“हृदयातून पेटला मायेचा दिवा; पवार लेकीच्या सेवेतून हजारो डोळ्यांना नवा प्रकाश”
घाटबोरी, प्रतिनिधी

“हृदयातून पेटला मायेचा दिवा; पवार लेकीच्या सेवेतून हजारो डोळ्यांना नवा प्रकाश”
“गोरगरीबांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा“; अॅड.माधुरी देवानंद पवार
मेहकर तालुक्यातील हिवरा खुर्द या छोट्याशा गावातून गेल्या अनेक वर्षांपासून एक आशेचा दिवा अखंड पेटलेला आहे. हा दिवा- एखाद्या देवळातील नवसाचा किंवा मंदिरातील प्रदीपाचा नाही; तर हा दिवा पेटलेला आहे आईच्या हृदयातून जन्मलेल्या सुसंस्कृत सेवाभावाचा.
“जे का रंजले गांजले, त्यांसी मने जो आपुले…” संत तुकाराम महाराजांच्या या ओळी ज्या मनाला स्पर्श करतात, त्या मनाने जर सेवा करण्याची शपथ घेतली, तर त्या मनातून समाजासाठी चमत्कार घडतो. अशीच एक प्रेरणादायी, हृदयाला थेट भिडणारी सेवा– जानेफळ जि.प. सर्कलमधील देवानंद त्र्यंबक पवार आणि त्यांची लेक अॅड. माधुरी देवानंद पवार यांनी आपल्या जीवनातून वास्तवात साकारुन दाखवली आहे. देवानंद पवार यांची मोठी आई (चुलती) स्वर्गीय दराबाई सुखदेवराव पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेली अनेक वर्षांपासून ही बाप- लेकीची जोडी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेत्रदीपक आदर्श उभा करीत आहे. आई ही वात्सल्याची माया असते… आणि आईच्या हृदयातून उमटलेला सेवाभाव जर जन्माला आला, तर तो त्रिकाळ टिकणारा असतो. याचे जिवंत उदाहरण म्हणजे पवार परिवाराचा हा आरोग्यसेवा उपक्रम. पहाटेचा सुर्य क्षितीजावरुन वर यायला लागतो, त्या मातीच्या सुगंधात…प्रत्येक शनिवारी ‘जानेफळ’ नगरीत निस्वार्थ सेवाभावाची ज्योत पेटते, सातत्याने शेकडो गरजू लोकांना पुन्हा प्रकाश मिळतो, उपचारांपेक्षा जास्त दिलासा दिला जातो, औषधांपेक्षा जास्त आशा वाटली जाते, आणि चष्म्यापेक्षा अधिक प्रकाश देण्यात येतो, आरोग्य शिबीराच्या दारात उभे असलेली लोकांची गर्दी शिबीराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जमायला लागते. परिसर गजबजून जातो, काही रांगू लागतात; काही थकलेल्या पावलांनी आधार शोधत येतात; काही वेदनेने वाकलेले, काही वर्षानुवर्षे उपचारांच्या प्रतिक्षेत जळलेले, तर काही आशेच्या किरण शोधत आलेले, काहींच्या डोळ्यांत एकच प्रश्न–“आज माझ्यातला अंधार थोडा कमी होईल का?” त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर, या सर्वांचे हात प्रेमाने धरुन उभी राहते– माधुरी देवानंद पवार. आयोजित महाआरोग्य शिबीरात, गोरगरीब, निराधार, वयोवृद्ध, वंचित, सर्वसामान्य अशा हजारो लोकांची मोफत नेत्र तपासणी, नेत्रविकारांवरील विशेषज्ञ उपाचार, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ऑपरेशन, औषधोपचार, आणि मोफत चष्मे वाटप केले जातात. या उपचारांनी – एखाद्या आईच्या चेहऱ्यावर नवा प्रकाश फुलतो, एखाद्या वृद्ध पित्याला पुन्हा चालण्याची हिम्मतीच बळ मिळते, एखाद्या वृद्ध तरुणाला आशेचे नवे पंख फुटतात, आणि एका छोट्याशा सल्ल्याने निराधारांच्या जीवनात नवे पान उलगडते. ही सेवा केवळ आरोग्यसेवेची नाही; ही सेवा आहे चुलत आईच्या वात्सल्याने पेटलेल्या दिव्याची, जी प्रत्येक शनिवारी जानेफळ नगरीत हजारो जिवांच्या हृदयात उजेड पेरते. आतापर्यंत पंधरा हजारोंच्यावर लोकांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहे. म्हणून अॅड. माधुरी देवानंद पवार म्हणतात– “गोरगरीबांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू म्हणजे देव. आपण दिलेल्या प्रकाशात त्यांच्या डोळ्यांत उमटतं तेच खऱ्या सेवेतलं पुण्य असून ‘गोरगरिबांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा’आहे.
सेवा जिवंत राखणारी आई (चुलतीची) माया
देवानंद पवार वारंवार सांगतात, ” माझ्या मोठ्या आईने आम्हाला शिकवले–‘जगावे तर इतरांसाठी जगावे’. आज ती नाही, परंतु तिची शिकवण आमच्या सेवेतून प्रत्येक शनिवारी जिवंत होते. अॅड. माधुरी पवार यांच्या डोळ्यांतही तेच प्रेम आणि करुणा दिसते. त्या म्हणतात,… ” गोरगरीबांची सेवा केली की, देवाला शोधण्याची गरजच राहत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे हसू म्हणजेच देव आहे”. पूढे सांगतात, अनेकांच्या डोळ्यात प्रकाश परत मिळाला, अनेक वृद्धांना नवे पाय मिळाले, आर्थिक अडचणींमुळे उपचार टाळणाऱ्यांना नवी संधींची दृष्टी मिळाली, यामुळे मनातील जखमा भरल्या जातात, हरवलेला आत्मविश्वास परत येतो, आणि अनेकांच्या मनात जगण्याची नवीन इच्छा निर्माण होते. समाजात प्रेम, करुणा आणि सहकार्यांची नवी ज्योत तेवत ठेऊन असंख्य हृदयांमध्ये आशेची नवी पालवी फुटली आहे. माधुरी म्हणते.. या शिबिरात येत असलेल्या एका ज्येष्ठ मातोश्रींच्या चेहऱ्यावर जेव्हा ऑपरेशननंतर पुन्हा प्रकाश पडला, जेव्हा डोळे उघडले, तेव्हा माझा हात हातात घेत ओलावलेल्या डोळ्यांतून उमटलेला स्वरात म्हणाल्या —“बाळांनो, डॉक्टर दिसले नाहीत…पण देवानंदची लेक माधुरी दिसली”....”देवा, तुमच्या हातून मोठं पुण्य घडतंय बाळांनो….” हा आवाज तेथे उपस्थितांना क्षणभर थबकून गेला. हा क्षण आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. हे समाजकार्य आयुष्यभर असेच प्रज्वलित ठेवणार आहोत.
मोठी आई म्हणजे… ती संस्कारांची विद्यापीठ होती.
स्वर्गवासी दराबाई सुखदेवराव पवार, ज्यांना हिवरा खुर्द गावात देवानंद पवार यांची “मोठी आई” म्हणून ओळखले जायचे, त्या जिवंत असताना एकच गोष्ट म्हणायच्या — ” देवा, माझ्या हातून थेंबभर जरी सेवा होत असेल, तर मला त्यातच स्वर्गाचा सुख आहे.” त्यांच्या हृदयात दया होती, कर्तव्य होते, आणि गरीबी पाहून डोळे पाणावणारी करुना होती. स्वर्गीय. दराआईच्या निधनानंतर देवानंद पवार म्हणाले, ” माझी चुलती नव्हती, ती आईच होती. मोठी आई गेली…पण तिचे हृदय माझ्यात जिवंत आहे. ती जगली असती तर आज आम्हाला सांगितलं असतं — ‘बाळांनो, लोकांची सेवा करा.’ म्हणून ही सेवा थांबवायची नाही.” ही सेवा म्हणजे त्यांची मोठी आई जणू आजही हात धरून चालत आहे.



