
शब्दांची शिदोरी आणि माणुसकीचा प्रकाश: एकनाथ आव्हाड ( बालसाहित्यिक)
मुंबईच्या चेंबूरमधील एका साध्याशा, पण प्रेरणेने भरलेल्या चाळीत आकार घेतलेलं एक बालसाहित्यिक आज मराठी बालसाहित्याच्या इतिहासात केवळ एका लेखकाची वाटचाल म्हणून पाहता येत नाही; ते एक ठोस, सशक्त आणि मूल्यनिष्ठ सांस्कृतिक विधान ठरतं. ही कथा यशाच्या उंच इमारतींची नाही, की प्रसिद्धीच्या झगमगाटात न्हालेल्या आयुष्याचीही नाही. ही कथा आहे श्रमाच्या पायऱ्यांवरून वर चढलेल्या शब्दांची, अनुभवांच्या आगीत तावूनसुलाखून निघालेल्या संवेदनशीलतेची आणि माणुसकीच्या प्रकाशात उजळलेल्या साहित्यिकाची. आज एकनाथ आव्हाड हे नाव घेताच डोळ्यांसमोर उभं राहतं ते कुठलंच झगमगाटाचं चित्र नाही; तर उभं राहतं एक शांत, संयत, पण आतून प्रखर तेज असलेलं व्यक्तिमत्त्व. त्यांच्या आयुष्याचा पाया ऐशारामावर नव्हता; तो घामावर, समाधानावर आणि माणुसकीवर रचलेला होता. म्हणूनच त्यांचं बालपण कधीच दारिद्र्याच्या सावलीत हरवलं नाही. उलट, अभावातही अर्थ शोधत, कष्टातही आनंद गवसत आणि प्रत्येक दिवसात आशेचा दिवा पेटवत ते वाढत गेले. भाजी विकून संसार उभा करणारे आई-वडील, श्रमाला प्रतिष्ठा देणारं घर, एकमेकांच्या सुख-दुःखात घट्ट गुंफलेली भावंडं, चाळीतली सामायिक आयुष्यं, अंगणातले खेळ, संध्याकाळच्या गप्पा, सण-उत्सवांची साधी पण मनापासून साजरी होणारी धूम आणि पुस्तकांचा दरवळ या साऱ्यांतून एकनाथ आव्हाड यांची जीवनदृष्टी नकळत घडत होती. त्या चाळीत खिडकीतून दिसणारी आकाशाची छोटीशी चौकटही त्यांना विशाल वाटायची, कारण त्या चौकटीतून ते स्वप्नांकडे पाहायचे. गरिबी होती, पण न्यूनगंड नव्हता. कारण त्या घरात पैशांपेक्षा माणसाची किंमत मोठी होती. हीच माणुसकी पुढे त्यांच्या साहित्याची मिणमिणती ज्योत बनली. त्यामुळेच त्यांचं लेखन हवेतल्या कल्पनांचं नसून जमिनीवर पाय रोवून उभं असलेलं आहे. त्यांच्या प्रत्येक वाक्यात जगलेल्या क्षणांची ऊब आहे, पाहिलेल्या संघर्षांची जाणीव आहे आणि जपलेल्या मूल्यांची शिदोरी आहे. एकनाथ आव्हाड हे बालमनाचे केवळ लेखक नाहीत; ते बालमनाचे खरेखुरे सहप्रवासी आहेत. त्यांच्या लेखणीत कुठेही वरचढपणा नाही, अधिकाराची भाषा नाही; आहे तो समतेचा, आपुलकीचा संवाद. ते मुलांना आदेश देत नाहीत, शिकवण्याचा आव आणत नाहीत; ते मुलांच्या शेजारी बसून, त्यांच्या नजरेतून जग पाहतात. म्हणूनच त्यांच्या साहित्याचा सूर निरागस, मोकळा आणि प्रामाणिक वाटतो. ते मुलांना घडवण्याच्या हट्टात नसतात; ते मुलांना उमलू देतात. त्यांच्या लेखनात “मुलं कशी असावी” याचा आग्रह नाही, तर “मुलं जशी आहेत तशी स्वीकारली जावीत” ही व्यापक मानवी भूमिका आहे. हीच त्यांच्या लेखनाची खरी धार आहे गोंगाट न करता, हळूच मनात झिरपणारी, पण खोलवर ठसा उमटवणारी. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत तब्बल बत्तीस वर्षे शिक्षक म्हणून काम करताना एकनाथ आव्हाड यांनी शिक्षकी पेशाला कधीच केवळ उपजीविकेचं साधन मानलं नाही. त्यांच्या दृष्टीने वर्गखोली म्हणजे चार भिंतींच्या आतली जागा नव्हे; ती एक जिवंत, सतत बदलणारी प्रयोगशाळा होती. इथे शब्दांना अर्थ मिळत होता, भावनांना दिशा मिळत होती आणि कल्पनांना उड्डाण मिळत होतं. रोज वर्गात येणाऱ्या मुलांच्या डोळ्यांत त्यांना भविष्य दिसायचं कधी भीतीनं आकसलेलं, कधी स्वप्नांनी उजळलेलं. त्या स्वप्नांना शब्द देणं, त्या भीतीला आधार देणं आणि त्या निरागसतेचं रक्षण करणं, हीच त्यांनी शिक्षक म्हणून स्वतःची जबाबदारी मानली. त्यामुळेच त्यांच्या लेखनात शिक्षकाचा उपदेशक सूर नसून मार्गदर्शकाची समजूतदार, हळुवार साथ आहे. बालसाहित्य लेखन त्यांच्या आयुष्यात कुठल्याही एका क्षणी अचानक सुरू झालेलं नाही. ते त्यांच्या जगण्यातून, दैनंदिन अनुभवांतून आणि मुलांशी सतत चाललेल्या संवादातून नैसर्गिकपणे उमललं. मुलांसाठी लिहिणं म्हणजे सोप्या शब्दांत काहीतरी सांगणं नव्हे, तर जबाबदारीनं, संवेदनशीलतेनं आणि प्रामाणिकपणे लिहिणं असतं, याची त्यांना ठाम जाणीव होती. म्हणूनच त्यांच्या कथा, कविता, काव्यकोडी, नाट्यछटा किंवा चरित्रलेखन या साऱ्यांत बालमनाचा सखोल अभ्यास, मानसशास्त्रीय समज आणि सामाजिक भान दिसून येतं. त्यांचं लेखन कधीच मुलांना कमी लेखत नाही; उलट ते मुलांच्या विचारक्षमतेवर विश्वास ठेवतं. त्यांच्या शब्दांत बालकांचा सन्मान आहे. म्हणूनच त्यांच्या पुस्तकांतून मुलांना केवळ करमणूक नाही, तर स्वतःबद्दलचा आत्मविश्वास मिळतो.
बालकविता हा एकनाथ आव्हाड यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि ताकदीचा प्रांत आहे. ‘बोधाई’, ‘गंमत गाणी’, ‘अक्षरांची फुले’, ‘शब्दांची नवलाई’, ‘छंद देई आनंद’, ‘पाऊस पाणी हिरवी गाणी’, ‘मैत्री आमची भारी’ हे संग्रह म्हणजे भाषेच्या गोडीचे, लयीच्या आनंदाचे आणि कल्पनांच्या उधाणाचे उत्सव आहेत. या कवितांमध्ये शब्द जड नाहीत, विचार बोचरे नाहीत, आणि भावना ओझ्याच्या वाटत नाहीत. त्या मुलांच्या ओठांवर सहज रेंगाळतात, मनात खेळतात आणि नकळत संस्कार रुजवतात. जोडाक्षरविरहित कवितांचा आग्रह हा केवळ भाषिक प्रयोग नाही; तो वाचनाची भीती दूर करण्याचा, भाषेशी मैत्री निर्माण करण्याचा आणि शब्दांबद्दल आपुलकी वाढवण्याचा सजग शैक्षणिक प्रयत्न आहे. या कवितांमधून भाषा ही दडपण न आणणारी, तर आनंद देणारी शक्ती आहे, हे मुलांना उमगतं. बालकथांच्या क्षेत्रात एकनाथ आव्हाड यांनी मोलाची भर घातली आहे. ‘आनंदाची बाग’, ‘एकदा काय झालं!’, ‘खळाळता अवखळ झरा’, ‘आपले सण आपली संस्कृती’, ‘घरभर दरवळणारा सुगंध’, ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’, ‘अखेर सापडली वाट’ या कथा केवळ गोष्टी सांगत नाहीत; त्या बालमनाशी थेट संवाद साधतात. नात्यांची ऊब, कुटुंबव्यवस्थेचं महत्त्व, सांस्कृतिक मुळांची जाणीव, स्वप्नांची गरज, संघर्षाचं भान आणि आशेची वाट या कथांमधून सहज उलगडते. कुठेही थेट उपदेश नाही, तरी प्रत्येक कथा मुलांच्या मनात काहीतरी उजळ, काहीतरी टिकाऊ आणि काहीतरी मार्गदर्शक सोडून जाते. या कथा मुलांना वास्तवापासून पळायला शिकवत नाहीत; त्या वास्तवाला सामोरं जाण्याची ताकद देतात.
काव्यकोडी हा बालसाहित्याचा दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. ‘मजेदार कोडी’, ‘आलं का ध्यानात?’, ‘खेळ आला रंगात’, ‘ज्ञानरंजक काव्यकोडी’ या पुस्तकांतून एकनाथ आव्हाड यांनी शिकणं ही केवळ परीक्षा पास होण्याची प्रक्रिया नसून, आनंदानं आणि कुतूहलानं घडणारी यात्रा असू शकते, हे दाखवून दिलं. निरीक्षणशक्ती, तर्कशक्ती, भाषिक जाण आणि कल्पनाशक्ती यांचा सुरेख संगम या रचनांमध्ये आढळतो. शिक्षण म्हणजे पाठांतर नव्हे, तर विचार करण्याची सवय आहे, हा संदेश या कोड्यांतून मुलांना सहज मिळतो. त्यामुळे ही पुस्तकं मुलांसाठी जितकी महत्त्वाची आहेत, तितकीच ती शिक्षक आणि पालकांसाठीही दिशादर्शक ठरतात.
नाट्यछटांमधूनही एकनाथ आव्हाड यांनी बालमनाला प्रभावीपणे स्पर्श केला आहे. ‘मला उंच उडू दे’ आणि ‘जीवाभावाचा मित्र’ या नाट्यछटा स्वप्नं पाहणाऱ्या, मैत्री जपणाऱ्या, अपयशाला सामोरं जाणाऱ्या आणि आत्मविश्वास शोधणाऱ्या मुलांचं जिवंत, भावस्पर्शी चित्र उभं करतात. या नाट्यछटा शालेय रंगमंचावर सहज सादर करता येतात आणि मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला हातभार लावतात. चरित्रलेखनाच्या क्षेत्रात ‘मिसाईल मॅन’ या पुस्तकातून त्यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचं व्यक्तिमत्त्व मुलांपर्यंत अतिशय सोप्या, पण प्रेरणादायी भाषेत पोहोचवलं. महान व्यक्ती म्हणजे दूरवरच्या नव्हे, तर मूल्यांवर उभ्या असलेल्या माणसांच्या कथा असतात, हा संदेश या चरित्रातून ठसठशीतपणे पुढे येतो. एकनाथ आव्हाड हे केवळ लेखक किंवा शिक्षक नाहीत; ते उत्कृष्ट कथाकथनकारही आहेत. हजाराहून अधिक कथाकथन कार्यक्रमांमधून त्यांनी कथेला आवाज, देहबोली आणि भावनांची धार दिली. त्यांच्या कथाकथनात श्रोते विशेषतः मुले फक्त ऐकत नाहीत, तर कथा जगतात. कथाकथनातील त्यांच्या योगदानासाठी मिळालेला ‘महाराष्ट्रातील उत्कृष्ट कथानिवेदक पुरस्कार’ हा त्यांच्या या जिवंत परंपरेचा सन्मान आहे. ‘कथाकथन तंत्र आणि मंत्र’ या कार्यशाळांमधून त्यांनी शिक्षक, पालक आणि साहित्यप्रेमींना कथा सांगण्याची कला दिली. कथा म्हणजे केवळ गोष्ट नव्हे, तर अनुभव आहे, संवाद आहे आणि मूल्यांची पेरणी आहे ही भूमिका त्यांनी सातत्यानं अधोरेखित केली. चाळीसहून अधिक पुस्तके, पाच समीक्षणात्मक ग्रंथ, हिंदी, इंग्रजी आणि ब्रेल लिपीतील अनुवाद, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ, सीबीएससी, गोवा बोर्ड आणि विद्यापीठीय अभ्यासक्रमांमधील समावेश या साऱ्यांतून त्यांच्या लेखनाची व्याप्ती, स्वीकारार्हता आणि सामाजिक जाण स्पष्ट होते. त्यांच्या बालसाहित्यावर पीएच.डी. होत आहेत, ही बाब त्यांच्या लेखनाच्या संशोधनात्मक मूल्याची साक्ष देते. ‘साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार २०२३’ हा त्यांच्या ‘छंद देई आनंद’ या संग्रहाला मिळालेला गौरव म्हणजे त्यांच्या संपूर्ण वाटचालीची अधिकृत, राष्ट्रीय पातळीवरील मान्यता आहे. त्यांनी भूषवलेली बालसाहित्य संमेलनांची अध्यक्षपदं त्यांनी सन्मान म्हणून नव्हे, तर जबाबदारी म्हणून स्वीकारली कारण त्यांच्या लेखनासारखंच त्यांचं सार्वजनिक आयुष्यही मूल्यनिष्ठ आहे. एकनाथ आव्हाड यांची साहित्ययात्रा आपल्याला हे शिकवते की मोठं होण्यासाठी झगमगाटाची गरज नसते; माणुसकी पुरेशी असते. मुलांसाठी लिहिणं म्हणजे लहान होणं नव्हे, तर अधिक प्रगल्भ होणं असतं. त्यांच्या लेखनातून उमटणारी हीच समज, हीच संवेदना आणि हीच आशा मराठी बालसाहित्याला केवळ समृद्ध करत नाही, तर अधिक मानवी, अधिक उजळ आणि अधिक अर्थपूर्ण बनवते.
———————————————
संतोषजनक लेखणीतून….✍️
संतोष अवसरमोल (पत्रकार/लेखक)
मु+पो. घाटबोरी, ता. मेहकर, जि. बुलढाणा
मो. 9689777129



