जेष्ठ वयोवृद्ध नागरिक हेच गावाचे खरे वैभव : अपर पोलीस अधीक्षक अमोलजी गायकवाड
घाटबोरी, प्रतिनिधी

जेष्ठ वयोवृद्ध नागरिक हेच गावाचे खरे वैभव : अपर पोलीस अधीक्षक अमोलजी गायकवाड
वयोवृद्ध नागरिक हे गावाचे खरे वैभव असून अनुभवाचा, ज्ञानाचा आणि संस्काराचा खजिना आहेत. ते तरुण पिढीला दिशा दाखवणारे आधारस्तंभ असून त्यांच्या विचारांनी आणि संस्कारांनी गावाचे सामाजिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध होते. त्यांच्या सन्मानाने आणि सुरक्षिततेमुळेच गावाचे खरे मांगल्य टिकून राहते, असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक अमोलजी गायकवाड यांनी घाटबोरी जिल्हा परिषद शाळेत केले. मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथे आयोजित जातीय सलोखा, सुसंवाद आणि सन्मान कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुढे सांगितले की, धोती-टोपी परंपरा जपणारी जेष्ठ वयोवृद्ध नागरिक ही शेवटची पिढी आहे आणि भविष्यात हा पारंपरिक पेहराव दुर्मिळ होत चालला आहे. यासाठी, विद्यार्थी मित्रांनो, आपण जेष्ठ वयोवृद्ध नागरिकांचा आदर करण्याचे शिकल पाहिजे, कारण त्यांच्याकडे अनमोल संस्कारांचा खजिना आहे. त्यांच्या संस्कारातून माणूस आयुष्यात समृद्ध होतो, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानबापाटील नवले तर व्यासपीठावर मार्गदर्शक, अपर पोलीस अधीक्षक अमोलजी गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडे, गटविकास अधिकारी दिनकरराव खरात, कृषी अधिकारी संदीप मेटांगळे, मंडळ अधिकारी महादेव गायकवाड, ठाणेदार अमरनाथ नागरे, जेष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार, सरपंच राजकुमार पाखरे, माजी सरपंच गजानन चनेवार, पत्रकार संतोष अवसरमोल, ग्रामविकास अधिकारी शरद वानखेडे, माजी केंद्र प्रमुख सु. ग. देशमुख, पत्रकार अंकुश राठोड, राजू पाटील नवले, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडे यांनी सांगितले की, “माझे आई-वडील ऊसतोड कामगार मजूर होते. त्यांच्या हातातील कोयता सोडविण्यासाठी मी शिक्षण घेतले आणि पोलीस अधिकारी झालो. आपणही आप-आपल्या आई-वडीलांचा संघर्ष आणि मेहनत पाहून अभ्यास करून मोठे अधिकारी व्हावे.” असे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडे यांनी सांगितले, सदर कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांना टोपी-रुमाल देऊन गौरविण्यात आले, तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये उज्ज्वल शरद वानखेडे यांना सैनिक स्कूल पुरस्कार, योगीता अशोक हिवराळे, मयुरी उमेश सोनुने, राणी पवार, यश जाधव, संजीवनी चव्हाण, प्रतिक्षा मुळे, अदिती धेवडे, निकीता अंभोरे यांना क्रीडा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच, तालुक्यातील जेष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार, श्रीकृष्ण काकडे, कैलास राऊत, जमीर शहा, संतोष थोरहाते, सचिन गाभणे, विष्णू पाटील आखरे, समाधान मस्के, जैनुल आबेद्दीन शेख, शेख सादिक शेख कुरेशी, यांना सत्यशोधक लेखणीचा शिलेदार हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले, हमीद मुल्लाजी, प्रदीप सरदार, समाधान पदमने यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले, यासोबतच अनाथ आश्रमाचे ह.भ.प. वैष्णव सहदेव ठोकरे महाराज यांना अनाथ सेवा पुरस्कार, मधुकर वानखेडे यांना आदर्श गटशिक्षणाधिकारी पुरस्कार, डॉ. स्वप्निल चव्हाण, डॉ. सुधीर पाखरे, डॉ. गजानन उल्हामाले , यांना मानवतेचा आरोग्यदुत पुरस्कार, डॉ कृष्णा हावरे यांना समाजसेवा गौरव पुरस्कार, बसवलिंग आप्पा डोंगरे यांना मुकप्राणी करुणासेवा पुरस्कार, संतोष दामोदर डोंबळे यांना ज्ञानपीठ सन्मान पुरस्कार, तर नामदेव जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन माजी सरपंच तसेच ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष गजानन चनेवार व पत्रकार संतोष अवसरमोल यांनी केले, तर बहारदार सूत्रसंचलान डॉ. कृष्णा हावरे यांनी केले.
फुलांची उधळण अन् बैलगाडीतून मिरवणूक…
घाटबोरी येथे अपर पोलीस अधीक्षक अमोलजी गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडे आणि सरपंच राजकुमार पाखरे, माजी सरपंच गजानन चनेवार यांचा पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि फुलांची उधळण करत एसटी बसस्थानकापासून जिल्हा परिषद माध्यमिक शाळेपर्यंत ही मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या आगळ्यावेगळ्या मिरवणुकीत बैलगाडी चालविण्याचा सारथी म्हणून पत्रकार संतोष अवसरमोल यांनी जबाबदारी समर्थपणे पार पाडली. पारंपरिक संस्कृतीच्या या उपक्रमाने उपस्थितांची मने जिंकली असून, सर्वत्र या सोहळ्याचे कौतुक होत आहे.



