
बंजारा मातृभाषेच्या प्रेमातली शिदोरी: मांगीलाल राठोड
महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा ही समतेचा विचार, सामाजिक न्यायाची जाणीव आणि मानवी प्रतिष्ठेच्या मूल्यांवर उभी आहे. या परंपरेत अनेक विचारवंत साहित्यिकांनी आपल्या लेखनातून समाजजीवनाचे वास्तव मांडले, प्रश्न उपस्थित केले आणि परिवर्तनाची दिशा दाखवली. अशाच परिवर्तनशील विचारधारेतून घडलेले, ग्रामीण मातीचा सुगंध लाभलेले आणि भाषेच्या अस्तित्वासाठी आयुष्य वाहून घेतलेले साहित्यिक म्हणून मांगीलाल हरसिंग राठोड यांचे नाव साहित्यविश्वात विशेष आदराने घेतले जाते. त्यांनी आपल्या लेखनातून, संशोधनातून आणि समाजप्रबोधनाच्या कार्यातून केवळ वैचारिक भूमिका मांडल्या नाहीत, तर एका लुप्तप्राय बोलीभाषेला व तिच्या संस्कृतीचा ठेवा त्यांनी साहित्यात जपून ठेवण्याचे कार्य केले. मांगीलाल राठोड यांचे कार्य म्हणजे भाषा, साहित्य आणि समाज यांचा परस्परसंबंध उलगडणारा सशक्त वैचारिक दस्तऐवज आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व कोणत्याही एका चौकटीत बंदिस्त होणारे नाही. ते स्थापत्य माजी अभियंते आहेत, संवेदनशील साहित्यिक आहेत, चिकित्सक संशोधक आहेत आणि त्याचवेळी समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीसाठी झटणारे कार्यकर्तेही आहेत. त्यांच्या लेखनात वैचारिक सखोलता आहे, सामाजिक भान आहे आणि भाषेप्रती अपार निष्ठा आहे. त्यांनी साहित्याला केवळ सौंदर्याचा विषय न मानता सामाजिक जबाबदारीचे प्रभावी साधन बनवले. त्यांच्या दृष्टीने भाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती समाजाच्या अस्तित्वाची, अस्मितेची आणि सामूहिक स्मृतीची ओळख आहे. बंजारा समाजाची भाषा, लोकसाहित्य आणि सांस्कृतिक परंपरा दीर्घकाळ मौखिक स्वरूपात टिकून राहिल्या. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या कथा, लोकगीते, म्हणी, संकेत आणि परंपरा या सगळ्या बोलीभाषेच्या माध्यमातूनच जतन झाल्या. मात्र बदलत्या काळात आधुनिक शिक्षणपद्धती, शहरीकरण आणि मुख्य प्रवाहातील भाषांचे वाढते वर्चस्व यामुळे बंजारा बोलीभाषा हळूहळू दुर्लक्षित होऊ लागली. हीच बाब मांगीलाल राठोड यांनी वेळेवर ओळखली. त्यांना स्पष्टपणे जाणवले की भाषा नष्ट झाली, तर त्या भाषेत साठलेला संपूर्ण सांस्कृतिक ठेवा, समाजाची स्मृती आणि अनुभवसंपदा कायमची हरवून जाईल. यासाठी त्यांनी साहित्यात बोलीभाषाचा वारसा जोपासला आहे. ७ जून १९६२ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकरशा (गराशागड) येथे जन्मलेल्या मांगीलाल राठोड यांचे बालपण बंजारा समाजाच्या पारंपरिक वातावरणात गेले. लहानपणापासूनच त्यांनी ग्रामीण जीवन अगदी जवळून अनुभवले. गावातील ज्येष्ठांकडून ऐकलेल्या कथा, लोकगीते, म्हणी, समाजाच्या परंपरा आणि जीवनानुभव यांनी त्यांच्या मनावर खोलवर ठसा उमटवला. ग्रामीण जीवनातील संघर्ष, दारिद्र्य, निसर्गाशी असलेले घट्ट नाते आणि बोलीभाषेतील सहजता यामुळे त्यांची संवेदनशीलता विकसित झाली. या काळातच त्यांना उमगले की बोलीभाषा म्हणजे केवळ शब्दांचा संग्रह नसून ती संपूर्ण जीवनशैलीचा, संस्कृतीचा आणि समाजाच्या स्मृतीचा आरसा आहे. शिक्षणाच्या प्रवासात त्यांनी नागपूर येथून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. पुढे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता म्हणून त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली. आपल्या व्यावसायिक आयुष्यात त्यांनी शिस्त, तांत्रिक कौशल्य आणि प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केला. मात्र नोकरी करत असतानाही त्यांचे मन सतत भाषेच्या आणि समाजाच्या प्रश्नांकडे वळलेले होते. कामानिमित्त विविध जिल्ह्यांमध्ये आणि राज्यांमध्ये प्रवास करताना त्यांनी पाहिले की बंजारा समाजातील अनेक तरुण शिक्षण आणि रोजगारासाठी मुख्य प्रवाहातील भाषा स्वीकारत आहेत, मात्र त्याच वेळी आपली मातृभाषा विसरत चालले आहेत. ही बाब त्यांना अस्वस्थ करणारी होती. याच अस्वस्थतेतून त्यांनी साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्याला अधिक गांभीर्याने सुरुवात केली. १९९७ पासून त्यांनी ‘बंजारा हिल्स’ आणि ‘गोर नायक’ या साहित्यिक नियतकालिकांचे संपादन केले. ही नियतकालिके केवळ छापील माध्यम नव्हती, तर बंजारा समाजाच्या आत्मअभिव्यक्तीची, वैचारिक मंथनाची आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनाची व्यासपीठे ठरली. या नियतकालिकांमधून लोककथा, कविता, सामाजिक लेख, लोकगीते, इतिहासविषयक लेखन आणि भाषिक अभ्यास प्रसिद्ध होऊ लागले. बोलीभाषेला लिखित स्वरूप प्राप्त होणे ही बंजारा समाजाच्या दृष्टीने एक महत्त्वाची सांस्कृतिक घडामोड ठरली. मांगीलाल राठोड यांच्या कार्याचा सर्वात महत्त्वाचा आणि दीर्घकालीन परिणाम करणारा टप्पा म्हणजे त्यांनी सिद्ध केलेला बंजारा बोलीभाषा हिंदी शब्दकोष. तब्बल तीस हजारांहून अधिक शब्दांचा हा शब्दकोष केवळ भाषिक संदर्भग्रंथ नसून बंजारा समाजाच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि जीवनपद्धतीचा मौल्यवान दस्तऐवज आहे. हा शब्दकोष तयार करण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे अथक परिश्रम घेतले. महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये फिरून त्यांनी बंजारा समाजाच्या भाषिक वापराचा सखोल अभ्यास केला. वेगवेगळ्या प्रदेशांतील उच्चार, शब्दप्रयोग आणि अर्थछटा यांची नोंद त्यांनी काळजीपूर्वक घेतली. या कामात त्यांनी समाजातील ज्येष्ठ व्यक्तींशी संवाद साधला. अनेक शब्द केवळ वृद्धांच्या स्मृतीत शिल्लक होते. काही शब्दांचा वापर आता दैनंदिन व्यवहारातून जवळजवळ नाहीसा झाला होता. अशा वेळी संयम, सातत्य आणि विश्वास यांच्या जोरावर त्यांनी हे शब्द संकलित केले. कोणतेही मोठे आर्थिक पाठबळ किंवा शासकीय सहाय्य नसताना उभा राहिलेला हा शब्दकोष त्यांच्या भाषेप्रती असलेल्या प्रेमाचा आणि निष्ठेचा ठोस पुरावा आहे. भाषेपुरतेच त्यांचे कार्य मर्यादित राहिले नाही. त्यांनी बंजारा समाजाची लोकगीते, लोककथा, चालीरीती, सण-उत्सव आणि सांस्कृतिक परंपरा यांचेही सखोल संकलन केले. या लोकगीतांमधून समाजाचे जीवनदर्शन स्पष्टपणे समोर येते. स्थलांतराचे दुःख, उपेक्षा, संघर्ष, निसर्गाशी असलेले नाते, प्रेम, विरह, आशा आणि जिद्द या सगळ्यांचे प्रतिबिंब या गीतांत आढळते. या लोकसाहित्याचा अभ्यास करताना त्यांनी केवळ शब्दार्थ नोंदवले नाहीत, तर त्यामागील सामाजिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक संदर्भही समजून घेतले. २०१९ मध्ये प्रकाशित झालेला ‘मुनादी’ हा त्यांचा काव्यसंग्रह त्यांच्या साहित्यिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. ‘मुनादी’मधील कविता समाजाच्या वास्तवाशी थेट संवाद साधतात. त्या केवळ भावनांचे प्रकटीकरण नसून सामाजिक अस्वस्थतेची, अन्यायाविरुद्धच्या संघर्षाची आणि न्यायाच्या शोधाची प्रखर अभिव्यक्ती आहेत. त्यांच्या कवितांमध्ये मानवी वेदना, सामाजिक विषमता, उपेक्षित समाजाचे प्रश्न आणि सांस्कृतिक मूल्ये ठळकपणे जाणवतात. त्यांच्या दृष्टीने कविता म्हणजे सौंदर्याचा खेळ नसून समाजजागृतीचे प्रभावी साधन आहे.
भाषा संवर्धनाबरोबरच मांगीलाल राठोड यांची सामाजिक बांधिलकी अत्यंत ठाम आहे. त्यांचा ठाम विश्वास आहे की भाषा जतन करणे म्हणजे समाजाचे ज्ञान, इतिहास आणि अनुभव जतन करणे होय. बोलीभाषा जिवंत राहिली तरच त्या समाजाची ओळख, आत्मसन्मान आणि सांस्कृतिक सातत्य टिकून राहते. त्यांच्या प्रयत्नांमुळे बंजारा बोलीभाषा आज नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे, लिहिली जात आहे आणि अभ्यासाच्या कक्षेत येत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. २०१९ मध्ये ‘पसायदान’ पुरस्कार आणि उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार, २०२३ मध्ये ‘शब्दगंध’ उत्कृष्ट काव्य पुरस्कार, २०२४ मध्ये ‘साहित्यरत्न’ पुरस्कार, तर २०२५ मध्ये अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार आणि शब्दवेल बोलीभाषा संवर्धन पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. हे पुरस्कार केवळ वैयक्तिक सन्मान नसून भाषिक आणि सांस्कृतिक संवर्धनाच्या चळवळीला मिळालेली सामाजिक मान्यता आहेत. भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, ती संस्कृतीची ओळख आहे, इतिहासाची साक्ष आहे आणि समाजाच्या अस्तित्वाचा भक्कम पाया आहे. ही भाषा जपण्यासाठी त्यांनी केलेले कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरणारे आहे. म्हणून मांगीलाल राठोड यांचे कार्यकर्तृत्व खरोखर उल्लेखनीय आहे.
———————————————
संतोषजनक लेखणीतून….✍️
संतोष अवसरमोल (पत्रकार/लेखक)
मु+पो.घाटबोरी, ता. मेहकर, जि. बुलढाणा
मो:-9689777129