ताजे अपडेट

आघाडीत बिघाडी, उबाठाची कसोटी; युती फिसकटली

घाटबोरी, प्रतिनिधी

 

मेहकरात: आघाडीत बिघाडी, उबाठाची कसोटी; युती फिसकटली

शिंदे शिवसेना विरुद्ध कॉग्रेस ; कार्यकर्ते सैरभैर!

राजकारणात ज्याचा आदर्श घ्यावा असा एकही नेता या घडीला समोर दिसत नाही. एखाद्या नेता सकाळपर्यंत एखाद्या पक्षात असतो आणि संध्याकाळी तो दुसऱ्या पक्षात गेलेला असतो म्हणजे या बिळातून त्या बिळात कोलांट उड्या मारणारे ही अनेकजण आहेत. पब्लिक सब कुछ जानती है! हे पाहण्याचे सध्याचे दिवस आहेत. राजकारणात सध्या “तेरी भी चूप, मेरी भी चूप” अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. वरवर शांतता भासली तरी आतून मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत. नेते तेच, पक्षही तेच मात्र, राजकीय भूमिका बदललेल्या त्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या कोलांट उड्या कशा मारायला लागतात याचेच चित्र सध्या मेहकर नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने शहराच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.
मेहकर नगरपरिषदेच्या निवडणुकीला चांगलाच वेग आला असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून जागावाटपाचा वाद चिघळला, शिवसेना-भाजप यांची युती फिसकटली तर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने हे मित्रपक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. नवे समीकरणे, नवी आघाड्या आणि जुन्या वादाच्या नव्या अध्यायांना सुरवात झाल्याने या निवडणूकीत रंगत निर्माण झाली आहे. मात्र, राजकीय संघर्षाला पुन्हा एकदा चालना मिळाल्याने शिंदे शिवसेना विरुद्ध कॉग्रेस अशी लढत होण्याची शक्यता असल्याने यामध्ये उबाठा शिवसेना पक्षाची चांगलीच कसोटी लागणार आहे.
गेल्या दोन दिवसा अगोदर मेहकर शहरातील महाविकास आघाडीतील हे सर्वंच राजकीय नेते एकमेकांच्या गळ्यात गळे घालून राजकीय ‘तुतारी’चा सुर काढत होते. मेहकर शहरात कॉग्रेसपक्षात अंतर्गत गटबाजी होती ही सर्वसुत होती. पण अंतर्गत गटबाजी इतक्या थराला जाईल हे कधी कोणाला वाटलेही नव्हते. कॉग्रेसच्याकडून नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत कासमभाई गवळी व विलास चनखोरे हे दोघेजण होते. त्यावेळी विलास चनखोरे यांच्या पाठीशी खंबीरपणे श्यामभाऊ उमाळकर, अनंतराव वानखेडे उभे होते. तिकडे कासभाई गवळी यांच्या पाठीशी लक्ष्मनदादा घुमरे, देवानंद पवार उभे ठाकले होते. या दोघांनीही स्वप्नरंजनाच्या नभात नगराध्यक्षपदाचे चांगलेच डोहाळे लागलेले होते ते कॉग्रेसपक्षाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्यासमोर एकमेकांनी शक्ती प्रदर्शन दाखविले, अन् त्याचवेळी व्यासपीठावर एकदिलाने एकिचा सुर आवरतानाही यांच्याकडून पाहायला मिळालेला होता. मात्र, राजकारणात सत्तेच्या मोहापायी कधी काय होईल ते सांगने कठीणच आहे. कॉग्रेसपक्षाकडून कासभाई गवळी यांना अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर कॉग्रेसच्या दुसऱ्या गटाची वाताहत झाली, श्यामभाऊ उमाळकर, अनंतराव वानखेडे सारखे दिग्गजनेते पक्षाच्या बॅनरखाली कासमभाई गवळी यांच्यासोबत हात मिळवणी करुन श्यामभाऊनी आपला पुतण्या वैभव साठी उमेदवारी पदरात पाडून घेतली आणि विलास चनखोरे सारख्या निष्ठावंत शिलेदारा ऐवजी कासमभाई गवळी यांना पंसती दिली. सोबतच कासमभाई गवळी यांच्या गाडीत एबीफॉर्म देण्यासाठी आलेले श्यामभाऊ नगरपरिषदेच्या आवारात पाहायला मिळाले, त्यावेळी एक जबाबदार नेत्याचा निर्णय कार्यकर्त्यांना ऐनवेळी वाऱ्यावर सोडण्यासारखा वाटल्याने भावी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत बॅनरबाजी करणारे विलास चनखोरे पंजाला सोडून हातात मशाल घेऊन आमदार खरातांच्या गराड्यात पाहायला मिळाले. अन् बिचारे भावी नगरसेवकांची स्वप्न पाहणाऱ्या कार्यकर्त्यांची चांगलीच सैरभैर झाल्याने कोणत्या पक्षाचा झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती पाहायला मिळाली. इकडे शहरातील उबाठा शिवसेनेच्या अभिमन्यूला तर आता आपलं जमलं म्हणून भावी नगराध्यक्षपदाचे स्वप्न अधिक गडद होताना पाहायला मिळाले. मात्र, कॉग्रेसपक्षाचे दोन चार पदाधिकारी जरी इकडून तिकडे गेले असलेतरी कॉग्रेसपक्षाला मानणारा मतदार हा जाग्यावरच ठाम असल्याने उबाठा शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना अन् त्यांच्या पाठीराख्यांची या निवडणुकीत चांगलीच कसोटी लागणार आहे अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा आहे. दुसरीकडे शिंदे शिवसेना व भाजपाची युती फिसकटलेली पाहायला मिळाली, शिंदे शिवसेना गटाकडून बहुतांश नव्या चेहऱ्याला प्रभागांमध्ये उमेदवारी मिळाल्यानंतर जुने काही पदाधिकाऱ्यांकडून दबक्या आवाजात नाराजीचा सूर उमटत आहे. तर भाजपा पदाधिकार्यांनी शहरातील सर्वच प्रभागांमध्ये आपल्यापक्षाचे उमेदवार उभे करून निवडणूकीच्या मैदानात दंड थोपटले आहेत. आता घोडा मैदान दुर नाही, मैदान कोण गाजवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ‘शिंदे शिवसेनेचा ‘प्रतापगड’ अभेद्य राहणार की नगरपरिषदेवर कॉग्रेसपक्षाचा झेंडा फडकविला जाणार की उबाठा शिवसेनेची जादू चालणार हे पाहणे अत्यंत औत्सुक्याचे ठरणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका