पत्रकारांची लेखणीच खुर्ची घडवते आणि खुर्ची कोसळवतेही : सिताराम महाराज ठोकळ
घाटबोरी, प्रतिनिधी

पत्रकारांची लेखणीच खुर्ची घडवते आणि खुर्ची कोसळवतेही : सिताराम महाराज ठोकळ
“पत्रकारांच्या लेखणीतच खुर्ची उभारण्याची आणि खुर्ची कोसळवण्याची प्रचंड ताकद आहे. एवढेच नव्हे, तर पत्रकारांची लेखणी भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढते, चांगल्या-चांगल्या भ्रष्टप्रवृत्तीला वढणीवर आणते आणि सत्य समाजासमोर मांडून समाजाला न्याय मिळवून देते. म्हणूनच पत्रकार समाजाचा आरसा आहे, आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे.” असे प्रतिपादन सिताराम महाराज ठोकळ यांनी जानेफळ येथे केले. ते राष्ट्रमाता जिजाऊ मॉ. साहेबांच्या जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त तसेच विवेकानंद अर्बन को-ऑपरेटिव सोसायटीच्या वर्धापनदिन व पत्रकारदिनाच्या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपाचे मेहकर तालुकाध्यक्ष ॲड. शिव ठाकरे यांनी केले होते. यावेळी मेहकर-लोणार तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठोकळ म्हणाले की, पत्रकारिता ही फक्त बातम्या देणे किंवा घटना मांडणे नाही, तर समाजातील भ्रष्टाचार उघड करणे, समाजाला न्याय मिळवून देणे आणि सत्याचे वास्तव लोकासमोर आणणे हाच मुख्य हेतू आहे. “पत्रकार समाजाचा आरसा असतो. त्यांच्या लेखणीमुळे देशातील घडामोडी लोकांपुढे येतात. आजही सोशल मीडियावर माहिती असली तरी वृत्तपत्रातील बातमी वाचल्याशिवाय लोकांचा विश्वास बसत नाही आणि समाधान होत नाही,” असे सिताराम महाराज ठोकळ यांनी स्पष्ट केले.
यापुढेही ठोकळ म्हणाले की, ॲड. शिव ठाकरे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी विवेकानंद अर्बन बँक स्थापन केली. आज या बँकेचे पाळेमुळे खोल रुजल्यामुळे ती समाजातील गरीब, निराधार, अपंग आणि कष्टकरी वर्गासाठी वटवृक्षासारखी फोफावली आहे, तिच्या सावलीत अनेक जण आश्रय घेतात. याच माध्यमातून “ॲड. शिव ठाकरे गेल्या पाच वर्षांपासून पत्रकारांचा सत्कार करत आहेत. त्यांना आगळेवगळ्या गिफ्टसह सन्मानित करीत आहेत. तसेच ते समाजातील वंचितांना मदत करण्यास नेहमी तत्पर असतात, परंतु त्या दानाची कुठेही प्रसिद्धी करत नाहीत. त्यांचे कार्यकर्तृत्व, मातृत्व आणि दानशूर वृत्तीचे एक आदर्श उदाहरण आहे. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजपाचे जेष्ठ नेते सतिष कुलकर्णी, ग्रा. पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोदबापू देशमुख, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे, भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष प्रल्हाद अण्णा लश्कर, सरपंच शंकर गायकवाड, माजी सरपंच गजानन चनेवार, जेष्ठ पत्रकार उद्धव फंगाळ, विजयराव जंजाळ, अशोकराव निकस, अनिल मंजुळकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यापुढे ही बोलताना सिताराम महाराज ठोकळ यांनी सांगितले की, पत्रकारच सत्य समाजासमोर आणतात. समाजात न्याय, पारदर्शकता आणि सुव्यवस्था निर्माण करण्याची खरी ताकद त्यांच्या लेखणीत आहे. पत्रकारांची लेखणी समाज बदलण्याचे शक्तिशाली साधन आहे. तर “पत्रकार समाजातील दुर्बल, गरीब आणि वंचितांचा आवाजही आहेत. त्यांची लेखणी भ्रष्टाचार, अन्याय, फसवणूक आणि सामाजिक विषमता उघड करते. यामुळे समाजातील संतुलन राखले जाते आणि लोकशाही मजबूत होते. प्रामाणिक पत्रकारिता समाजातील बदल घडवण्याची क्षमता ठेवते, आणि तीच खरी ताकद आहे, असे बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार हमीद मुल्लाजी यांनी केले, तर आभारप्रदर्शन पत्रकार विष्णु आखरे यांनी केले.
निःस्वार्थतेतून समाजसेवा करणारी संस्था: ॲड. शिव ठाकरे
स्वामी विवेकानंदांच्या आदर्शातून प्रेरित होऊन १२ जानेवारी २०२१ रोजी स्थापन झालेली विवेकानंद अर्बन को-ऑपरेटिव सोसायटी फक्त आर्थिक संस्था नाही, तर सहकार क्षेत्रात सकारात्मक बदल घडवणारी चळवळ आहे. त्याचाच दृष्टिकोन घेऊन स्थापन झालेली विवेकानंद फाउंडेशन सेवा, समर्पण आणि निस्वार्थतेच्या मूल्यांवर आधारित असून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि गरजू, वृद्ध व दिव्यांग घटकांच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत आहे. संस्था केवळ विचारांची नाही, तर कृतीची ताकद दाखवते. समाजात प्रत्यक्ष बदल घडवणे हा या संस्थांचा ठाम उद्देश आहे. थोर महापुरुषांच्या जयंती साजरी करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आरोग्य शिबिरे, पत्रकारांचा सन्मान, धार्मिक कार्यक्रमांत पाणी वाटप, कॅन्सर रुग्णांसाठी जनजागृती व मदत, तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देणे, अशा विविध उपक्रमांमधून संस्था समाजाच्या प्रत्येक स्तरावर सकारात्मक परिणाम करत आहे. तर विवेकानंद अर्बन आणि विवेकानंद फाउंडेशन समाजाच्या सेवा कल्याणासाठी निस्वार्थ योगदान देत आहेत. असे विवेकानंद अर्बन को-ऑपरेटिव सोसायटी बॅकचे अध्यक्ष तथा भाजपाचे मेहकर तालुकाध्यक्ष ॲड. शिव ठाकरे यांनी प्रास्ताविक भाषणात माहिती दिली.



