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयामध्ये शैक्षणिक आणि भौतिक विकासाची कामे केली. महाविद्यालयांच्या नॅक मूल्यांकन प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत महाविद्यालयाना उत्कृष्ट श्रेणी प्राप्त करून दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण झाले. संगणकीकरण आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्या.
विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्रे सुरू करण्यात आली.
संशोधन संस्कृतीला चालना मिळाली.
शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यात महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०१६ सोबतच आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वोत्कृष्ट संशोधन निबंध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. डॉ. काकडे हे केवळ संशोधक नाहीत तर विद्यार्थी घडविणारे शिक्षक आहेत. संशोधनाची आवड, वैज्ञानिक दृष्टिकोन, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याची हातोटी व आपल्या कामाप्रति प्रामाणिकता यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. प्रतिकुल
पार्श्वभूमीतून पुढे येत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाचा ठसा उमटविणारे प्रा. डॉ. किशोर पंढरीनाथ काकडे हे महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे. अध्यापन, संशोधन आणि शैक्षणिक प्रशासन यांचा सुंदर संगम त्यांच्या कार्यात दिसून येतो. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना संशोधनाची प्रेरणा मिळाली असून शिक्षण क्षेत्र समृद्ध झाले आहे. “ज्ञान, संशोधन आणि समाजहित यांचा समन्वय साधणारा शिक्षक” अशीच डॉ. किशोर काकडे यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांचे वडील पोलीस खात्यात नोकरीला होते. वडिलांच्या नोकरीनिमित्त वेगवेगळ्या गावी बदल्या होत. त्यामुळे डॉ. किशोर काकडे यांना वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घ्यावे लागले. नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले. पोलीसांच्या छोट्याश्या निवासी सदनिकेत अभावग्रस्त परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. पोलीस कॉलनीतला भवताल बिघडवून टाकणारा होता. मात्र त्यापासून स्वतः ला जाणीवपूर्वक दूर ठेवत त्यांनी शिक्षणाची कास धरली. त्यांच्या या वाटेवर चालत धाकट्या भावंडानी सुद्धा शिक्षण घेत स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. अतिशय नम्र स्वरूपाचा त्यांचा स्वभाव आहे. आपल्या नोकरीच्या काळात असंख्य व्यक्ती आणि सामाजिक उपक्रमांना त्यांनी मदत केली आहे. त्यांच्या निवृत्तीनंतरच्या भविष्यकालीन वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
— रवींद्र साळवे,
साथी 20, सहजीवन सोसायटी, खामगाव रोड, सुंदरखेड बुलढाणा
मो. 9822262003



