ताजे अपडेट

माणसांवर विश्वास पेरणारा नेता: नंदूभाऊ बोरे (माजी कृषी सभापती, जि.प.बुलढाणा )

घाटबोरी, प्रतिनिधी

 

माणसांवर विश्वास पेरणारा नेता: नंदूभाऊ बोरे (माजी कृषी सभापती, जि.प.बुलढाणा )

माणसाचं आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही. ते वळणावळणाचं असतं, चढउतारांनी भरलेलं असतं. कधी संपन्नतेची ऊब मिळते, तर कधी अडचणींची थंडी बोचते. पण या सर्व चढउतारांतही जो माणूस आपली माणुसकी, मूल्यं आणि समाजाबद्दलची जबाबदारी जपतो, तोच खऱ्या अर्थाने मोठा ठरतो. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील चिंचोली बोरे या छोट्या गावातून उभे राहिलेले भूमिपुत्र नंदूभाऊ बोरे यांचा जीवनप्रवास हाच मूल्यनिष्ठ जगण्याचा जिवंत दस्तऐवज आहे. १२ ऑक्टोबर १९५९ रोजी एका सधन शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील कडूबा बोरे हे परिसरातील नावाजलेले सदन शेतकरी, शंभर एकर शेती, ट्रक आणि आडत दुकानाचा भक्कम संसार सांभाळत होते. आई गुंफाबाई यांच्या संस्कारांनी घरात कष्ट, शिस्त आणि माणुसकीची बीजं रुजलेली होती. तीन भावांमध्ये नंदूभाऊ सर्वात मोठे. बालपण सुरक्षित होतं आणि भविष्य उज्ज्वल वाटत होतं. गावच्या जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर मेहकर येथील एम.ई.एस. हायस्कूलमध्ये आठवी ते बारावीपर्यंतचा प्रवास त्यांनी उत्कृष्टरीत्या पूर्ण केला. विज्ञान शाखेत बारावीला ८२ टक्के गुण मिळवणारा हा विद्यार्थी सहज वैद्यकीय शिक्षणाकडे वळू शकला असता, कारण त्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी आवश्यक गुण मर्यादेच्या कमी होते. आयुष्याने त्यांच्यासाठी मोठी स्वप्नं सजवली होती, पण नियतीने अचानक कठोर वळण घेतलं. बारावीच्या काळातच वडिलांचे हृदयविकाराचा झटका लागून निधन झाले. घराचा आधार हरपला. संपत्ती असूनही कुटुंब पोरकं झालं आणि मोठ्या मुलाच्या खांद्यावर सर्व जबाबदारी येऊन पडली. शिक्षणाची स्वप्नं, डॉक्टर होण्याची आकांक्षा, उज्ज्वल भविष्य हे सगळं बाजूला ठेवावं लागलं. हा त्यांचा पहिला मोठा धक्का होता, पण त्यांनी परिस्थितीसमोर मान झुकवली नाही. शिक्षण थांबलं, पण संघर्ष थांबला नाही. घरचा ट्रक त्यांनी स्वतः चालवायला सुरुवात केली. जवळपास चार वर्षे देशभर ट्रक चालक म्हणून फिरत त्यांनी केवळ आर्थिक कमाई केली नाही, तर माणसं आणि जीवनाचं महत्व शिकलं. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि उत्तर भारतातील रस्त्यांवरच्या अनुभवांनी त्यांना श्रमाची किंमत, माणसाला माणूस म्हणून वागवण्याचं महत्त्व आणि जबाबदारीची खरी ओळख करून दिली. या काळात त्यांनी वडिलांच्या काळातील बेबाकी फेडली, शेती आणि आडत दुकान सांभाळलं, आणि जबाबदारी म्हणजे काय, याची खरी शिकवण घेतली. काही वर्षांनंतर ट्रक विकून त्यांनी मेहकर सुलतानपूर हायवेवर स्वतःच्या शेतात परमिट रूम, गार्डन रेस्टॉरंट आणि मटण हॉटेल सुरू केलं. व्यवसाय भरभराटीत गेला, प्रवासी, ट्रकचालक आणि स्थानिक लोकांची सतत गर्दी असायची. मात्र नंदूभाऊंचं हॉटेल फक्त व्यवसायाचं ठिकाण नव्हतं; ते माणुसकीचं केंद्र होतं. कारण त्यांनी स्वतः तो रस्ता चाललेला होता, त्यामुळे ते अडचणीत असलेल्या लोकांना आपुलकीने मदत करत. याच ठिकाणी त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारी भेट घडली. तत्कालीन माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक आणि प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे जेवणासाठी आले. सहज संवादात नंदूभाऊंचा आत्मविश्वास, स्पष्ट बोलणं आणि माणसांशी जोडण्याची हातोटी त्यांना लक्षात आली. तेथूनच युवक काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी मिळाली, आणि नंदूभाऊंनी ती स्वीकारली. सार्वजनिक जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला. राजकारणात त्यांची वाटचाल संथ पण ठाम होती. युवक काँग्रेसमध्ये काम करताना त्यांनी लोकांशी नातं जोडायला सुरुवात केली. १९९५ साली मेहकर तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपद, पुढे बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीसपद ही पदं त्यांनी भूषवली आणि, कार्यातून अर्थपूर्ण केली. १९९५ ते २००० या काळात ते मेहकर पंचायत समितीचे सदस्य झाले. लोकांचे प्रश्न, शेती, पाणी, रोजगार यांच्याशी थेट सामना करत त्यांनी राजकारणाची खरी बाजू अनुभवली. २००२ साली चिंचोली बोरे जिल्हा परिषद सर्कलमधून ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. पहिल्याच टर्ममध्ये त्यांना जिल्हा परिषद बुलढाणा कृषी सभापती म्हणून निवड मिळाली. कृषी सभापती म्हणून त्यांच्या कारकीर्दीत जिल्ह्यात कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी समाजासाठी समाजहिताची अनेक महत्त्वपूर्ण कामे झाली. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन योजना प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत पोहोचवण्यावर त्यांनी भर दिला. पाणी व्यवस्थापन, शेततळे, विहीर पुनर्भरण, ठिबक व तुषार सिंचन, बियाणे व खतवाटपातील पारदर्शकता, पीकविमा योजना, शेतकरी प्रशिक्षण शिबिरे या सर्व बाबींवर त्यांनी सातत्याने लक्ष ठेवले. शेतकऱ्यांशी संवाद, गावागाव भेटी आणि तक्रारींचं थेट निराकरण या माध्यमातून त्यांच्यावर शेतकरी वर्गाचा विश्वास बसला. सत्ता त्यांच्या डोक्यावर गेली नाही; उलट जबाबदारीची जाणीव अधिक तीव्र झाली. जिल्हा परिषदेत प्रवेश करताना त्यांनी बैलगाडीतून प्रवेश केला हा केवळ देखावा नव्हता; तो शेतकरी माणसाशी असलेल्या नात्याचं प्रतीक होता. २००५ साली पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी गेले असताना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा नैतिक निर्णय घडला. हॉटेल आणि बियर बारमधून येणारा पैसा भरपूर होता, पण त्या पैशामागची सामाजिक किंमत त्यांना जाणवू लागली. अनेक घरांचे संसार उद्ध्वस्त होणे, व्यसनाधीनता या सर्वांचा अप्रत्यक्ष भाग आपण आहोत, ही जाणीव त्यांना टोचू लागली. त्या क्षणी त्यांनी दारूचा व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचा ठाम निर्णय घेतला, परवाना परत केला आणि जेसीबी लावून बियर बारची इमारत तोडली. दारूच्या जागी त्यांनी ‘राजीव गांधी वरिष्ठ महाविद्यालय’ सुरू केलं. संस्थेला ‘श्री विठ्ठल’ हे नाव दिलं. आज त्या ठिकाणी महाविद्यालय, विज्ञान शाखा आणि इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू आहे. व्यसनाच्या जागी विद्या आली, अंधाराच्या जागी प्रकाश आला. नंदूभाऊ बोरे यांचा जीवनप्रवास पाहिला की जाणवतं हा प्रवास पैशातून मूल्यांकडे जाणारा आहे. संपत्ती असूनही अहंकार नाही, सत्ता असूनही माज नाही, श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही. काँग्रेस पक्षाशी असलेली निष्ठा, शेतकरी समाजासाठी केलेली सेवा आणि कृषी सभापती म्हणून दिलेला ठसा त्यांना वेगळं स्थान देतो. नंदूभाऊ बोरे यांचं आयुष्य आपल्याला एकच शिकवतं माणूस मोठा होतो तो पदांनी नाही, तर निर्णयांनी, आणि जे निर्णय समाजाच्या भल्यासाठी घेतले जातात, तेच आयुष्याला खरा अर्थ देतात.

सत्ता सेवा करण्यासाठी, नफ्यासाठी नाही

नंदूभाऊ बोरे हे माजी कृषी सभापती असताना काँग्रेस पक्षासोबत निष्ठावान राहून शेतकऱ्यांच्या हृदयाशी घट्ट नाते जोडणारे नेते ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील कृषी विभागातून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ पोहोचतील अशा योजनांची अंमलबजावणी केली गेली. पीक विमा, सुधारित बियाणे, खत वितरण, प्रशिक्षण शिबिरे, कृषी मार्गदर्शन मेळावे आणि पाणी व्यवस्थापन हे त्यांच्या प्रमुख उपक्रमांमध्ये होते. कागदावरच्या योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात, हा त्यांचा कटाक्ष होता. शेती हा केवळ व्यवसाय नसून जीवनाचा पाया असल्याची जाणीव त्यांनी कायम ठेवली. जिल्हा परिषद आणि कृषी विभाग यांच्यातील समन्वय वाढवून त्यांनी शेतकऱ्यांचा आत्मविश्वास उंचावला. कृषी कार्यालये भीतीची ठिकाणे न राहता मदतीची दारे बनली. नंदूभाऊंचे नेतृत्व आदेश देणारे नव्हते; ते शेतकऱ्यांसोबत उभे राहणारे, मार्गदर्शन करणारे, प्रोत्साहन देणारे आणि हृदयाशी नाते जोडणारे होते.
काँग्रेस पक्षाच्या लोककल्याणकारी विचारांशी निष्ठा राखत त्यांनी दाखवून दिले की सत्ता म्हणजे सेवा, आणि समाजहितासाठी घेतलेले निर्णयच खरे यश ठरतात.

———————————————

संतोषजनक लेखणीतून….✍️
संतोष अवसरमोल (पत्रकार/लेखक)
मु+पो.घाटबोरी, ता. मेहकर, जि. बुलढाणा
मो:-9689777129

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका