माध्यमविश्व

लोककवी वामनदादा कर्डक साहित्यसंमेलनाच्या कविसंमेलनाध्यक्षपदी ; अजीम नवाज राही

घाटबोरी, प्रतिनिधी

 

लोककवी वामनदादा कर्डक साहित्यसंमेलनाच्या कविसंमेलनाध्यक्षपदी ; अजीम नवाज राही

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ तसेच मराठी भाषा विभाग यांच्या सहकार्याने, लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, बुलडाणा यांच्या वतीने दि. २७ व २८ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरी, गर्दे वाचनालयाच्या ऐतिहासिक सभागृहात दोन दिवसीय लोककवी वामनदादा कर्डक साहित्यसंमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या साहित्यसंमेलनातील निमंत्रितांच्या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी आयोजन समितीने प्रख्यात मराठी कवी, नामवंत निवेदक व प्रभावी वक्ते अजीम नवाज राही यांची निवड केली आहे. साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध कथाकार विलास सिंदीकर भूषविणार असून उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. अजीम नवाज राही हे महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात लेखणी आणि वाणी या दोन्ही क्षेत्रांत सशक्त ठसा उमटवणारे, वलयांकित व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या प्रतिभेचा झेंडा आज मराठी साहित्याच्या दोन महत्त्वाच्या गडांवर लेखन आणि निवेदन दिमाखात फडकताना दिसतो. व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत, वर्तमानाचा वतनदार, तळमळीचा तळ तसेच अलीकडेच अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव तर्फे प्रकाशित झालेला वळीवाच्या वेळा हे त्यांचे पाचही कवितासंग्रह सकस, वस्तुनिष्ठ आणि व्यापक वाचकप्रिय ठरले आहेत. अजीम नवाज राही हे नाव म्हणजे नवनिर्मितीची प्रयोगशीलता. कुठल्याही पारंपरिक किंवा साचेबद्ध वाटेने न जाता त्यांनी आपल्या कवितेद्वारे समकालीन मराठी कवितेवर स्वतंत्र आणि ठसठशीत नाममुद्रा उमटवली आहे. त्यांच्या कवितेने साहित्याच्या परिघावर ढकलले गेलेले जीवन मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी आणले. त्यांच्या कवितेतून व्यक्त होणारे दुःख हे सर्वसामान्य माणसाचे शेतकरी, शेतमजूर, कामगार, शोषित आणि अस्तित्वाच्या काठावर उभ्या असलेल्या माणसाच्या जगण्याचे आहे. लेखणीबरोबरच वाणीच्या क्षेत्रातही अजीम नवाज राही हे नाव एक ‘ब्रँड’ म्हणून ओळखले जाते. समारंभाच्या यशाचा जणू पासवर्ड ठरलेले हे व्यक्तिमत्त्व निवेदक व वक्ता म्हणून त्यांच्या अमोघ, रसाळ आणि प्रभावी वाणीने राज्यभरातील रसिक श्रोत्यांच्या मनावर गारूड घालत आले आहे. त्यांच्या व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत, वर्तमानाचा वतनदार, तळमळीचा तळ या कवितासंग्रहांना अमेरिकेतील फाउंडेशन पुरस्कार, केशव गोरे स्मारक ट्रस्टचा महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसुत पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा शरदचंद्र मुक्तीबोध पुरस्कार, नारायण सुर्वे पुरस्कार, इंदिरा संत पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, लोकमत साहित्य पुरस्कार यांसह असंख्य मानाचे व प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले आहेत. अजीम नवाज राही यांच्या कवितांचा समावेश इयत्ता दहावी व अकरावीच्या मराठी पाठ्यपुस्तकांत तसेच महाराष्ट्रातील अकरा विद्यापीठांच्या बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. व एम.ए. अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे. हे बुलडाणा जिल्ह्यासाठी निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.
लोककवी वामनदादा कर्डक साहित्यसंमेलनाच्या कविसंमेलनाध्यक्षपदी अजीम नवाज राही यांची निवड ही समकालीन मराठी कवितेच्या व्यापक स्वीकाराची व त्यांच्या साहित्यिक योगदानाची सन्मानपूर्वक दखल म्हणावी लागेल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका