ताजे अपडेट

प्रतिभावंताचा समिक्षक आरसा : प्रज्ञा हंसराज बागुल

घाटबोरी, प्रतिनिधी

 

प्रतिभावंताचा समिक्षक आरसा : प्रज्ञा हंसराज बागुल

मराठी साहित्याच्या समकालीन प्रवाहात काही लेखणी अशी असतात ज्या फक्त शब्दांची सजावट करत नाहीत; त्या समाजाच्या जखमांवर थेट बोट ठेवतात, सामाजिक अन्यायाची पडताळणी करतात आणि वाचकाला विचारांच्या चौकटीत अडकायला लावतात. अशा लेखणींचा प्रभाव केवळ भावनिक नसतो; तो जागरूक करतो, अस्वस्थ करतो आणि प्रश्न विचारायला भाग पाडतो. या प्रवाहातील ठाम, निर्भीड आणि परिवर्तनवादी लेखणींपैकी एक नाव म्हणजे प्रज्ञा हंसराज बागुल. त्यांच्या लेखणीत बुद्धाची करुणा, फुल्यांची सत्यशोधकता, शाहूंची सामाजिक न्यायाची दृष्टी आणि आंबेडकरांचे समतावादी तत्त्वज्ञान सतत जाणवते. हे सर्व घटक एकत्र येऊन निर्माण करतात एक असा साहित्यिक आवाज जो कोणत्याही तडजोडीशिवाय समाजातील विषमता, अन्याय आणि शोषणावर प्रहार करतो. प्रज्ञा बागुल यांचे साहित्य सौंदर्याच्या आड लपलेल्या भावनांचा खेळ नाही; ते वास्तवाचे आरसे आहेत तीव्र, धारदार आणि अस्वस्थ करणारे. त्यांच्या कवितांमध्ये भावुकतेपेक्षा भूमिका ठळक आहे. प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द थेट सामाजिक सत्याशी भिडतो. त्यांच्या कथांमध्ये सहानुभूतीपेक्षा सामाजिक वास्तवाची धार तीव्र आहे, तर त्यांच्या समीक्षांमध्ये कौतुकापेक्षा वैचारिक कसोटी अधिक तीव्र आणि स्पष्ट आहे. त्यांच्या लेखनाचा प्रभाव फक्त वाचकाच्या भावनांवर मर्यादित राहत नाही; तो त्याच्या विचारांवर, संवेदनशीलतेवर आणि सामाजिक जबाबदारीवर थेट परिणाम करतो. हे लेखन वाचकाला फक्त मनोरंजन देत नाही; ते त्याला प्रश्न विचारायला लावते, वास्तवाची जाणीव करून देते आणि बदलाची ज्वाला पेटवते.
त्यांच्या कथांमध्ये सहानुभूतीपेक्षा सामाजिक सत्याची धार अधिक तीव्र आहे. त्यांच्या समीक्षांमध्ये स्तुतीपेक्षा वैचारिक कसोटी आहे. त्यामुळेच त्या केवळ कवयित्री, लेखिका किंवा समीक्षक नाहीत, तर समाजाशी थेट संवाद साधणाऱ्या विचारवंत साहित्यिक म्हणून ओळखल्या जातात. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे. ही मूल्ये त्यांनी घोषणांच्या स्वरूपात मांडलेली नाहीत; ती त्यांच्या अनुभवांतून, निरीक्षणांतून आणि समाजाशी भिडणाऱ्या वास्तवातून वैचारिक आकार घेत गेलेली आहेत. २ फेब्रुवारी १९८१ रोजी जन्मलेल्या प्रज्ञा हंसराज बागुल यांची घडण ही एका विशिष्ट सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक वातावरणात झाली. एम.ए. (इंग्रजी) आणि बी.एड. हे त्यांचे औपचारिक शिक्षण असले, तरी त्यांची खरी शाळा होती ती जीवनाची. समाजात वावरताना त्यांनी माणसांचे जगणे जवळून पाहिले, स्त्री म्हणून भोगाव्या लागणाऱ्या मर्यादा अनुभवल्या, सामाजिक विषमता प्रत्यक्ष अनुभवली आणि त्या अनुभवांमधून प्रश्नांची बीजे त्यांच्या मनात रोवली गेली. या वैचारिक जडणघडणीमध्ये त्यांच्या वडिलांचा स्मृतीशेष डी. एस. घोडेस्वार यांचा मोलाचा वाटा आहे. शिस्तबद्ध दिनचर्या, वाचनाची आवड, वैचारिक स्पष्टता आणि सामाजिक बांधिलकी हे संस्कार त्यांनी नकळतपणे आपल्या मुलीमध्ये रुजवले. वडील हयात नसले तरी त्यांचा वैचारिक वारसा प्रज्ञा बागुल यांच्या लेखनातून आजही जिवंत आहे. त्यांच्या लेखनात दिसणारी प्रामाणिकता, स्पष्ट भूमिका आणि विचारांची शिस्त ही त्याच संस्कारांची फलश्रुती आहे. प्रज्ञा बागुल यांचे बालपण आंबेडकरी बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुसावळ रेल्वे जंक्शन येथे विचारवंतांच्या सानिध्यात घडत गेले. प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे, अस्मितादर्श कार, सुगावाचे संपादक विलास वाघ, बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी यांच्या नियतकालिकांमधून त्यांनी लेखन केले आहे. डॉ. अवंतिकाप्रसाद मरमट नागमय संस्कृतीचे संपादक, डॉ. अशोक गायकवाड, रमाईच्या संपादक प्रा. डॉ. रेखाताई मेश्राम, अमरावतीच्या प्रा. डॉ. आशा थोरात, नाशिकच्या प्रा. डॉ. इंदिरा आठवले, प्रा. डॉ. छाया निकम, उर्मिलाताई पवार, प्रा. आशालता कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या लेखनाला नवीन दिशा मिळाली. समाजातील असमानता, स्त्री म्हणून येणाऱ्या बंधने, आर्थिक वास्तव आणि सामाजिक रूढी त्यांनी लहानपणापासून अनुभवलेल्या आहेत. मात्र या अनुभवांनी त्यांना गप्प बसायला शिकवले नाही; उलट, त्यांनी प्रश्न विचारण्याची सवय लावली. त्यांच्या लेखनात दिसणारी अस्वस्थता, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची हिंमत आणि व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची जिद्द याच अनुभवांतून आकाराला आली आहे. त्या स्त्रीजीवनाकडे केवळ भावनिक किंवा सहानुभूतीच्या नजरेने पाहत नाहीत. स्त्रीच्या जगण्यामागील सामाजिक रचना, सत्ता-संबंध, पितृसत्ताक मानसिकता आणि वर्ग जातीय विषमता या सगळ्यांचा त्या चिकित्सक अभ्यास करतात. त्यामुळेच त्यांच्या कवितांमधील स्त्री ही सहनशीलतेचे प्रतीक नसून, ती प्रश्न विचारणारी, संघर्ष करणारी आणि परिवर्तनाची आकांक्षा बाळगणारी आहे. त्यांची एक कविता होय, मी आंबेडकरी स्त्री आहे.‌ यातून त्यांची बुध्द, फुले, शाहू, आंबेडकरां विषयी कणखर भूमिका निर्भिडपणे स्पष्ट केली आहे. ‘आंबेडकरनगर’ कथासंग्रहातील कथा स्त्री केंद्री असल्या तरी व्यवस्थेसमोर प्रश्न मांडणाऱ्या कथा आहेत. साहित्य कृती आस्वादक, संवादक होण्यासाठी सातत्याने क्रियाशील राहून सूक्ष्म अवलोकन करत अभिव्यक्त होत आंबेडकरी जाणिवा प्रखरतेने मांडणाऱ्या लेखिकांपैकी एक भारदस्त, बहुआयामी व्यक्तिमत्व प्रज्ञा हंसराज बागुल यांच्या लेखणीतून दिसून येते. संघर्ष माणसाला जिवंत ठेवतो. भाकरी आणि पुस्तकांसाठी संघर्षाचा जिवंत इतिहास आणि त्यातील वाहणारा दाहक अनुभवाच्या चटक्यांचा उष्ण आवेगाचा ज्वलंत विद्रोही झरा त्यांच्या समीक्षेतून, कथेतून, कवितेतून सूज्ञ वाचकांच्या मनात स्थान निर्माण करणारा ठरतो. प्रवाहाविरुद्ध तळपणारी लेखणी सातत्याने समाजाला वैचारिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत असते. तळागाळातील, शोषित, वंचित, पीडीत भरडल्या जाणाऱ्या, दाबल्या जाणाऱ्या लोकांचा एक आश्वासक आणि निर्भिड आवाज त्यांच्या लेखणीत आहे. प्रज्ञा बागुलच्या लेखणीत स्त्रीजीवनाचे प्रत्यक्ष निरीक्षण आणि सामाजिक वास्तवाची जाणीव स्पष्टपणे दिसते. स्त्री केवळ सहनशीलतेची प्रतिमा नाही; ती प्रश्न विचारणारी, संघर्ष करणारी आणि बदल घडवणारी शक्ती आहे. त्यांच्या कवितांमधील स्त्री ही कुणाच्याही भावना गमावून न करता स्वतःच्या अस्तित्वासाठी, समानतेसाठी लढणारी आहे. त्यांच्या कथांमधील पात्रे सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करतात, जे समाजाच्या कडेलोटावर जगतात, अन्यायाचा सामना करतात, परंतु साहस आणि आत्मविश्वास गमावत नाहीत. ही पात्रे वाचकाला केवळ अनुभव सांगत नाहीत; ती त्याला विचार करण्यास, प्रश्न विचारण्यास आणि स्वतःच्या संवेदनशीलतेची तपासणी करण्यास भाग पाडतात. साहित्यिक दृष्टीकोनातून पाहता, प्रज्ञा बागुलचे संपादनकार्यही त्याच तटस्थ, वैचारिक दृष्टिकोनातून केलेले आहे. त्यांनी आंबेडकरी पहिल्या पिढीतील कवयित्रींच्या लेखनाचे संवर्धन केले, दुर्लक्षित स्त्री आवाजाला प्रकाशात आणले. हे संपादनकार्य म्हणजे फक्त साहित्याची निवड नाही; ते सामाजिक न्याय आणि सांस्कृतिक उत्तरदायित्वाचे कार्य आहे. त्यांच्या संपादनामुळे मराठी साहित्याची समृद्धी फक्त साहित्यिक नाही, तर वैचारिकदृष्ट्या देखील झाली आहे.
२०१५ मध्ये संपादित केलेला ‘युगप्रवर्तक भीमजयंती विशेषांक’ हा त्यांच्या साहित्यिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला. हा विशेषांक केवळ स्मरणांजली नव्हता; तो आंबेडकरवादी विचारांचा वैचारिक दस्तऐवज होता. २०१७ मधील ‘एल्गार भीमजयंती विशेषांक’ यामधूनही त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना केवळ पूज्य व्यक्तिमत्त्व म्हणून नव्हे, तर आजच्या समाजाला मार्गदर्शन करणारे विचारवंत म्हणून मांडले. २०२१ हे वर्ष त्यांच्या लेखनासाठी निर्णायक ठरले. ‘आशादिप’ हा कवितासंग्रह, ‘आंबेडकर नगर’ हा कथासंग्रह आणि ‘सृष्टी देते दृष्टी’ हा कवितासंग्रह या तीन पुस्तकांमधून त्यांच्या लेखनाची बहुआयामी ताकद स्पष्टपणे समोर आली. ‘आशादिप’मधील कविता अंधाराला नाकारत नाहीत, पण त्या अंधारातही आशेचा दिवा पेटवतात. ‘आंबेडकर नगर’मधील कथा समाजाच्या कडेलोटावर जगणाऱ्या माणसांचे वास्तव मांडतात निर्दयपणे, प्रामाणिकपणे. ‘सृष्टी देते दृष्टी’ या संग्रहातून निसर्ग, समाज आणि माणूस यांच्यातील नाते अधिक व्यापक अर्थाने उलगडते. २०२२ मध्ये प्रकाशित झालेली ‘कालचक्र’ ही कादंबरी त्यांच्या लेखनातील परिपक्व टप्पा दर्शवते. काळाच्या प्रवाहात बदलणारी समाजव्यवस्था, मूल्यांची उलथापालथ आणि माणसाच्या अस्तित्वाचा शोध या विषयांवर ही कादंबरी थेट भाष्य करते. ती वाचकाला केवळ कथा सांगत नाही, तर काळाशी भिडायला भाग पाडते.
याच काळात त्यांनी ‘करुणासागर’ प्रातिनिधिक कविता संग्रह, ‘बाप’ गौरव ग्रंथ, समीक्षा ग्रंथ, ‘पिता को समर्पित काव्यधारा’, आणि ‘बायजा बोलीभाषा’ प्रातिनिधिक कविता संग्रह यांचे संपादन केले. हे संपादनकार्य म्हणजे साहित्यिक जबाबदारीचे भान आहे. विशेषतः आंबेडकरी पहिल्या पिढीतील कवयित्री हिराताई बनसोडे यांच्या गौरव ग्रंथाचे संपादन म्हणजे लेखिकेच्या जडणघडणीचा महत्वपूर्ण टप्पा आहे. आंबेडकरी पहिल्या पिढीतील कवयित्री हिराताई बनसोडे यांच्या कविता बारावी अभ्यासक्रमात तसेच विविध भाषेत अनुवादित झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे कवितेचा इंग्रजी अनुवाद कोलंबिया विद्यापीठात अभ्यासक्रमात निवड करण्यात आलेला आहे. हिराताई बनसोडे यांच्या गौरव ग्रंथाचे संपादन प्रज्ञा हंसराज बागुल करत आहेत.
त्यांच्या साहित्यिक कार्याची दखल विविध पुरस्कारांनी घेतली आहे लोकसूर्य पुरस्कार (२०२२), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (२०२२), साहित्यरत्न पुरस्कार (२०२२), तसेच विद्रोही साहित्य संमेलन पुणे आणि साहित्यप्रेमी संघ पुणे यांचे साहित्यरत्न पुरस्कार (२०२३). मात्र पुरस्कारांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे ते त्यांच्या लेखनाने निर्माण केलेले वैचारिक आंदोलन. सध्या त्यांच्या इंग्रजी कविता प्रकाशित होत असून, मराठी साहित्याच्या चौकटीबाहेर जाऊन जागतिक संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
पैशांचे प्रलोभन देऊन लेखकांना विकत घेणारे राजकीय दबाव लोकशाही व्यवस्थेत अनुभवास येतात. पुरस्कार विकणारे आणि पुरस्कार विकत घेणारे हा एक व्यवसाय झालेला आहे. प्रत्येक कलावंत, लेखक समाधानी असला पाहिजे. उपजत ज्ञानाचा उपयोग त्याने जातीव्यवस्थेच्या विषमतावादी मुळावर घाव घालण्यासाठी तीक्ष्ण धारदार लेखणीचे हत्यार म्हणून केला पाहिजे. जात, धर्म, वंश, भेद यापलीकडे मानवतेची दृष्टी व्यापक स्वरूपाची निर्भिड आणि परिणामकारक, प्रभावी असली पाहिजे. असे विचार प्रज्ञा हंसराज बागुल सातत्याने मांडत असतात. संदर्भातून संशोधक, चिकित्सक वृत्ती, चौफेर दृष्टी, अनुभवातून चिंतन, मनन आणि वास्तवदर्शी, पारदर्शी समाजाचे आत्मभान प्रत्येक बुध्द, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या वैचारिक वारसा जपणाऱ्या स्त्रीमध्ये असावे. स्त्री देखील एक व्यक्ती आहे. तिचा जगण्याचा अधिकार तिला जगता आला पाहिजे. ही सक्षमता शिक्षणामुळे निर्माण होते. त्यामुळे स्त्रीने नुसते शिक्षित असून उपयोग नाही. त्या शिक्षणाचा उपयोग आपल्या जीवनात मुलांसाठी कसा आदर्श ठरेल, बहुजन हिताय बहुजन सुखाय कसा ठरेल यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. वैश्विक शांती आणि करूणेसाठी सर्वात आधी स्वतः मधील आंतरीक संघर्ष, आत्मविश्वास, मनोधैर्य विकसित केला पाहिजे. त्यानंतर जगाकडे जागरूक बुध्दीने बघण्याची वैचारिक पात्रता आपसुकपणे वाचन, लेखनातून मिळत जाते. वाचाल तर वाचाल हा बदलत्या काळानुसार संवाद साधला गेला पाहिजे. शंकर सारडा, प्रेमचंद, विल्यम वर्डस्वर्थ, आर. के. नारायण, हरिवंशराय बच्चन, भदन्त आनंद कौसल्यायन, बाबुराव बागुल, ग.दि. माडगूळकर, पु.ल.देशपांडे, व.पु. काळे, योगीराज वाघमारे, ज. वि. पवार, यशवंत मनोहर, बेबीताई कांबळे, उर्मिला पवार, प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, देवा झिंजाड यांच्या साहित्यातून अनेक वाचकांना अंतर्मुख करणारे अनुभव मिळतात. असे मत प्रज्ञा हंसराज बागुल मांडतात. स्त्रीवादी दृष्टिकोनातून स्त्रीला एक व्यक्ती म्हणून वैचारिक वांझ मानसिकतेने स्वीकार केले नाही तरी भविष्यातील स्त्री निर्भिडपणे स्वतःला सिद्ध करणारी निर्भिड स्त्री ठरेल यात शंका नाही. असे परखड मत प्रज्ञा हंसराज बागुल मांडतात. स्त्री जीवन म्हणजे अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा गाभारा मानला जाऊ नये. माता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, मुक्ता साळवे, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता यशोधरा यांचा त्यागमय निर्भिड वारसा जपता आला पाहिजे.
लोकशाही मतांचे मूल्य शून्य झाले आहे. हुकूमशहा प्रवृत्ती अधिक काळ निसर्ग नियमानुसार टिकत नाही हे सत्य आहे. माणसाने मानवतेला शोभेल असे वर्तन करावे. हिंसा, बलात्कार, विकृतीदर्शक जगणे म्हणजे माणुसकी नाही. यासाठी साहित्यात परखडपणे भूमिका मांडता आली पाहिजे. याचेच नाव लोकजीवनाचा आरसा म्हणजे साहित्य आहे. सर्वसमावेशक दृष्टिकोन रुजविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत स्त्री जीवन पुढे जात असते. बदलत्या काळानुसार प्रतिनिधित्व करणारी प्रतिमा लेखक, कवीची असावी. अशी भूमिका कणखरपणे प्रज्ञा हंसराज बागुल यांनी मांडलेली आहे. आई, बहिण, पत्नी, मुलगी या भुमिकेतून जगतांना बाप, भाऊ, पती, मुलगा या नात्यांवर दुर्लक्षित, उपेक्षित, अन्याय होणार नाही. ही खबरदारी घेणे देखील लेखक, कवीचे कर्तव्य ठरते. जीवनाचा समतोलपणा आंतरीक सौंदर्यातून साधला गेला पाहिजे. माणूस परिपुर्ण नसतो. व्यक्ती म्हणून प्रत्येक स्त्री घडत असते. जागतिकीकरणामुळे, कोरोनामुळे अनेक परिणाम समाज मनावर झाले. त्यातून बाहेर पडण्यासाठी लेखक, वाचक संवाद सेतू जोडला गेला पाहिजे. प्रत्येक गावात पुस्तक महोत्सव असला पाहिजे. सोशल मिडीयाच्या काळात वाचनाचे वेध लागले पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे.‌ ‘जगण्याचे संदर्भ’ हा आगामी कवितासंग्रह त्यांच्या वैचारिक प्रवासातील पुढचा टप्पा ठरेल. २३ एप्रिल २०२१ रोजी त्यांच्या वडिलांचे कोरोनाच्या काळात निधन झाले. हा आघात वैयक्तिक असला, तरी त्यांनी त्याला वैचारिक दिशेत रूपांतरित केले. वडिलांच्या हयातीत प्रकाशित झालेले लेखन पुस्तकरूपाने समर्पित करून त्यांनी शब्दांतून श्रद्धांजली वाहिली. एप्रिल २०२६ मध्ये आयोजित होणारा ‘आशादिप’ राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार हा केवळ कार्यक्रम नसून, वैचारिक परंपरेचा पुढचा टप्पा आहे. प्रज्ञा हंसराज बागुल या आजच्या मराठी साहित्यविश्वातील एक ठाम, निर्भीड आणि सामाजिक बांधिलकी जपणारा आवाज आहेत. त्यांच्या लेखणीतून शब्द सौंदर्य निर्माण करतात, पण त्याहून अधिक ते समाजाला आरसा दाखवतात. बुद्धाची करुणा, फुल्यांची सत्यशोधक भूमिका, शाहूंची सामाजिक न्यायाची दृष्टी आणि आंबेडकरांचे समतावादी तत्त्वज्ञान या सगळ्यांचा संगम त्यांच्या लेखनात सतत जाणवतो. म्हणूनच प्रज्ञा बागुल यांचे साहित्य वाचणे म्हणजे फक्त शब्दांचा आस्वाद घेणे नाही; ते म्हणजे जागरूकता, संवेदनशीलता, सामाजिक जबाबदारी आणि परिवर्तनाची जाणीव. आजच्या मराठी साहित्यविश्वात त्यांनी ठाम, निर्भीड आणि सामाजिक बांधिलकी जपणारा आवाज निर्माण केला आहे. त्यांच्या लेखणीतून शब्द सौंदर्य निर्माण होते, परंतु त्याहून मोठा प्रभाव आहे समाजाच्या वास्तवाशी सामना करायला लावणारा, विचारांची धार देणारा आणि वाचकाला जबाबदार बनवणारा आवाज आहेत. साहित्य हे केवळ सुसंस्कृत भावनांचा खेळ नाही; ते सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे, विचारांची ज्वाला आहे आणि वाचकाच्या मनावर स्पर्श करुन जागरूकतेची लहरी निर्माण करते. समाजातील अन्यायाच्या विरोधात उभे राहणे, असमानतेला धक्का देणे आणि संघर्ष करणाऱ्यांसाठी आवाज उठवणे हे साहित्याचे खरे उद्दिष्ट आहे. आणि प्रज्ञा बागुल यांनी हे उद्दिष्ट प्रत्यक्ष लेखणीतून सिद्ध केले आहे. हीच त्यांच्या लेखणीची खरी ताकद आहे आणि हेच त्यांच्या साहित्याचे खरे यश. बुध्द, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रेरणेतून वडीलांचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या लेखिका, कवयित्री, समिक्षक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्रजी कवयित्री म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या बहुभाषिक कवयित्री म्हणून त्यांची नोंद मराठी साहित्यात मोलाचे योगदान देणारे ठरेल यात शंका नाही.‌

———————————————

संतोषजनक लेखणीतून….✍️
संतोष अवसरमोल (पत्रकार/लेखक)
मु+पो.घाटबोरी, ता. मेहकर, जि. बुलढाणा
मो:-9689777129

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका