
अभिष्टचिंतन…
“मैं हूँ जहाँ, बेशक वहाँ ऊँचाई है”… प्रमोद बापू देशमुख !
क्षितिजाच्या कुशीत उभ्या असलेल्या पर्वतरांगा जशा आभाळाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात, तशाच काही व्यक्तिमत्त्वांच्या विचारांची उंची काळाच्या मर्यादा ओलांडून समाजमनाला स्पर्श करत असतात. त्या उंचीचे मोजमाप फूटपट्टीने होत नाही; ती मोजली जाते माणुसकीच्या निकषांनी, समाजहिताच्या सेवाभावाने आणि निःस्वार्थ कार्याच्या कर्तृत्वानी. अशा साध्या, नम्र आणि समाज हितासाठी झिजणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या जन्मदिवस हा केवळ उत्सव नसून कृतज्ञतेचा, गौरवाचा आणि प्रेरणेचा सोहळा ठरतो. अशा या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचे नाव म्हणजे प्रमोद बापू देशमुख. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना मन आपोआपच उद्गारते…
*“मैं हूँ जहाँ, बेशक वहाँ ऊँचाई है.”*
ही उंची कोणत्याही इमारतीची नाही, ना कोणत्या पदाची, संपत्तीची नाही. ही उंची आहे विचारांची, संवेदनशीलतेची, समाजाशी असलेल्या घट्ट नाळेची आणि माणुसकीच्या शाश्वत मूल्यांची. काही माणसे आपल्या अस्तित्वानेच परिसर उजळवतात. त्यांच्या उपस्थितीत प्रेरणेचा दीप उजळतो, त्यांच्या शब्दांत आत्मविश्वासाचे बळ सापडते आणि त्यांच्या कार्यातून समाजाला नवी दिशा मिळते. आदरणीय, प्रमोद बापू देशमुख हे अशाच सृजनशील व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. समाजसेवेची बाग फुलवण्याचे सामर्थ्य हे घरातील कुटुंबाच्या वात्सल्यातूनच व्यक्तीच्या मनावर खोलवर प्रतिबिंबित होत असते. प्रमोदबापू देशमुख यांचा जन्म मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा या गावातील देशमुख घराण्याच्या वाड्यात झाला. देशमुखी थाट, लोककल्याणाची परंपरा आणि समाजहितासाठी झटणारा वारसा या कुटुंबात पूर्वीपासूनच अधोरेखित राहिलेला आहे. आजोबा स्व. आनंदरावबापू देशमुख, माजी आमदार, यांच्या दातृत्वशील, लोकाभिमुख आणि कुटुंबवत्सल विचारांचा वारसा घेऊन प्रमोदबापू देशमुख यांची नाळ या मातीत अधिक घट्ट रुजलेली दिसते. त्यामुळेच राजकारण आणि समाजकारणाच्या क्षेत्रात नेतृत्वाच्या मांदियाळीत ते आपले कर्तृत्व सिद्ध करत सातत्याने नक्षत्रासारखे तेजस्वीपणे झळकत आहेत. प्रमोदबापू देशमुख हे सध्या ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. त्याचबरोबर स्व. आनंदराव बापू देशमुख ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. मागील दोन दशकांपासून त्यांनी ग्रामीण पत्रकार संघाच्या तालुका उपाध्यक्षपदापासून सुरू केलेला प्रवास आज जिल्हाध्यक्षपदापर्यंत पोहोचला आहे. या प्रवासात त्यांनी केवळ पदे भूषवली नाहीत, तर संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकारांचे संघटन उभे करून त्यांना अन्यायाविरुद्ध निर्भयपणे लेखणी चालविण्याची प्रेरणा दिली आहे. “तुम्ही लढायची तयारी ठेवा, जिथे जिथे अन्याय, अत्याचार आणि जुलूम घडेल, तिथे आम्ही तुमच्या सोबत आहोत,” हा त्यांचा ठाम विश्वास आणि विचारसरणी आहे. सामान्यातल्या सामान्य पत्रकाराला आधार देणे, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि पत्रकारितेला निर्भयतेची दिशा देणे, हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य आहे. तन, मन आणि धनपूर्वक समाजहितासाठी समर्पित असलेले प्रमोदबापू देशमुख हे एक प्रतिभावंत आणि विचारशील नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या विचारांची व्यापकता शब्दबद्ध करणे खरोखरच कठीण कार्य आहे. कारण त्यांच्या कार्यातून सतत प्रकाशमान होणारी ऊर्जा ही सर्वदूर पसरत असते. हा प्रकाश केवळ मार्ग दाखवत नाही, तर अनेकांच्या जीवनात आशा, आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतो. गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत माणसा-माणसांमध्ये सलोख्याची, विश्वासाची आणि सहकार्याची साखळी निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. “जोपर्यंत तुमच्या पायाला लाल माती माखत नाही, तोपर्यंत बातमीमागची खरी बातमी समजत नाही,” असा त्यांचा स्पष्ट विचार आहे. केवळ डेस्कवर किंवा पत्रकार कक्षात बसून पत्रकारिता पूर्ण होत नाही, तर प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन वास्तव जाणून घेणे हेच खऱ्या पत्रकारितेचे मूळ तत्त्व आहे, असे ते सातत्याने अधोरेखित करतात. आजच्या काळात काही ठिकाणी पत्रकारितेच्या नावाखाली केवळ वरवरचे, डेस्कवर बसून तयार केलेले वृत्तांकन केले जात असल्याचे चित्र दिसते. या संदर्भात ते कडक शब्दांत भाष्य करतानी म्हणतात, की पत्रकाराने भ्रष्टाचाराची मुळे शोधून काढून ती समाजासमोर उघडी करणे, अन्यायाविरुद्ध निर्भयपणे लेखणी चालवणे आणि सत्याचा आवाज बुलंद करणे, हीच खरी पत्रकारितेची जबाबदारी आहे, असे त्यांचे ठाम मत आहे. या भूमिकेमुळेच ते ग्रामीण पत्रकार संघटनेचे एक सक्षम, निर्भय आणि निष्कलंक नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. पत्रकारितेचा धर्म जपणारे आणि माणुसकीचा मर्म जाणणारे असे सहृदयी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. समाजातील वंचित, उपेक्षित आणि दुःखितांच्या वेदना स्वतःच्या मानून त्यांना आधार देणे, त्यांच्या अश्रूंना पुसणे आणि त्यांच्यासाठी आधारवड बनणे हे त्यांच्या कार्याचे केंद्रबिंदू आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात मायेचा ओलावा, संवेदनशीलतेचा गाभा आणि सेवाभावाची खोल भावना स्पष्टपणे जाणवतात. त्यांच्या सहवासात आल्यानंतर सामान्य माणसालाही आश्वासकतेचा आणि सुरक्षिततेचा अनुभव येतो. त्यांचा साधेपणा, विनम्रता आणि निगर्वी स्वभाव हा केवळ बाह्य आवरण नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. कोणताही दिखावा, मोठेपणाची झलक किंवा श्रेय घेण्याची वृत्ती त्यांच्यात दिसत नाही. त्यामुळेच त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी आणि विश्वासार्ह भासते. त्यांच्या स्वभावातील ही सहजता त्यांना समाजात वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. ते खऱ्या अर्थाने असे व्यक्तिमत्त्व आहेत, ज्यांच्या कार्यातून ‘चंदनासारखा सुगंध समाजात दरवळत राहतो…ज्याचा अनुभव सर्वांना येतो, पण तो त्यांनी कधीही प्रसिद्धीसाठी मिरवलेला नाही. त्यांचे विचार, त्यांची कार्यपद्धती आणि त्यांची निस्वार्थ वृत्ती हीच त्यांची खरी ओळख आहे.
पांढऱ्याशुभ्र वेशातील त्यांचे व्यक्तिमत्त्व जितके स्वच्छ दिसते, तितकेच त्यांच्या अंतरंगातील विचारही निर्मळ आणि प्रवाही झऱ्यासारखे आहेत. समाजातील प्रत्येक घटकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन ते सातत्याने आधार देण्याचे कार्य करत राहतात. अशा या व्यक्तिमत्त्वातून एक वेगळाच आत्मविश्वास, रुबाब आणि नेतृत्वगुण प्रकट होतो. मात्र हा रुबाब कृत्रिम नसून त्यांच्या कार्यकर्तृत्वातून सिद्ध झालेला आहे. कारण खरा रुबाब हा शब्दांत नसतो, तो कार्यातून सिद्ध होतो आणि तो प्रमोदबापू देशमुख यांनी सिद्ध करून दाखवला आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, तेज असावे सूर्यासारखे, प्रखरता असावी चंद्रासारखी, शीतलता असावी चांदण्यासारखी आणि मैत्री, नेतृत्व, कर्तृत्व व दातृत्व असावे प्रमोदबापू देशमुख यांच्यासारखे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांना उदंड, निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओंजळभर फुलांच्या हार्दिक शुभेच्छा.
——————————————–
— संतोष अवसरमोल (पत्रकार तथा लेखक)
मु. पो. घाटबोरी, ता. मेहकर, जि. बुलढाणा
मो:- 9689777129



