
अभिष्टचिंतन…
जनविश्वासाचा सृजनशील ध्रुवतारा : जयचंद बाटीया
काही व्यक्तींचा जन्म हा केवळ स्वतःचे आयुष्य जगण्यासाठी नसतो; तर समाजाच्या जीवनात आशेचा किरण बनून उजेड पसरविण्यासाठी झालेला असतो. काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, त्यांचे नाव उच्चारताच मनात आदर, आत्मीयता, विश्वास आणि प्रेरणेचे असंख्य दीप उजळतात. अशाच दुर्मीळ आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे नाव म्हणजे जयचंद बाटीया.
‘जय’ या शब्दातच विजयाची चाहूल आहे. या नावात संघर्षावर मात करण्याची जिद्द आहे, समाजासाठी झटण्याची तळमळ आहे आणि माणुसकीच्या नात्यांना जपण्याची विलक्षण ताकद आहे. म्हणूनच जयचंद बाटीया हे केवळ एक नाव नाही; तर ते एका विचाराचे, एका संस्काराचे आणि एका जिवंत प्रेरणेचे प्रतीक आहेत. पहाटेच्या अरुणोदयाची लालिमा जशी पसरते आणि माणूस उजळून निघतो, अगदी त्याचप्रमाणे जयचंद बाटीया यांचा सहवास लाभला की मनात सकारात्मकतेचे झरे वाहू लागतात. त्यांच्या शब्दांत आपुलकी असते, विचारांत दूरदृष्टी असते आणि कृतीत समाजहिताची निष्ठा असते. राजकारण, समाजकारण, पत्रकारिता आणि लोकसंपर्क या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. अनेकजण पदामुळे मोठे होतात; परंतु काही व्यक्ती आपल्या माणुसकीमुळे मोठ्या ठरतात. जयचंद बाटीया हे याच दुसऱ्या प्रकारातील व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी सत्तेचा उपयोग प्रतिष्ठेसाठी नव्हे, तर समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांच्या मदतीसाठी केला. म्हणूनच त्यांच्या नावाबद्दल जनमानसात एक वेगळाच विश्वास निर्माण झाला आहे. जीवनातील प्रत्येक संघर्षाला त्यांनी धैर्याने सामोरे जात यशाची शिखरे गाठली. परंतु त्या शिखरांवर पोहोचूनही त्यांनी आपल्या मातीशी, माणसांशी आणि संस्कारांशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. यशाच्या उंच भरारीसोबत त्यांनी नम्रतेचे पंख जपले. म्हणूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक विलक्षण आकर्षण जाणवते. रक्ताची नाती जन्माने मिळतात; परंतु हृदयाची नाती संस्कारांनी निर्माण होतात. माझ्या आयुष्यात असेच एक भावबंध निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे जयचंद बाटीया. माझे मोठे भाऊ सिद्धेश्वर पवार आणि जयचंद बाटीया यांच्यातील मैत्री ही केवळ मैत्री नाही, तर विश्वास, निष्ठा आणि आत्मीयतेची जिवंत परिभाषा आहे. या दोघांची जोडी पाहिली की “जय-वीरू”ची मैत्री आठवते.
दोघांनीही पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्यपद्धती वेगळ्या असल्या तरी उद्दिष्ट एकच आहे, समाजहित. एकाच ध्येयासाठी झटणाऱ्या या दोन व्यक्तिमत्त्वांची मैत्री ही आजच्या स्वार्थी युगात एक आदर्श उदाहरण आहे. जयचंद बाटीया यांचा स्वभाव म्हणजे वाहत्या झऱ्याचे निर्मळ पाणी. त्यांच्यातील कर्तृत्व जितके मोठे आहे, तितकीच त्यांची माणुसकी विशाल आहे. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे, संकटात धावून जाणे, गरजूंना आधार देणे आणि निराश मनात आशेचा दिवा पेटवणे हे त्यांच्या स्वभावाचे अविभाज्य गुण आहेत. आजच्या काळात अनेकजण प्रसिद्धीसाठी समाजसेवा करतात; पण जयचंद बाटीया समाजसेवेसाठी समाजसेवा करतात. त्यांच्यासाठी प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे. प्रत्येक वेदना त्यांना स्वतःची वाटते. प्रत्येक अश्रू पुसण्यासाठी ते तत्पर असतात. म्हणूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व लोकांच्या मनात घर करून राहिले आहे.
त्यांच्या जीवनाकडे पाहताना जाणवते की, त्यांनी कधीही स्वार्थाचा विचार केला नाही. त्यांनी समाजहितालाच आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू मानले. म्हणूनच त्यांच्या कार्याचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. मेहकर मतदारसंघाच्या राजकीय पटावर त्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, दूरदृष्टी आणि कार्यक्षमतेच्या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पक्षनिष्ठा, जनसंपर्क आणि विकासाची तळमळ यामुळे ते जनतेच्या विश्वासाचे केंद्र बनले आहेत. गोरगरीब, शेतकरी, युवक, महिला आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. त्यांच्या नेतृत्वात केवळ राजकीय क्षमता नाही, तर समाजाला दिशा देण्याची ताकद आहे. त्यांच्या विचारांत विकासाचा आराखडा आहे, तर कृतीत जनहिताची बांधिलकी आहे. म्हणूनच राजकीय क्षितिजावर त्यांच्यासाठी अनेक मोठ्या संधींची दारे खुली होत आहेत. जयाभाऊंच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांची माणुसकी. मोठेपणा प्राप्त करूनही त्यांनी कधी अहंकाराला जवळ येऊ दिला नाही. आजही ते सर्वसामान्य माणसाशी तितक्याच आत्मीयतेने संवाद साधतात. त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य आणि मनातील निर्मळ भावना लोकांना आपलेसे करून टाकतात. काही व्यक्तिमत्त्वे वडाच्या वृक्षासारखी असतात. स्वतः उन्हात उभी राहतात; पण इतरांना सावली देतात. जयचंद बाटीया हे असेच सावली देणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला प्रेरणा, मार्गदर्शन आणि आत्मविश्वास लाभतो. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. कारण काही व्यक्तिमत्त्वे शब्दांच्या चौकटीत मावत नाहीत. ती अनुभवावी लागतात. त्यांच्या सहवासातील प्रत्येक क्षण हा प्रेरणेचा स्रोत असतो. म्हणूनच त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनात सहज दोन ओळी उमटतात…
“दोस्तों इनकी तारीफ की जरूरत ही क्या है, फूल जब पास से गुजरते हैं तो महक आती है…”
खरंच, सुगंधाची ओळख करून द्यावी लागत नाही; तो स्वतःच जाणवतो. त्याचप्रमाणे जयचंद बाटीया यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव हा शब्दांपेक्षा कृतीतून अधिक जाणवतो. आज त्यांच्या वाढदिवसाच्या मंगलक्षणी ईश्वरचरणी एकच प्रार्थना आहे की, त्यांच्या आयुष्यात यशाचे नवे क्षितिज उलगडत राहो. त्यांनी प्राजक्तासारखे सतत फुलत राहावे, निशिगंधासारखा सुगंध समाजभर दरवळत राहावा आणि त्यांच्या कार्यातून असंख्य जीवनांना प्रेरणा मिळत राहावी. त्यांच्या स्वप्नांना नवे पंख लाभोत. त्यांच्या कर्तृत्वाला नवी उंची लाभो. त्यांच्या जीवनातील प्रत्येक दिवस आनंद, समाधान आणि यशाने परिपूर्ण होवो.
आपल्या सृजनशीलतेच्या तेजाने, माणुसकीच्या स्पर्शाने आणि कार्यकर्तृत्वाच्या सामर्थ्याने त्यांनी समाजाच्या हृदयात जे स्थान निर्माण केले आहे, ते अधिकाधिक दृढ होत राहो. जयाभाऊ, आपण सदैव आनंदी राहा, निरोगी राहा, यशस्वी राहा आणि आपल्या कार्याचा प्रकाश समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचत राहो. आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
उदंड आयुष्य लाभो, यशाची प्रत्येक शिखरे आपल्या चरणी नतमस्तक होवोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.



