ताजे अपडेट

‘रक्ताच्या नात्यापलिकडे’: ॲड. माधुरी पवार आणि वयोवृद्ध आजीच्या माणुसकीचा जिव्हाळा !

घाटबोरी, प्रतिनिधी

 

रक्ताच्या नात्यापलिकडे’: ॲड. माधुरी पवार आणि वयोवृद्ध आजीच्या माणुसकीचा जिव्हाळा !

आयुष्यात काही घटना अशा घडतात की त्या काळाच्या ओघात विसरल्या जात नाहीत; उलट, त्या मनाच्या गाभाऱ्यात अधिक ठळकपणे कोरल्या जातात. माणूस कितीही विसरण्याचा प्रयत्न केला, तरी त्या आठवणी पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर उभ्या राहतात. मनाला हळवं करतात, काही घटना इतक्या खोलवर मनाला स्पर्श करतात की त्या माणसाच्या मनात कायमचं घर करून बसतात. असे क्षण आपल्याला थांबवतात, अंतर्मुख करतात आणि प्रश्न विचारायला भाग पाडतात आपण खरंच कशासाठी जगतो, आणि माणूस म्हणून आपली खरी जबाबदारी काय आहे? काही माणसं, काही ठिकाणं आणि काही अनुभव मनाला उभारी देतात, जगण्याला नवी दिशा देतात. अशा आठवणींमध्ये कधी अभिमान दाटून येतो, तर कधी डोळ्यांच्या कडा नकळत ओलावतात. कारण त्या क्षणांत फक्त भावना नसतात, तर माणुसकीचा खोलवर भिडणारा स्पर्श असतो. इतिहासात दानशूर कर्णाचं नाव आजही आदराने घेतलं जातं. सकाळच्या आंघोळीनंतर कर्णाकडे जे काही मागितलं जात असे, ते तो आनंदाने देत असे, असं सांगितलं जातं. त्याच्या उदार स्वभावामुळे तो अजरामर झाला. हे जरी खरे असले तरी पण दानधर्म म्हणजे केवळ धन देणं नव्हे.तर, कुणाच्या डोक्यावर मायेचा हात ठेवणं, कुणाच्या अश्रूंना शब्दांशिवाय उत्तर देणं, कुणाच्या आयुष्यात हरवलेला आत्मसन्मान परत मिळवून देणं, हे दानाचं सर्वात श्रेष्ठ आणि मानवी रूप असतं. आजच्या काळातही अशी काही माणसं आहेत जी कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीपासून दूर राहून, शांतपणे समाजासाठी झटत राहतात. त्यांच्या कार्याचा गवगवा नसतो, पण त्यांच्या कृती अनेक हृदयांवर खोलवर उमटतात. अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक नाव म्हणजे मेहकर तालुक्यातील जानेफळ सर्कलच्या समाजसेविका ॲड. माधुरी देवानंद पवार. त्यांचं कार्य फक्त उपक्रमांच्या यादीत मोजता येणारं नाही, आणि शब्दांच्या चौकटीत शब्दात मांडणंही कठीण आहे. कारण, त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एक खोलवर रुजलेली माणुसकी आहे, निःस्वार्थ भावना दडलेली आहे. “जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले” ही संतवाणी त्यांच्या आयुष्याचं तत्त्वज्ञान बनलेली आहे. समाजातील उपेक्षित, दुर्लक्षित आणि वेदनेने झुकलेल्या माणसांकडे पाहिलं की त्यांचं मन अस्वस्थ होतं, आणि त्या अस्वस्थतेतूनच समाजबदलाची ठाम पावलं उचलली जातात. आजही आपल्या समाजात अनेक  रूढी-परंपरा, अंधश्रद्धा आणि मानसिक बेड्या घट्ट पकडून बसलेल्या आहेत. विशेषतः विधवा महिलांच्या बाबतीत आनंद, सण-उत्सव आणि स्वातंत्र्यावर जणू आयुष्यभराची बंदीच असते. पतीच्या निधनानंतर त्या विधवा स्त्रीचं आयुष्य जणू गोठवून टाकलं जातं. या अन्यायकारक आणि रुढी-परंपरेच्या अपशकुनी मानसिकतेला ठामपणे फाटा देण्यासाठी मेहकर तालुक्यातील उटी येथे विधवा महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते. “मीही एक स्त्री आहे; आणि माझ्यासारख्या प्रत्येक स्त्रीला सन्मानाने, निर्भयपणे आणि स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे,” या ठाम विचारातून ॲड. माधुरी पवार यांनी हा धाडसी उपक्रम राबवला. हा कार्यक्रम केवळ सामाजिक उपक्रम नव्हता; तो समाजाच्या खोलवर रुजलेल्या जखमेवर ठेवलेला आरसा होता. देवानंद पवार फाउंडेशन आणि सखी रिसायकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमाने समाजमनाला समाजीक चळवळीचा मार्ग दाखवला. विधवा महिलाही पूर्ण माणूस आहेत, त्यांनाही आनंद, सन्मान आणि आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. हा संदेश शब्दांत नव्हे, तर कृतीतून दिला गेला. या सोहळ्यात जात, धर्म, आर्थिक स्थिती यांची कोणतीही भिंत नव्हती. अनेक महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. अनेक वर्षे समाजाच्या विविध कार्यक्रमापासून वंचित ठेवलेल्या त्या बहुतांश विधवा महिलांना येथे हळदी-कुंकवाच्या कार्मायक्रमात मानसन्मान करण्यात आला. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, डोळ्यांत दिसणारा आत्मविश्वास आणि समाधान पाहून वातावरण चैतन्यमय शांत झाले होते. या कार्यक्रमात एक असा क्षण घडला, जो उपस्थित प्रत्येकाच्या मनात कायमचा कोरला गेला. ॲड. माधुरी पवार महिलांना संबोधित करत असताना, मंडपातून एक वयोवृद्ध आजी हळूहळू पुढे आल्या. हातात काठी, हात-पाय थरथरत होते. त्या आजीच्या डोळ्यांत भीती नव्हती; होती पण डोळ्यांत अपार माया आणि कृतज्ञतेचा प्रकाश होता. त्या थरथरत्या आवाजात आजी म्हणाल्या, “मी तुला शंभर रुपये देऊ का?” क्षणभर संपूर्ण मंडपात स्तब्ध होत शांतता पसरली, हजारो महिलांची नजर त्या वयोवृद्ध आजीकडे वळली. ॲड. माधुरी पवारही क्षणभर निशब्द झाल्या. त्या आजीच्या थरथरत्या हातांकडे आणि डोळ्यातील ममत्व, आवाजातील भाव पाहून त्या म्हणाल्या, “आई, मला नको… मी तुला पैसे देते.”
पण आजी थांबल्या नाहीत. काठी टेकवत, टेकवत त्या आपल्या घराकडे गेल्या. थोड्याच वेळात हातात शंभर रुपयांची नोट घेऊन परत आल्या. ती नोट माधुरी पवार यांच्या हातात देत त्या आजी म्हणाल्या, “पोरी, तू आमच्यासाठी खूप काही करतेस. रक्ताच्या नात्यांपलीकडे जाऊन आमची सेवा करतेस. मला देवाने मुलगी दिली नाही, पण तूच माझी मुलगी आहेस. आयुष्यात सुखी राहा.” खूप मोठी होशील, असं म्हणत त्या आजीने, माधुरीताईच्या डोक्यावर मायेचा हात ठेवला. त्या क्षणी माधुरी पवार निशब्द झाल्या आणि डोळे भरुन आले, त्या शंभर रुपयांच्या नोटेत पैशाची किंमत नव्हती; त्यात आईच्या मायेचं, स्वीकाराचं आणि नात्याचं अमूल्य मोल दडलेलं होतं.
तो क्षण इतक्यावरच थांबला नाही. दुसरी एक वयोवृद्ध महिला पुढे आली. तिने ॲड. माधुरी पवार यांना घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या हातात पन्नास रुपये ठेवले. हा क्षण पाहून संपूर्ण मंडप भावूक झाला. अनेक महिलांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, ते अश्रू वेदनेचे नव्हते, तर कृतज्ञतेचे होते. जेव्हा अपेक्षा तुटतात, जेव्हा रक्ताची नाती दूर जातात, तेव्हा माणूस आतून कोलमडतो. अशा वेळी मानलेली नातीच खरा आधार ठरतात. कारण ही नाती अधिकाराने नाही, तर प्रेमाने बांधलेली असतात. संकटात हात धरून उभं राहणं, दुःखात सोबत असणं, हीच खरी नाती असतात. रक्ताच्या नात्यांपेक्षाही काही नाती अधिक जिव्हाळ्याची, अधिक पवित्र आणि अधिक खरी असतात. नातं म्हणजे फक्त रक्ताचा धागा नसतो; ते मनाच्या जोडणीचं, विश्वासाचं आणि निःस्वार्थ साथ देणारं बंधन असतं. जी नाती आपल्याला पुन्हा उभं राहायला शिकवतात, ती आयुष्यभराची अमूल्य देणगी ठरतात. ॲड. माधुरी पवार यांच्या कार्यातून हे स्पष्ट होतं की समाजात माणुसकी अजून जिवंत आहे. रक्ताच्या नात्यांपलीकडे जाऊनही प्रेम, आपुलकी आणि मायेची नाती घट्ट विणता येतात. आणि अशाच नात्यांमुळे समाज अधिक संवेदनशील, अधिक मानवी आणि अधिक समृद्ध बनतो. ही कहानी केवळ एका उपक्रमाची नाही; ती माणुसकीच्या जिवंत अस्तित्वाची साक्ष आहे. जेव्हा समाजातील शेवटच्या माणसाच्या डोळ्यांत समाधानाचं पाणी तरळतं, तेव्हाच खरं समाजकार्य घडतं. आणि अशाच कार्यामुळे आजही आशा जिवंत आहे.

——————————————–

त्या क्षणी पाणावलेल्या डोळ्यांनी आणि भरलेल्या आवाजात माधुरीताई म्हणाल्या…

“आई… तुमच्या पोटी मी जन्म घेतलेला नसला, तरी तुमच्यासारख्या प्रेमळ आईच्या मायेच्या सावलीत मी रोज वाढते आहे, घडते आहे, समृद्ध होत आहे. हे माझं फार मोठं भाग्य आहे. तुमचं निरपेक्ष प्रेम, निस्सीम माया आणि आत्मीयतेने भरलेला सहवास हेच माझ्यासाठी आयुष्यातलं सर्वात मोठं वरदान आहे. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याच्या तुम्ही साक्षीदार आहात. माझ्या आयुष्यात तुम्ही मला मार्ग दाखवला आहे आणि योग्य दिशा दिली आहे. तुमचं प्रेम, तुमची काळजी, तुमचा जिव्हाळा आणि तुमचा आधार हीच माझी खरी ताकद आहे. आज मला अभिमानाने सांगावंसं वाटतं, आपलं नातं रक्ताचं नसलं, तरी ते रक्ताच्या नात्यांपेक्षाही अधिक पवित्र, अधिक घट्ट आणि अधिक खरं आहे.” असं म्हणत माधुरी पवार थांबल्या, पण त्या शब्दांनी संपूर्ण वातावरण भारावून गेलं. त्या डोळ्यांतले अश्रू वेदनेचे नव्हते, तर माणुसकीचा ओलावा, जिव्हाळा होता.

————————————————————————-

संतोषजनक लेखणीतून….✍️
संतोष अवसरमोल (पत्रकार/लेखक)
मु+पो.घाटबोरी, ता. मेहकर, जि. बुलढाणा
मो:-9689777129

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका