अॅड. माधुरी पवार यांच्या नवकल्पनेतून शेकडो महिलांच्या हाताला मिळाली नवी ताकद; मक्याच्या पानांतून उमलली मुलांची रोजगारक्रांती
घाटबोरी, प्रतिनिधी

मक्याच्या पानांतून उमलली फुलांची रोजगारक्रांती
अॅड. माधुरी पवार यांच्या नवकल्पनेतून शेकडो महिलांच्या हाताला मिळाली नवी ताकद
मेहकर तालुक्यातील जानेफळ जि.प. सर्कलमधील अॅड. माधुरी देवानंद पवार यांनी एका अनोख्या कल्पनेतून ग्रामीण भागात रोजगाराचे नवे दालन उघडले आहे. कधीकाळी कचरा समजली जाणारी मक्याची कोरड्या, कोमेजलेली पाने आता रोजगाराचे साधन बनली आहेत. शेतातील कापणीनंतर निरुपयोगी ठरणारी मक्याची पाने वर्षानुवर्षे जाळून टाकली जात होती. परंतु या साध्याशा पानांमध्ये लपलेली क्षमता ओळखत, अॅड. माधुरी पवार यांनी या पानांच्याच पाकळ्या बनवून फुलांची निर्मिती करण्याचा सुरू केला. सुरुवातीला हा प्रवास सोपा नव्हता. या कचरा समजल्या जाणाऱ्या या मक्याच्या साध्या पण उपेक्षित पानांतून आकर्षक फुलांचे गुच्छ, हार, बुके, आणि सजावटीच्या वस्तू बनवण्याची नवी संकल्पना रचली आणि या उपक्रमातून उगम पावलेली फुलांची रोजगारक्रांती शेकडो महिलांच्या आयुष्याला नवी उमेद देणारी ‘सोन्याचे धान्य’ ठरली आहे.
माधुरी देवानंद पवार यांनी आपल्या कलात्मक दृष्टिकोनातून या पानांना अमूल्य कलाकृतीत रुपांतरीत केले, ज्यामुळे ग्रामीण महिलांच्या हाताला नवी ताकद मिळाली आहे. प्रत्येक फुलगुच्छ, बुके किंवा सजावटीची वस्तू ही फक्त सुंदर नाही, तर मेहनत, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचा संगम आहे. या उपक्रमामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास उजळला आहे. घराच्या चौकटीत अडकलेल्या अनेक महिलांसाठी हे काम प्रकाशवाट ठरली आहे. कमी खर्चात, स्थानिक कच्च्या मालातून आणि असंख्य रोजगारसंधी निर्माण करत, हा उपक्रम आता भक्कम आधार बनत आहे. या मक्याच्या पानांतून फुललेल्या फुलगुच्छांना आज शहरापासून ऑनलाईन प्लॅटफॉर्मपर्यंत उच्च मागणी आहे. प्रत्येक फुलगुच्छ, बुके किंवा सजावटीची वस्तू रंग,आकार आणि सर्जनशीलतेची उठावदार गुंफण दाखवते. त्यामुळे हे उत्पादन फक्त आकर्षकच नाही, तर व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. माधुरी पवार यांनी या नवकल्पनेतून दाखवले आहे की, साध्या साधनांतूनही मोठी क्रांती घडवता येते. मक्याची फेकली जाणारी पाने आता सोन्याचे धान्य बनली आहेत, अॅड. माधुरी पवार यांच्या पुढाकारामुळे साध्या मक्याच्या पानांतून उमललेली ही रोजगारक्रांती आज शेकडो महिलांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. कचऱ्यातून कलेचा जन्म घडवत माधुरीने जानेफळ सर्कलमधील हिवरा खुर्द येथे काही महिलांना एकत्र करून प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या. या कार्यशाळांना अनपेक्षितपणे मोठा प्रतिसाद मिळाला. हाताला काम हवं होतं, पण संधी नव्हती, या उपक्रमाने त्यांना घरी बसून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. या फुलांच्या रोजगारनिर्मितीचे नवे दालन उघडले असून, सखी रिसायकल अॅड. माधुरी देवानंद पवार हा अभिनव उपक्रम स्थानिक रोजगारनिर्मितीला बळ देणारा महत्वाचा प्रकल्प ठरत आहे.
मक्याच्या पानांतून उमलले फुलं… आणि उमलली आशा
अॅड. माधुरी देवानंद पवार आपल्या हिवरा खुर्द गावातील शेतात उभी होती. त्यावेळी वाऱ्याची हळूवार झुळक आली आणि मक्याच्या काडय़ांचे ढीग वाऱ्याने हलत होते. शेतातील कापणी नुकतीच संपली होती आणि मक्याच्या पानाचे मोठाले झुटके मजुरांनी एकीकडे टाकून दिले होते. या उरलेल्या पानांचा उपयोग काहीच नसल्याने ते बहुतेकदा जाळले जात, किंवा तणासारखे विखुरुन पडत. पण माधुरी पवार यांच्या नजरेला या पानांत काही वेगळ दिसलं-कचरा नव्हे, तर सामर्थ्य. प्रयोग सुरू झाला. मक्याच्या पानांना कोमलता देण्यासाठी पाणी, नंतर सुकवणी, त्यानंतर कोरीवपणाने आकार देऊन फुलांच्या पाकळ्यांसारखा पातळपणा तयार करणे-हा सगळा प्रक्रियेचा अभ्यास माधुरीने स्वतः केला. सुरुवातीला अनेकदा अपयश आलं. पानं फाटायची, आकार बिघडायचे, रंग बसत नसे. पण तिचा हट्ट कायम होता. आणि अखेर, एका दिवशी तिच्या हातात पहिलं सुंदर फूल उमटलं. मक्याच्या पानांचं बनलेलं, मऊसूत, नैसर्गिक, सौंदर्यपूर्ण. ते फूल फक्त एक हस्तकला नव्हतं-ते होतं आशेचं पहिलं दान.

