ताजे अपडेट

प्रा. डॉ. वसंत हंकारे यांचे व्याख्यान : शब्द थांबले… अश्रू बोलू लागले; हंबरडा फोडत मुलींनी आई-वडिलांना घट्ट मिठ्या मारल्या!

घाटबोरी, प्रतिनिधी

 

प्रा. डॉ. वसंत हंकारे यांचे व्याख्यान : शब्द थांबलेअश्रू बोलू लागले; हंबरडा फोडत मुलींनी आई-वडिलांना घट्ट मिठ्या मारल्या!

आई-वडिलांच्या निस्वार्थ प्रेमाची खरी ताकद प्रत्यक्ष अनुभवण्याची भावनिक संधी मेहकर तालुक्यातील सरस्वती परिवार, जानेफळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून उपस्थितांना मिळाली. स्व. तोंडे गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या व्याख्यानात प्रसिद्ध विचारवंत व प्रेरणादायी वक्ते प्रा. डॉ. वसंत हंकारे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हृदयस्पर्शी शब्दांनी सभागृहातील वातावरण अक्षरशः गहिवरून गेले. प्रा. डॉ. हंकारे यांच्या वाणीतील प्रत्येक शब्द श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेत होता. प्रेम, आदर, कृतज्ञता आणि नात्यांची जाणीव यांचा भावनात्मक प्रवाह संपूर्ण सभागृहात पसरला. काही श्रोत्यांच्या डोळ्यांतून नकळत अश्रू ओघळू लागले, तर अनेक मुलींनी भावनांचा आवेग आवरू न शकल्याने हंबरडा फोडत आपल्या आई-वडिलांना घट्ट मिठ्या मारल्या. त्या क्षणी शब्द अपुरे पडले आणि भावना बोलू लागल्या. या कार्यक्रमाचे आयोजन अंबिका महिला अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष मोहन जीवनराव धोटे, संचालक संतोषराव तोंडे आणि सरस्वती परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा विजयाताई शरदअप्पा मिटकरी विराजमान होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सत्यजित परिवाराचे अध्यक्ष श्यामभाऊ उमाळकर, उपशिक्षण अधिकारी परमेश्वर क्षीरसागर, रुपालीताई वडणकर, गजाननतात्या कृपाळ, मा. डॉ. धनराज राठी, माधवराव आरसोडे यांच्यासह अनेक स्थानिक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर सचिव श्यामभाऊ गट्टाणी यांनी स्व. तोंडे गुरुजी यांच्या चतुरस्त्र, कर्तृत्ववान व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वावर सविस्तर प्रकाश टाकला. प्रमुख अतिथी श्यामभाऊ उमाळकर यांनी आपल्या वैयक्तिक अनुभवांतून उपस्थितांच्या मनावर भावनांचा ठसा उमटवला.
सौ. शैला धाबे आणि ॲड. क्षीरसागर यांच्या ध्वनिफीतींमुळे कार्यक्रमाला अधिक भावनिक उंची प्राप्त झाली.
मुख्य वक्ते प्रा. डॉ. वसंत हंकारे यांनी आपल्या व्याख्यानाची सुरुवात हलक्या-फुलक्या विनोदाने केली असली, तरी काही क्षणांतच त्यांनी श्रोत्यांच्या हृदयावर संपूर्णपणे ताबा मिळवला. “आई आणि बाप आपल्यासाठी रक्ताचं पाणी करतात. आई नऊ महिने नऊ दिवस असह्य प्रसववेदना सहन करून आपल्याला जन्म देते. आपल्या चुकीमुळे जर त्यांना दुःख सहन करावे लागले, तर आपले जगणेच व्यर्थ आहे,” असे भावपूर्ण शब्द त्यांनी उच्चारले.
त्यांच्या या विधानांनी उपस्थितांचे डोळे पाणावले. अनेक मुलींनी हंबरडा फोडत आपल्या वडिलांना मिठी मारली. “जोपर्यंत बाप घरात आहे, तोपर्यंत त्याच्यावर जीवापाड प्रेम करा. एकदा आई-वडील गेले की या जगात आपलं असं कोणीच उरत नाही. पैशाने नाती जोडली जाऊ शकतात, पण खरी माया, प्रेम आणि आपुलकी फक्त आई-वडिलांकडेच असते,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी सुरवातीला मुलींच्या लेझीम पथकाच्या वाजत-गाजत प्रा. डॉ. हंकारे यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. प्रा. डॉ. म्हस्के यांनी वक्त्यांना स्वलिखित पुस्तके भेट देऊन सन्मानित केले. तसेच वरिष्ठ लिपिक बसवेश्वर आखाडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात जानेफळ, देऊळगाव साखरशा आणि हिवरा खुर्द येथील दहा शाळांना इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने पल्स ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात अमर राऊत यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. कृष्णा हावरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष श्यामभाऊ मुंदडा यांनी केले. पालक व विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती, याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले. मोहन धोटे पाटील यांच्या प्रगल्भ सामाजिक जाणिवेची व संवेदनशीलतेची उपस्थितांनी विशेष प्रशंसा केली.
——————————————————————-

प्रा. डॉ. हंकारे यांचे हृदयस्पर्शी विचार, मुलींच्या अश्रूंनी ओथंबलेले क्षण आणि आई-वडिलांच्या निस्वार्थ प्रेमाची प्रचिती हे सारेच उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरले.
भावनांचा ओघ इतका प्रबळ होता की प्रत्येकाच्या मनात प्रेम, कृतज्ञता आणि नात्यांविषयीची नवी जाणीव खोलवर रुजून गेली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका