ताजे अपडेट

सत्तेला आरसा दाखवणारा जेष्ठ संपादक : डॉ. राजेश राजोरे

घाटबोरी, प्रतिनिधी

 

सत्तेला आरसा दाखवणारा जेष्ठ संपादक : डॉ. राजेश राजोरे

पत्रकार हा सत्तेचा प्रवक्ता नसतो. तो सत्तेचा नोकरही नसतो. पत्रकार हा सत्तेला जाब विचारणारा असतो. व्यवस्थेच्या मानेवर बसून प्रश्न विचारणारा असतो. समाजाच्या बाजूने उभा राहणारा कान, डोळा आणि आवाज म्हणून समाजाचा प्रतिनिधी असतो. पण आजची वास्तवस्थिती वेगळी आहे. बहुसंख्य माध्यमांनी ही जबाबदारी सोडली आहे. जाहिरातींच्या मोहात, राजकीय दबावाखाली, वैयक्तिक स्वार्थाच्या गोंधळात आणि भीतीच्या सावटाखाली सत्य लपवले जाते. अशा परिस्थितीत जे पत्रकार तडजोड नाकारतात, जे सत्तेपुढे झुकत नाहीत, जे गप्प बसण्यास नकार देतात, ते व्यवस्थेला खटकतात. महाराष्ट्रात असे खटकणारे, न झुकणारे आणि न विकले जाणारे पत्रकार फार थोडे आहेत. त्यात ठळकपणे पुढे येणारे नाव म्हणजे डॉ. राजेश राजोरे. ग्रामीण पत्रकारितेचा अर्थ केवळ गावच्या बातम्या छापणं नाही, हे डॉ. राजोरे यांनी प्रत्यक्ष कामातून सिद्ध केलं आहे. ग्रामीण पत्रकारिता म्हणजे गावागावात घडणारा अन्याय, शोषण, भ्रष्टाचार, प्रशासनाची उदासीनता आणि सत्तेची दुटप्पी भूमिका उघडी पाडणं. गेली चार दशके डॉ. राजोरे यांनी हेच काम सातत्याने केले आहे. कोणतंही संरक्षण नाही, कोणताही राजकीय आशीर्वाद नाही, कोणतीही तडजोड नाही, या तीन गोष्टींच्या आधारावर त्यांनी पत्रकारिता केली आहे. त्यामुळेच त्यांची पत्रकारिता सत्तेला सोयीची नाही; ती सत्तेला अस्वस्थ करणारी आहे.
‘दैनिक देशोन्नती’ मधील ‘वास्तव’ हा स्तंभ म्हणजे आजच्या राजकीय व सामाजिक व्यवस्थेवर थेट प्रहार आहे. तर वास्तव या स्तंभातून त्यांनी पत्रकारितेचं आतलं कुजलेलं वास्तव निर्भीडपणे मांडलं. जाहिरातदारांचा दबाव, सत्तेचा हस्तक्षेप, बातम्यांवर लादली जाणारी अप्रत्यक्ष सेन्सॉरशिप आणि पत्रकारांकडून अपेक्षित असलेली लाचारी, हे सगळं त्यांनी कोणतीही भीड न ठेवता, निर्भयतेने आणि स्पष्टतेने मांडलं. अनेकांना नको असलेलं सत्य त्यांनी शब्दांत उभं केलं. त्यामुळे टीका झाली, दबाव आला, अप्रत्यक्ष धमक्या आल्या; पण लेखणी थांबली नाही. कारण ही लेखणी भीतीपोटी नाही, तर जबाबदारीपोटी लिहिते, सत्याच्या पाठीशी उभी राहते. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगांव संतनगरीत २६ फेब्रुवारी १९६८ रोजी जन्मलेले डॉ. राजेश राजोरे हे महाराष्ट्र शासन पुरस्कृत अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ संपादक आहेत. पत्रकारितेतील पीएच.डी. आणि एम.ए.एम.सी.जे. या पदव्या त्यांनी केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष पत्रकारितेत उतरवल्या आहेत. शिक्षण आणि अनुभव यांचा संगम त्यांच्या लेखनात दिसतो. त्यामुळे त्यांचं लिखाण अभ्यासपूर्ण आहे, पण कोरडं नाही. ते शास्त्रीय आहे, पण निर्जीव नाही. ते पुस्तकात बंदिस्त नाही, तर रस्त्यावर चालणारं आहे, समाजाच्या हकीकतिशी निगडित आहे. सन १९८४ मध्ये ‘दैनिक महासागर’ या वृत्तपत्राचा वार्ताहर म्हणून पत्रकारितेचा श्रीगणेशा करताना त्यांनी धुळीतून, संघर्षातून आणि धोका पत्करून करियर सुरु केलं. त्या काळात पत्रकाराला ना सुरक्षा होती, ना प्रतिष्ठा. तरीही वार्ताहर ते जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांनी बातमीपेक्षा माणसाला महत्त्व दिलं. सत्तेच्या दारात उभं राहून बातमी मागण्याऐवजी त्यांनी गावाच्या चौकात उभं राहून वास्तव शोधलं. त्यांच्या पत्रकारितेतील खरी ताकद ही जमिनीवरून अनुभवलेल्या सत्यापासून मिळते. सन: १९९२ पासून ‘दैनिक देशोन्नती’च्या बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी ग्रामीण पत्रकारितेचा कणा मजबूत केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारख्या सामाजिक संकटांना त्यांनी शब्द दिले. कामगारांची पिळवणूक, महिलांवरील अत्याचार, दलित आणि वंचितांवरील अन्याय हे विषय त्यांनी कधीही बाजूला ठेवले नाहीत. प्रशासनाला सोयीचं वाटेल असं काही त्यांनी लिहिलं नाही. त्यामुळेच अनेकदा दबाव आले, अप्रत्यक्ष धमक्या आल्या; पण त्यांनी माघार घेतली नाही. कारण पत्रकारिता ही सुरक्षिततेसाठी नाही, तर सत्यासाठी असते. खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष (१९९२) असताना त्यांनी पत्रकार म्हणजे सत्तेचा नोकर नाही, हे ठामपणे सांगितलं. पत्रकारांच्या हक्कांसाठी उभं राहणं म्हणजे सत्तेला नाराज करणं असतं, हे माहीत असूनही त्यांनी ते केलं. १९९८ ते २००५ या काळात विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील देशोन्नतीच्या सर्व आवृत्त्यांची जबाबदारी सांभाळताना त्यांनी माध्यम व्यवस्थापनातही तडजोड नाकारली. माध्यम म्हणजे व्यवसाय नाही, तर सामाजिक बांधिलकी आहे, ही भूमिका त्यांनी ठामपणे धरली.
‘पत्रकारितेतील वास्तव’ हे पुस्तक माध्यमविश्वाच्या गालावर बसलेली सणसणीत चपराक आहे. पत्रकारिता कशी भरकटली आहे, कुठे विकली जाते, कुठे गप्प बसवली जाते, याचं सत्य त्यांनी उघड केलं. या पुस्तकाच्या चार आवृत्त्या निघाल्या कारण ही लोकप्रियताच नव्हे, तर गरज होती. हे पुस्तक आज पत्रकारिता अभ्यासक्रमात समाविष्ट आहे, कारण ते कल्पनांवर नाही, तर कटू सत्यावर आधारित आहे. ‘यांच्या लाथा, त्यांचे बुके’ हा लेखसंग्रह त्यांच्या धारदार लेखणीचा ठोस पुरावा आहे. लेखनात कुणाला खूश करण्याचा प्रयत्न नाही. उद्देश स्पष्ट आहे, व्यवस्थेला अस्वस्थ करणं. व्यक्तींवर नाही, प्रवृत्तींवर वार करणं. म्हणूनच त्यांच्या टीकेला कोणीही टाळू शकत नाही. डॉ. राजोरे हे केवळ टीका करणारे पत्रकार नाहीत, तर पत्रकार घडवणारे मार्गदर्शकही आहेत. पत्रकार कार्यशाळा, साहित्य संमेलने, राष्ट्रीय मीडिया सेमिनार सर्वांमध्ये त्यांनी सातत्याने मूल्यनिष्ठ पत्रकारितेचा आग्रह धरला. ब्रह्माकुमारीज मिडिया विंग राष्ट्रीय सेमिनार माउंट आबू येथे २००७ पासून ते सांगतात, पत्रकारिता ही आत्मा विकून करायची गोष्ट नाही. चार दशकांचा अनुभव त्यांच्या प्रत्येक शब्दामागे उभा आहे. आज पत्रकारितेवर जे अविश्वासाचं संकट आहे, त्याला जबाबदार कोण आहे, हे सांगताना त्यांनी कधीही बोटं वाकडी केली नाही. त्यांच्या कामाची दखल घेऊन मिळालेले पुरस्कार हे सन्मान नाहीत, तर त्यांच्या निर्भीडतेची नोंद आहेत. कारण सत्तेच्या बाजूने उभं राहणाऱ्यांना पुरस्कार सहज मिळतात; सत्तेला प्रश्न विचारणाऱ्यांना नाही. आजच्या काळात जेव्हा पत्रकारितेचा कणा मोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, तेव्हा डॉ. राजेश राजोरे यांची पत्रकारिता ठामपणे सांगते. पत्रकारिता ही भीतीपोटी गप्प बसण्यासाठी नाही, तर प्रश्न विचारण्यासाठी आहे. ती सत्तेच्या दारात उभी राहण्यासाठी नाही, तर समाजाच्या बाजूने उभी राहण्यासाठी आहे. डॉ. राजेश राजोरे म्हणजे केवळ एक व्यक्ती नाहीत. ते एक जिवंत स्मारक आहेत, आठवण आहेत की पत्रकारिता अजून संपलेली नाही. ती अजूनही जिवंत आहे. ती निर्भीड आहे, ती आक्रमक आहे, आणि सत्याच्या बाजूने उभी आहे. समाजाला सत्य दाखवण्याची जबाबदारी ही त्यांची आयुष्यभराची शिकवण आहे.

पत्रकारितेतील निर्भीड प्रवर्तक

देशोन्नतीचे आवृत्ती संपादक डॉ. राजेश राजोरे हे केवळ पत्रकार नाहीत, तर आधुनिक पत्रकारितेतील निर्भीड मार्गदर्शक आणि आदर्श आहेत. सायकलवर वर्तमानपत्र वाटण्यापासून ते देशोन्नतीसारख्या आघाडीच्या दैनिकाचे ३० वर्षांचे आवृत्ती संपादक होईपर्यंतचा प्रवास संघर्ष, चिकाटी आणि धैर्य याने उजळला आहे. त्यांनी ‘पत्रकारितेतील वास्तव’ या स्तंभातून माध्यमविश्वातील भ्रष्टाचार, जाहिरातदारांचा दबाव, सेन्सॉरशिप आणि राजकीय हस्तक्षेप निर्भीडपणे उलगडले. ‘यांच्या लाथा, त्यांच्या बुक्या’ या पुस्तकातून सामाजिक, राजकीय, पत्रकारांना साथ देतात, दबाव व धमक्या निर्भीडपणे स्वीकारतात आणि व्यवस्थेला सच्चा प्रश्न विचारतात. त्यांच्या मेहनतीची उंची हिमालयासारखी असून, त्यांनी पत्रकारितेतील सत्य, प्रामाणिकपणा आणि समाजप्रेम यांचे अमूल्य दर्शन घडवले आहे.

थोर विचारवंत मा.गो वैद्य यांचे भाष्य

थोर विचारवंत आणि प्रख्यात भाष्यकार मा.गो वैद्य यांनी डॉ. राजेश राजोरे यांचे पुस्तक “पत्रकारितेतील वास्तव” जुलै २००७ मध्ये दैनिक तरुण भारत मध्ये केलेले भाष्य हे महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या आधुनिक इतिहासावर ठसा उमठवणारे दस्तऐवज ठरले. वैद्य यांच्या मते, हे पुस्तक साधारण लेखन नाही, तर समाजासमोर सत्य उभे करणारे, व्यवस्थेच्या कुबडीवर प्रहार करणारे निर्भीड दस्तऐवज आहे. डॉ. राजोरे यांनी सामाजिक, आर्थिक आणि प्रशासनिक दोषांवर निर्भीडपणे प्रहार केला; भ्रष्टाचार, अन्याय आणि लाचारी याविरुद्ध आवाज उठविला. त्यांच्या लेखणीतून समाजशास्त्र, प्रशासन, उद्योग, शिक्षण आणि नैतिक मूल्यांचा अभ्यास करता येतो. संरक्षण, राजकीय पाठबळ किंवा आर्थिक आधार न घेता त्यांनी निर्भीडपणे सत्य मांडले, हे त्यांच्या धैर्याचे प्रमाण आहे.

———————————————

संतोषजनक लेखणीतून….✍️
संतोष अवसरमोल (पत्रकार/लेखक)
मु+पो.घाटबोरी, ता. मेहकर, जि. बुलढाणा
मो:-9689777129

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका