ताजे अपडेट

“वर्दीतील दीपस्तंभ” हा प्रेरणादायी ग्रंथ महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला पाहिजे : डॉ. श्रीपाल सबनिस 

मेहकर, प्रतिनिधी

वर्दीतील दीपस्तंभहा प्रेरणादायी ग्रंथ महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला पाहिजे : डॉ. श्रीपाल सबनिस 

जनतेच्या सुरक्षिततेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सेवाकार्याचा आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाचा गौरव करणारा “वर्दीतील दीपस्तंभ” हा प्रेरणास्रोत ग्रंथ महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनिस यांनी केले.
मेहकर शहरातील कृषीवैभव लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या “वर्दीतील दीपस्तंभ” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी लेखक संतोष अर्जुन अवसरमोल यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. महाराष्ट्र पोलीस दलातील काही ओळखीचे निवडक, कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि समाजाभिमुख अधिकाऱ्यांच्या जीवनप्रवासाचे हृदयस्पर्शी व प्रेरणादायी व्यक्तीचित्रण या ग्रंथात करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. अशा प्रकारचा वेगळा आणि समाजोपयोगी विषय निवडून पोलीस दलातील सकारात्मक व प्रेरणादायी सेवाकार्य जनतेसमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घाटबोरी सारख्या खेड्यातील, एका फाटक्या कपड्यातील लेखकाने केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलताना डॉ. श्रीपाल सबनिस म्हणाले, “महाराष्ट्रातील अनेक नामवंत लेखकांच्या लक्षात न आलेला विषय प्रतिभावंत लेखक संतोष अवसरमोल यांनी आपल्या संवेदनशील लेखणीतून यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास शब्दबद्ध प्रकाशमान केला आहे. पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांचे कार्य, त्याग, संघर्ष आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचा गौरव करणारा हा ग्रंथ खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. त्यामुळे हा मौल्यवान ग्रंथ महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचला पाहिजे. असे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनिस यांनी विचारव्यक्त केले.
पोलीस दलाचा गौरव करताना डॉ. श्रीपाल सबनिस म्हणाले, “समाज शांतपणे झोपलेला असताना जागून जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडणारा खरा योद्धा म्हणजे पोलीस अधिकारी होय. अशा कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्वांचा गौरव समाजाने करणे ही काळाची गरज आहे. यावेळी विचारपिठावर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा श्री. गुलाबराव खरात, अपर पोलीस अधीक्षक अमोलजी गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, उर्दू गझलकार साहित्यिक अजीम नवाज राही, साहित्यिका सौ. ललिताताई श्रीपाल सबनीस, सौ. अमृताताई अमोलजी गायकवाड, लेखकाच्या मातोश्री श्रीमती वच्छलाबाई अर्जुन अवसरमोल, साहित्यिक किरण डोंगरदिवे तसेच तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन चनेवार उपस्थित होते. यावेळी संविधानाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर “वर्दीतील दीपस्तंभ” या पुस्तकाचे लेखक संतोष अवसरमोल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढे विचारपीठावरील सर्व मान्यवरांचे २१ किलो फुलांच्या अखंड हाराने स्वागत करण्यात आले. तसेच विठ्ठल-रुक्मिणींची प्रतिमा भेट देऊन लेखकांनी प्रत्येक मान्यवरांचा हृदयस्पर्शी सत्कार केला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते “वर्दीतील दीपस्तंभ” या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, अपर पोलीस अधीक्षक अमोलजी गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, उर्दू गझलकार साहित्यिक अजीम नवाज राही, साहित्यिका सौ. ललिता श्रीपाल सबनीस, साहित्यिक किरण डोंगरदिवे आणि तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन चनेवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार यांनी केले. तर आभार पत्रकार श्रीकृष्ण काकडे यांनी मानले. यावेळी पत्रकार जयचंद बाटीया, श्रीकृष्ण काकडे, भगवान राईतकर, कृष्णा हावरे, हमीद मुल्लाजी, सुनील मोरे, मुन्ना काळे, कैलास राऊत, समाधान पदमने, सतिष मवाळ, गजानन सरकटे, देवानंद वानखेडे, सागर गव्हाड, अंकुश राठोड, प्रमोद मिश्रा, तर मेहकर ठाणेदार व्यंकटेश आलेवार, ठाणेदार अमरनाथ नागरे, ठाणेदार आदिनाथ मोरे, ठाणेदार गजानन करेवाड, व कृषी अधिकारी संदीप मेटांगळे, सहायक गटविकास अधिकारी श्री जाधव, राजकुमार पाखरे, माजी केंद्र प्रमुख सुभाष देशमुख, मुख्याध्यापक पी.के.देशमुख, प्राध्यापक संतोष डोंबळे, यांच्या सह तालुक्यातील अनेकजण उपस्थित होते.

—————————————————————-

जिल्हा परिषद बुलढाणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गुलाबराव खरात यांनी “वर्दीतील दीपस्तंभ” या पुस्तकाला शुभेच्छा देताना आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, एका खेडेगावातील दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या लेखकाने आज जनतेच्या सुरक्षेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आपल्या लेखणीतून शब्दबद्ध करून समाजासमोर मांडणे, ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. लेखक संतोष अवसरमोल यांनी पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ, धाडसी आणि समाजाभिमुख अधिकाऱ्यांच्या कार्याला पुस्तकाच्या माध्यमातून उजाळा देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. असे गौरवोद्गार जिल्हा परिषद बुलढाणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी व्यक्त केले.

—————— —————————————————-

अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोलजी गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “वर्दीतील दीपस्तंभ” या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील काही निवडक कर्तव्यनिष्ठ व प्रेरणादायी पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवनप्रवासावर लेखकांनी प्रभावीपणे प्रकाश टाकला आहे. समाजाच्या सुरक्षिततेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र कर्तव्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सेवाकार्य आणि प्रेरणादायी जीवनप्रवास लेखक संतोष अवसरमोल यांनी या पुस्तकातून केले आहे. हे पुस्तक पोलीस दलाच्या कार्याचा गौरव करणारे आणि समाजासाठी प्रेरणास्त्रोत आहे. त्यामुळे प्रत्येकांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे, असे गौरवोद्गार अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा श्री. अमोलजी गायकवाड यांनी व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका