साहेब… घाटबोरीच्या बाजारवाटेला अतिक्रमणाचा विळखा; प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत!
घाटबोरी, प्रतिनिधी

साहेब… घाटबोरीच्या बाजारवाटेला अतिक्रमणाचा विळखा; प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत!
“साहेब… मेहकर तालुक्यातील घाटबोरीच्या बाजारवाटेला अतिक्रमणाच्या विळख्यातून वाचवा हो…!” अशी आर्त हाक सध्या घाटबोरीकरांच्या तोंडी ऐकायला मिळत आहे. गावात दर सोमवारी भरणारा पारंपरिक भाजीपाला बाजार आज मताच्या स्वार्थी चांगुलपणामुळे अडचणीत सापडला असून, सरपंच व गावातील पुढारी झोपेचे सोंग घेत असल्यामुळे सार्वजनिक जागेवर झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे संपूर्ण गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दशकांपासून घाटबोरी गावातील बाजारवाटा ही परिसरातील शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांसाठी प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखली जात होती. दर सोमवारी आजूबाजूच्या खेड्यांतील शेकडो नागरिक बाजारासाठी घाटबोरीत दाखल होत असत. मात्र आज हाच बाजारवाटा काही धनदांडग्या लोकांच्या अतिक्रमणामुळे श्वास अक्षरशः घुमसटलेला आहे. बाजारासाठी राखीव असलेल्या सार्वजनिक जागेवर किराणा दुकाने, टिनपत्रांचे गाळे आणि विविध व्यावसायिक बांधकामे उभारण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर बाजारवाटेच्या चारही बाजूंनी अतिक्रमणाचे जाळे पसरल्याने भाजीपाला विक्रेत्यांना बसण्यासाठीही जागा शिल्लक राहिलेली नाही. परिणामी दर सोमवारी भरणारा पारंपरिक बाजार विस्कळीत झाला असून शेतकरी आणि लहान व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
विशेष म्हणजे हे अतिक्रमण एका दिवसात झालेले नाही. सार्वजनिक जागेवर हळूहळू कब्जा केला जात असताना ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. अनेक वेळा तोंडी तक्रारी आणि मागण्या करूनही अतिक्रमण हटविण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
गावकऱ्यांच्या मते, मतांच्या राजकारणासाठी काही लोकप्रतिनिधी आणि गावातील पुढारी जाणीवपूर्वक झोपेचे सोंग घेत आहेत. सामान्य नागरिकाने एखादा छोटासा शेड उभारला तरी प्रशासन तात्काळ कारवाई करते; मात्र सार्वजनिक जागा बळकावणाऱ्या धनदांडग्या लोकांवर कारवाई करण्याची हिंमत ग्रामपंचायत प्रशासन दाखवत नसल्याची चर्चा गावभर रंगली आहे. अतिक्रमणामुळे केवळ बाजारच उद्ध्वस्त झालेला नाही, तर गावाच्या आर्थिक घडामोडींनाही मोठा फटका बसत आहे. घाटबोरीची जुनी बाजारपेठ दिवसेंदिवस ओस पडत चालली आहे. सार्वजनिक जागेचे संरक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांच्याच डोळ्यांसमोर बाजारवाटा गिळंकृत होत असताना प्रशासनाचे मौन अनेक प्रश्न निर्माण करत आहे. अतिक्रमण करणाऱ्यांना अभय आणि सर्वसामान्य नागरिकांना अन्याय, अशी भावना आता ग्रामस्थांमध्ये तीव्र होत आहे.
घाटबोरीच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला हा बाजार जर आज वाचवला गेला नाही, तर उद्या गावाची ही ओळख कायमची नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण गावातून आता एकच आवाज घुमत आहे “साहेब… बाजारवाटा वाचवा हो..! अतिक्रमण हटवा हो..! सार्वजनिक जागा मोकळी करा हो..! धनदांडग्यांच्या ताब्यात गेलेली बाजारवाटा जनतेला परत द्या हो..!” आता सर्वांच्या नजरा प्रशासनाच्या भूमिकेकडे लागल्या आहेत. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन अतिक्रमण हटविले नाही, तर जनक्षोभ आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



