
उघड्यावर पडलेल्या संसाराला मायेचा आधार; अॅड.माधुरी देवानंद पवार
— मोडलेल्या घराची चूल पुन्हा पेटवणारी निराधारांची सावली
मेहकर तालुक्यातील बोथा—एक साधं, शांत गाव. पण मागील वर्षी इथे घडलेली एक घटना संपूर्ण गावाचं अंतर्मन हलवून गेलेली. एका मागासवर्गीय कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचं आकस्मिक निधन झालं आणि घरातील तीन–चार लहान मुलं व त्यांची वृद्ध आजी अक्षरशः उघड्यावर पडली. घर कोसळलं, संसार उघडा पडला… अन्न नव्हतं, कपडे नव्हते, डोक्यावर छप्पर नव्हतं. आजीच्या कुपोषित हातात जगण्याची उरली-सुरली ताकदही नव्हती, पण कर्तव्याची जिद्द मात्र पेटलेली होती. मुलांना गावोगाव भीक मागून आणलेला कोरडा घास हेच त्यांचं जगणं! समाजमंदिराच्या कोपऱ्यात ते जगत होते—न घर, न सुरक्षितता, न शिक्षण… आणि भविष्य? पूर्ण काळोख. या वेदनादायी चित्राने एका संवेदनशील शिक्षकाचं मन पिळवटून गेलं. रोज त्या उपाशी, धुळीत रुतून गेलेल्या मुलांकडे पाहताना त्याची नजर पळ काढत नव्हती. शेवटी त्याने मदतीचा हात कुणाकडे तरी पोहोचवण्याचा निर्धार केला आणि फोन लागला निराधारांची सावली असलेल्या समाजसेविका अॅड. माधुरी देवानंद पवार यांना. शिक्षकाचा थरथरता आवाज ऐकताच माधुरी ताई काही क्षण नि:शब्द झाल्या. “अनाथ… अन्न नाही… घर नाही?” हे शब्द अंतर्मनाला भोसकणारे. त्या क्षणी त्यांनी ठरवलं—“ही मुलं माझी जबाबदारी.” तात्काळ माधुरी पवार बोथ्याकडे रवाना झाल्या. गावात पोहोचल्यावर समाजमंदिराच्या कोपऱ्यात बसलेली मुलं पाहताच त्यांचं हृदय तुटलं. उपाशी, घाबरलेली पण डोळ्यांत अजूनही आशेचा एक छोटासा दिवा दिसत होता. त्यांनी पुढे जाऊन मुलांच्या डोक्यावरून हात फिरवला… आणि क्षणातच ती मुलं त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून बसली जणू हरवलेल्यांना आईच सापडली! गावकरी नि:शब्द. वातावरण स्तब्ध.
त्या दिवशीच सुरू झाली देवानंद फाउंडेशनची धडपड या मुलांच्या डोक्यावर छप्पर उभारण्यासाठी. जागा शोधली, योजना आखली, आणि एका आठवड्यांत उभं राहिलं एक पक्कं, उबदार, जगण्याची हमी देणारं घर. चुल पेटली, खिडक्या लावल्या, संसार उजळला. वृद्ध आजीचे डोळे भरून आले “माझ्या नातवंडांना आता घर मिळालं…!” माधुरी पवार यांनी मुलांना शाळेत दाखल केलं. गणवेश, पुस्तके, दप्तर, फी—सगळं फाउंडेशनने उचललं. घरात भांडी, किराणा, कपडे, पंखा, गाद्या, स्वच्छ पाणी, जीवन जगण्यासाठी लागणारी प्रत्येक वस्तू उपलब्ध करून दिली. फक्त घर नव्हे… संसार उभारला गेला. आज ही मुलं शाळेत जात आहेत, अभ्यास करतात, खेळतात, स्वप्न पाहतात. जेव्हा त्यांना विचारलं जातं—“तुम्हाला कोण सांभाळतं?” ते एकच नाव घेऊन हसतात—“माधुरी ताई.”
गावकरी सांगतात—
“अनेक समाजसेवक पाहिले, पण एवढं मनापासून काम करणारी माणसं कमी असतात. माधुरी ताई म्हणजे या मुलांसाठी खऱ्या देवदूतच!” अॅड. माधुरी देवानंद पवार—मोडलेल्या संसाराला आकार देणारी, निराधारांना आधार देणारी, आणि मानवतेचा खरा अर्थ जगाला शिकवणारी सावली. या घटनेतून समाजाला मिळालेला संदेश अत्यंत थेट, समाज बदलण्यासाठी मोठी भाषा, मोठा निधी लागत नाही. कधी कधी एका संवेदनशील मनाने एखाद्या कुटुंबाचं भविष्य उजळतं. बोथा गावातील ही मुलं आज ज्या छपराखाली, ज्या आशेने जगत आहेत. ती उभारली आहे एका स्त्रीच्या निश्चयाने आणि देवानंद फाउंडेशनच्या नि:स्वार्थ कार्याने. आज या घरात मुलांच्या हसण्याचा आवाज गाजतो, चुलीवर भाकरी तयार होते, खेळताना पायांचा ठसका ऐकू येतो. मोडलेल्या संसारात पुन्हा उमेद आणि जीवनाची उजळणी झालेली आहे. माधुरी पवार यांच्या मानवतेच्या निश्चयाने आणि प्रेमळ मार्गदर्शनाने. आज या घटनेतून समाजाला स्पष्ट संदेश मिळतो की, सहानुभूती आणि कृतीचं सामर्थ्य, मोठ्या भाषेच्या किंवा निधीच्या मागणीत नाही; फक्त माणुसकीची खरी ओढ असली पाहिजे.

