
घाटबोरीत सामाजिक एकोपा, जातीय सलोखा, सुसंवाद आणि सन्मानाचा भव्य सोहळा
अपर पोलीस अधीक्षक अमोलजी गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभणार
मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथे शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मेहकर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने जातीय सलोखा, पोलीस प्रशासन-पत्रकार सुसंवाद, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि गुणवंतांचा सत्कार सोहळा अत्यंत भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक समरसता, प्रशासकीय संवाद, पत्रकारितेचा सन्मान आणि तरुणांना प्रेरणेची दिशा देणारा हा बहुआयामी उपक्रम घाटबोरीच्या सामाजिक व वैचारिक एकोप्याचा एक ऐतिहासिक पर्व ठरणार आहे. या विशेष सोहळ्यात गावातील धोती-टोपीधारक वयोवृद्धांचा सन्मान, समाजजागृतीसाठी लेखणीद्वारे जनजागृती करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार, तसेच डॉक्टर, समाजसेवक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. अनुभव, विचार, सेवा, ज्ञान आणि कर्तृत्व यांना एकाच व्यासपीठावर सन्मानाने आदर देणारा हा उपक्रम समाजातील कृतज्ञता, बांधिलकी आणि प्रेरणादायी परंपरा अधिक दृढ करणारा ठरणार आहे. कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड हे विशेष मार्गदर्शन करणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदबाप्पू देशमुख राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून मेहकर उपविभागीय अधिकारी रवींद्रजी जोगी, सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी संजयजी खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडे, तहसीलदार निलेशजी मडके, पंचायत समिती गटविकास अधिकारी दिनकरराव खरात, तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी संदीप गवळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुशजी येवले, कृषी अधिकारी संदीप मेटांगळे, ठाणेदार अमरनाथ नागरे, गटशिक्षणाधिकारी मधुकर वानखेडे, सरपंच राजकुमार पाखरे, डॉ. सुधीर पाखरे अस्थीरोग तज्ञ मेहकर आणि डॉ. गजानन उल्हामाले यांची उपस्थिती लाभणार आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार, दत्ताभाऊ उमाळे, जयचंद बाटीया, श्रीकृष्ण काकडे, हमीद मुल्लाजी, प्रविण गायकवाड, सै. महेबूब भाई, कैलास राऊत, जमीर शहा, सचिन गाभणे, किशोर इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकारही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. प्रशासन, पत्रकारिता, शिक्षण, आरोग्य, कृषी आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांची एकत्रित उपस्थिती या कार्यक्रमाच्या व्यापकतेची आणि वैचारिक उंचीची साक्ष देणारी ठरणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन माजी सरपंच तथा ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष गजानन चनेवार आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा लेखक संतोष अवसरमोल यांनी केले आहे. समाजात बंधुभाव, सलोखा, संवाद, सन्मान आणि प्रेरणा यांचे संस्कार अधिक दृढ करणारा हा सोहळा घाटबोरीच्या सामाजिक इतिहासातील एक संस्मरणीय अध्याय ठरेल, असा विश्वास व्यक्त होत असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



