
विधवा नव्हे… ती तिन्ही जगाची जननी: ॲड. माधुरी देवानंद पवार
ही वास्तवदर्शी हकीकत आहे एका निडर स्त्रीची–ॲड. माधुरी देवानंद पवार यांनी जुन्या रूढी-परंपरांना फाटा दिला. एका लग्नसमारंभात एक विधवा आई आपल्या मुलीला हळदीकुंकू लावू शकत नव्हती, कारण समाजाने तिच्या हातांना “अपशकुन” ठरवले होते. त्या क्षणी एका तरुण स्त्रीच्या मनात प्रश्न पेटला, का आईला अपशकुन मानलं जातं? त्या क्षणी त्या तरुण स्त्रीला जाणवलं की अंधश्रद्धा किती खोलवर रुजलेली आहे. जे हक्क आणि प्रेमाने भरलेले आहे, त्यावर समाजाने बंदिशा घालून ते दुर्बल केले आहे. या विचाराने तिच्या हृदयात ज्वाला पेटली. तिच्या मनात ठरलं की अन्याय थांबवण्यासाठी काहीतरी करायचं, भीतीला मागे सोडून प्रश्न विचारायचा. तिने निडरपणे ठरवलं की त्या अंधश्रद्धेला सामोरे जावं, समाजाला दाखवावं की प्रेम, आशीर्वाद आणि माणुसकीला “अपशकुन” ठरवणं चुकीचं आहे.
एका लग्नसमारंभात घडलेला तो क्षण तिच्या आयुष्याचा वळणबिंदू ठरेल, याची कल्पना त्या वेळी कुणालाच नव्हती… तो दिवस इतरांसाठी आनंदाचा, मंगलतेचा, उत्सवाचा होता; पण एका विधवा आईसाठी तो दिवस तिच्या अंतःकरणाला छेद देणारा ठरला. आणि त्या वेदनेनेच एका स्त्रीच्या मनात परिवर्तनाची ज्योत पेटवली.
मंडपात मंगलाष्टकांचे सूर आकाशात झेपावत होते. शहनाईचा मधुर नाद वातावरणात दरवळत होता. फुलांच्या हारांनी सजलेला मंडप, केशर-चंदनाचा सुगंध, नवरीच्या हातावर उमटलेली सोनसळी हळद, तिच्या डोळ्यांत दाटलेली स्वप्नं… सर्वत्र आनंदाचं, मंगलतेचं, शुभत्वाचं वातावरण होतं. नवरी पाटावर बसली होती, लाजऱ्या हास्याने उजळलेला तिचा चेहरा, केसात फुलांची माळ, कपाळावर कुंकवाची रेष. आयुष्याच्या नव्या अध्यायाच्या उंबरठ्यावर उभी असलेली ती.
पण या साऱ्या उत्साहाच्या गर्दीत एक कोपरा मात्र वेगळाच होता.
महिलांच्या गोळक्यात एक आई बसली होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू सतत ओघळत होते. ती स्वतःचा पदर डोळ्यांवर ठेवून पुन्हा पुन्हा अश्रू पुसत होती. तिच्या मुलीचा हळदीचा सोहळा सुरू होता, पण तिचे हात मात्र रिकामे होते. त्या हातांना मुलीच्या गालांवर हळद लावण्याचा अधिकार नव्हता. त्या हातांना शुभत्वाचा स्पर्श देण्याची परवानगी नव्हती. कारण ती विधवा होती. तिच्या कपाळावर कुंकु नव्हतं, म्हणून समाजाने तिच्यावर अपशकुनी परंपरेचा शिक्का मारला होता. त्यावेळी ॲड. माधुरी देवानंद पवार त्या गोळक्यातच बसल्या होत्या. त्यांचं लक्ष त्या आईच्या डोळ्यांवर खिळून राहिलं. आनंदाच्या दिवशी आई एवढी का रडते आहे? हा प्रश्न त्यांच्या मनात उठला. त्यांनी शेजारच्या मावशीला हळूच विचारलं, “नवरीची आई एवढी का रडते आहे?” मावशीने खोल श्वास घेतला. माधुरींचा हात हलकेच दाबला आणि कुजबुजली, “मुलीचे वडील लहानपणीच गेले. ती विधवा आहे… म्हणून तिला स्वतःच्या मुलीला हळद लावू देत नाहीत. अपशकुन मानतात.”
“अपशकुन…”
तो शब्द जणू वीज कोसळल्यासारखा माधुरींच्या मनावर आपटला.
आई… आणि अपशकुन?
जगात जर कुणाचा स्पर्श सर्वात शुभ असेल, तर तो आईचा. जिच्या उदरात नऊ महिने लेकरू वाढतं, जिच्या रक्तातून त्याला प्राण मिळतो, जिच्या अंगाई गीतातून त्याला झोप मिळते त्या आईचे हात अशुभ कसे असू शकतात? त्या आईकडे पाहताना माधुरींच्या डोळ्यांत पाणी आलं. ती आई मुलीकडे पाहत होती डोळ्यांत अपार प्रेम, अभिमान, आणि एक दडपलेली वेदना. तिच्या मनात कितीदा आलं असेल “एकदा तरी माझ्या लेकराच्या गालावर हळद लावू दे…” पण समाजाच्या भीतीने तिचे हात थरथरतच थांबलेले होते.
आई… ती केवळ स्त्री नसते.
आई म्हणजे तिन्ही जगांचा स्वामी.
आईच्या पायाशी स्वर्ग असतो, आईच्या आशीर्वादात भविष्य असतं, आणि आईच्या कुशीत संपूर्ण विश्व सामावलेलं असतं. तिच्या डोळ्यांतून पडणारा प्रत्येक अश्रू सृष्टी हलवू शकतो, आणि तिच्या हसण्यातून घर उजळू शकतं. घरी परतल्यावर ॲड. माधुरी स्वस्थ बसू शकल्या नाहीत. त्यांच्या मनात सतत तोच प्रसंग फिरत होता. त्यांनी आपल्या आईला विचारलं, “आई, विधवा महिलांनी हळद-कुंकू लावू नये का? त्यांचे हात अपशकुन असतात का?”
आईने शांतपणे उत्तर दिलं, “पूर्वीपासून अशी प्रथा आहे बाळा. समाजात अपशकुन मानतात…”
माधुरींचं मन समाधान पावत नव्हतं. त्या आजीकडे गेल्या. आजीनेही तेच सांगितलं, “असं पुर्वीपासुन चालत आलंय. आमच्या काळात तर आणखी कडक नियम होते.”
“असं चालत आलंय…”
पण जे चालत आलंय तेच खरं असतं का? जर परंपरेच्या नावाखाली एका विधवा स्त्रीचा, त्या विधवा आईचा अपमान होत असेल, तर ती परंपरा जपायची का बदलायची? या विचारांनी माधुरीताईला रात्रभर झोप लागली नाही. कानात सतत तोच शब्द घुमत होता… “अपशकुन…”
विधवा आई अपशकुन असू शकते?
जगाचा निर्माता परमेश्वर असेल, पण त्या परमेश्वरालाही जन्म देणारी आईच असते. रामाला जन्म देणारी कौसल्या, कृष्णाला जन्म देणारी देवकी, शिवाला शक्ती देणारी पार्वती, प्रत्येक देवतेच्या मागे आईची छाया आहे. मग एका साध्या स्त्रीला, फक्त तिच्या कपाळावर कुंकू नाही म्हणून, अशुभ ठरवायचं? त्या क्षणी ॲड. माधुरींच्या मनात एक वाक्य चमकलं “शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे.” जर आपण शिक्षण घेतलं असेल, तर प्रश्न विचारण्याची हिंमत असलीच पाहिजे. अन्याय दिसला तर त्याला विरोध करण्याची ताकद असली पाहिजे. त्यांनी ठरवलं भीतीला सामोरं जायचं. जर विधवा महिलेच्या हातून हळद-कुंकू लावून घेतलं, तर खरंच काही अपशकुन होतो का? की तो फक्त अंधश्रद्धेचा पगडा आहे? या प्रश्नाचं उत्तर कृतीतून द्यायचं होतं. ॲड. माधुरी पवार यांनी सप्तश्रृंगी महिला अर्बन पतसंस्थेच्या माध्यमातून गावात विधवा महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केला. काहींनी टिंगल केली, काहींनी विरोध केला, काहींनी भीती व्यक्त केली “असं करून काय होणार?” पण माधुरीताई ठाम होत्या. कार्यक्रमाच्या दिवशी अनेक विधवा महिला काही आल्या, काही आल्या नाहीत. त्यांच्या कपाळावर कुंकू नव्हतं, पण त्यांच्या डोळ्यांत आयुष्याचा संघर्ष होता. काहींनी कमीवयातच पती गमावला होता, काहींनी संसार उभा केला होता, काहींनी मुलांना शिकवलं होतं. समाजाने त्यांना ‘अपूर्ण’ म्हटलं होतं, पण त्या मनाने पूर्ण होत्या कारण त्या आई होत्या.
आई कधी अपूर्ण नसते.
आई म्हणजे संपूर्ण सृष्टीचा आधार.
ती आपल्या लेकरासाठी उपाशी राहते, पण लेकराला कधी उपाशी ठेवत नाही. ती स्वतःच्या स्वप्नांना माती देऊन लेकरांच्या स्वप्नांना पंख देते. उभारी देते, तिच्या मायेपुढे सृष्टीही नतमस्तक होते. ॲड. माधुरी पवार व्यासपीठावर उभ्या राहिल्या. त्यांच्या आवाजात थरथर होती, पण डोळ्यांत ज्वाला होती. “आज आपण एक प्रश्न विचारणार आहोत, आई अपशकुन असते का?”
सभागृहात शांतता पसरली.
त्यांनी एका विधवा महिलेला पुढे बोलावलं. ती महिला घाबरत पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर संकोच, डोळ्यांत भीती. माधुरी तिच्यासमोर नम्रपणे उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, “ताई, माझ्या कपाळावर हळद-कुंकू लावा.” खरचं मला अपशकुन होतो का? पाहुया…
क्षणभर वेळ थांबला.
लोकांच्या नजरा त्या दोघींवर खिळल्या. त्या महिलेचे हात थरथरत होते. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी तिच्या हातांना पुन्हा सन्मान दिला होता. ज्या हातांना समाजाने अशुभ ठरवलं, तेच हात आज शुभत्व देणार होते.
थरथरत्या हातांनी तिने माधुरींच्या कपाळावर हळद लावली… मग कुंकू लावलं…त्या कुंकवाच्या ठिपक्यात केवळ रंग नव्हता, तो होता आत्मसन्मानाचा पुन्हा जन्म.
क्षणभर सगळे स्तब्ध. काहीच अपशकुन झाला नाही. आकाश शांत होतं. हवा शांत होती. पण मनात एक वादळ उठलं होतं बदलाचं वादळ. त्या क्षणी समाजाच्या अंधश्रद्धेवर पहिला प्रहार झाला. ॲड. माधुरींच्या डोळ्यांत अश्रू होते, पण ओठांवर हसू होतं. त्यांनी फक्त स्वतःच्या कपाळावर कुंकू लावून घेतलं नव्हतं त्यांनी एका आईचा सन्मान परत आणला होता. जुन्या रुढी परंपरांना फाटा देण्याचा प्रयत्न केला होता. त्या दिवसापासून त्या गावोगावी फिरू लागल्या. विधवा महिलांचे सन्मान सोहळे घेऊ लागल्या. त्यांच्या हातून स्वतःच्या कपाळावर हळद-कुंकू लावून घेऊ लागल्या. प्रत्येक कार्यक्रमात त्या ठामपणे सांगतात. “ विधवा आईचे हात कधीही अपशकुन नसतात. आई-आईच असते म्हणजे आई तिन्ही जगाचा स्वामी आहे, जननी आहे. तिच्या पायाशी स्वर्ग आहे, तिच्या मायेने पृथ्वी फुलते, आणि तिच्या आशीर्वादाने भविष्य घडतं.” आज अनेक गावांत हळदीकुंकवाच्या कार्यक्रमातून सामाजिक बदल दिसतो आहे. काही ठिकाणी विधवा आई माधुरीताईला हळदीकुंकू लावण्यासाठी पुढे येत आहेत असे माधुरीताई सांगत आहेत. पण काहींच्या डोळ्यांत अजूनही भीती आहे, त्या भीतीवर प्रश्न उभा राहिला आहे. त्या लग्नातील रडणाऱ्या आईचे अश्रू व्यर्थ गेले नाहीत. त्या अश्रूंनी एका स्त्रीच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटवली. आज ती ठिणगी प्रकाश बनून पसरते आहे. कारण समाज जुन्या रुढी परंपरांना फाटा बसतोय, तो एका मोठ्या घोषणेने नाही, तो बदलतो एका आईच्या सन्मानासाठी उभ्या राहिलेल्या एका ठाम स्त्रीमुळे.
आई म्हणजे केवळ नातं नाही.
आई म्हणजे सृष्टी.
आई म्हणजे श्रद्धा.
आई म्हणजे तिन्ही जगाचा स्वामी.
आणि जिथे आईचा सन्मान होतो, तिथेच खऱ्या अर्थाने शुभत्व जन्म घेतं. ही वास्तवदर्शी हकीकत आहे ॲड. माधुरी देवानंद पवार यांच्या धाडसी कर्तृत्वाची …..
——————————————–
संतोषजनक लेखणीतून….
संतोष अवसरमोल
मो:-9689777129



