“डोळ्यात ओलेपण, हृदयात आदर… सुभाषराव देशमुख यांचा सेवापूर्ती निरोप आणि कार्यकर्तृत्वाचा गौरव”
घाटबोरी, प्रतिनिधी

“डोळ्यात ओलेपण, हृदयात आदर… सुभाषराव देशमुख यांचा सेवापूर्ती निरोप आणि कार्यकर्तृत्वाचा गौरव”
“तो निरोप नव्हता… तो लेकीच्या पाणावलेल्या डोळ्यांत उमटलेला अभिमान होता.”
आयुष्याच्या विशाल आकाशाखाली काही क्षण असे असतात की काळही थबकून उभा राहतो. शब्द ओठांवर येतात, पण उच्चारले जात नाहीत. भावना मनाच्या काठावर दाटून येतात आणि डोळ्यांतून अश्रूंच्या रूपाने ओघळतात. घाटबोरी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख सुभाषराव देशमुख यांच्या सेवानिवृत्ती समारंभात असाच एक हृदयाला चिरून जाणारा, मनाला स्पर्शून जाणारा क्षण उपस्थित प्रत्येकाच्या आयुष्यात कोरला गेला. तो केवळ एका मुख्याध्यापकांचा निरोप नव्हता; तो एका प्रदीर्घ, समर्पित, मूल्यनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठ प्रवासाचा गौरव सोहळा होता. मेहकरच्या वृंदावन लॉन्समधील सभागृह त्या दिवशी उजळून निघाले होते. सभागृह फुलांनी सजले होते, मंच उजळून निघाला होता, मान्यवरांची उपस्थिती होती, टाळ्यांचा कडकडाट होत होता; पण या सगळ्या गजबजाटामागे एक हळवी ओल दडलेली होती. कारण आज निवृत्त होत होते ते फक्त मुख्याध्यापक नव्हते; ते एका पिढीचे संस्कारकर्ते होते. त्यांनी शाळेला केवळ संस्था म्हणून पाहिले नाही; त्यांनी तिला संस्कारांचे मंदिर म्हणून जपले होते. त्या व्यासपीठावर जेष्ठ पत्रकार, गटशिक्षणधिकारी, घाटबोरी गावचे माजी सरपंच, विस्तार अधिकारी, विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, तसेच देशमुख सरांचे सासरेबुवासह कुटुंबीय उपस्थित होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आठवणींची सावली होती. कुणाच्या डोळ्यांत अभिमान होता, कुणाच्या मनात कृतज्ञता, तर कुणाच्या ओठांवर न बोललेले शब्द अडकून पडले होते. कारण ज्यांनी आयुष्यभर इतरांच्या डोळ्यात स्वप्ने पेटवली, त्या व्यक्तीला आज सेवानिवृत्ती निरोप द्यायचा होता.
सुभाषराव देशमुख सरांचा प्रवास साध्या शिक्षकापासून मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख पदापर्यंतचा होता; पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कधीही पदाचा अहंकार दिसला नाही. त्यांनी नेहमी स्वतःला ‘शिक्षक’ म्हणूनच ओळख दिली. त्यांच्या दृष्टीने शिक्षण म्हणजे नोकरी नव्हती; ते एक ध्येय होते, एक साधना होती. शाळेत पाऊल टाकल्यापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. अभ्यासात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अतिरिक्त वर्ग घेतले. गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या खिशातून मदत केली. एखाद्या विद्यार्थ्याला वह्या-पुस्तकांची गरज असेल तर ते न बोलता ती व्यवस्था करत. त्यांना वाटायचं, “विद्यार्थ्याचे स्वप्न तुटू नये; कारण ते स्वप्न म्हणजेच त्याचे भविष्य आहे.” त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने अनेक यश संपादन केली. शैक्षणिक निकालात वाढ, क्रीडा स्पर्धांतील पारितोषिके, सांस्कृतिक कार्यक्रमांतील चमकदार कामगिरी, या सगळ्यांमुळे शाळेचे नाव उंचावले. पण या सर्व यशांपेक्षा मोठे यश म्हणजे त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवलेली मूल्ये. शिस्त, प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा आणि समाजाभिमुखता, ही चार तत्वे त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात पेरली. देशमुख सरांची शिस्तप्रियता सर्वश्रुत होती. वेळेचे काटेकोर पालन, कामातील पारदर्शकता आणि निर्णयातील न्यायबुद्धी या गुणांमुळे ते सर्वांच्या आदरास पात्र ठरले. मात्र त्यांच्या शिस्तीत कठोरता नव्हती; ती प्रेमाने आणि माणुसकीने सजलेली होती. एखादा विद्यार्थी चुकला तर ते त्याला रागावायचे; पण त्या रागातही मायेचा हात असायचा. सहकाऱ्यांशी त्यांचे नातेही विशेष होते. ते मुख्याध्यापक असले तरी सहकाऱ्यांना कधी कमी लेखले नाही. प्रत्येक शिक्षकाच्या कल्पनांना त्यांनी प्रोत्साहन दिले. एखाद्या उपक्रमासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला की ते त्यामागे भक्कमपणे उभे राहायचे. त्यामुळे शाळेत एक कुटुंबवत्सल वातावरण निर्माण झाले होते. समारंभात त्यांच्या कार्याचा आढावा घेताना अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एका शिक्षकाने सांगितले, “देशमुख सरांनी आम्हाला केवळ अध्यापन शिकवले नाही; तर जबाबदारीची जाणीव दिली.” दुसऱ्याने म्हटले, “त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही आत्मविश्वासाने काम करू शकलो.” ग्रामस्थांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक केले. गावातील पालकांमध्ये शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. समारंभात एकामागून एक मान्यवरांनी आपआपल्या भावना व्यक्त करीत होते. त्यावेळी पत्रकार संतोष अवसरमोल यांनी देशमुख सरांचा पेन्सिल स्केच फोटो भेट देत म्हणाले,” हे केवळ चित्र नाही; हे तुमच्या कार्याचे प्रतिक आहे. ” जेष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले,” आजच्या काळात प्रामाणिकपणा जपणाऱ्या शिक्षकांपैकी देशमुख सर आहेत. माजी सरपंच गजानन चनेवार, गटशिक्षणधिकारी वानखेडे, मुख्याध्यापक राजू शिंदे, श्री बळी सर, सर्वांनी त्यांच्या समर्पणाचे कौतुक केले. पण या सर्व भाषणांमध्येही वातावरण जरी भावूक होते. परंतु या सर्व गौरवाच्या क्षणी एक असा प्रसंग घडला, ज्याने संपूर्ण सभागृह भावनांनी भरून गेले. देशमुख सरांची लेक डॉ. सायली देशमुख व्यासपीठावर मनोगत व्यक्त करण्यासाठी उभी राहिली. तिच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते. काही क्षण ती शांत उभी राहिली. आणि मग तिने सुरुवात केली, “जगातलं सर्वात श्रेष्ठ तीर्थ माय आणि बाप आहेत… त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ तीर्थ नाही.” इतके शब्द उच्चारताना तिचा कंठ दाटून आला. सभागृहात क्षणभर स्तब्धता पसरली. त्या शांततेत प्रत्येकाच्या मनात आपल्या आई-वडिलांविषयी कृतज्ञतेची भावना दाटली असावी.
तिने पुढे सांगितले, “बाबांनी आयुष्यभर स्वतःच्या सुखाचा त्याग केला. आम्हाला अनेक वेळा काही हवे असताना त्यांनी ते पुढे ढकलले; पण शाळेच्या कामात कधीही तडजोड केली नाही. त्यांच्या त्यागामुळे आज अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उजळले आहे. त्यांची शिस्त, त्यांची मूल्यनिष्ठा आणि त्यांचे समर्पण हेच आमचे खरे वैभव आहे.” तिच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू हे केवळ विरहाचे नव्हते; ते अभिमानाचे होते. त्या अश्रूंमध्ये कृतज्ञतेचा ओलावा होता. सभागृहातील अनेकांचे डोळे पाणावले. काही शिक्षकांनी रुमालाने डोळे पुसले; काहींचे अश्रू आवरलेच नाहीत. त्या क्षणी प्रत्येकाला जाणवले हा निरोप नाही; हा एका आदर्श पित्याला आणि शिक्षकाला दिलेला मानाचा मुजरा आहे. याचवेळी त्यांची पुतणी सुजाता उभी राहिली. थरथरत्या आवाजात ती म्हणाली,” माझे वडील गेले तेव्हा आमच्या डोक्यावरचे छत्र हरपले होते. पण काकांनी आम्हाला कधीही वडिलांची उणीव भासू दिली नाही. ” एवढे बोलून तिचा कंठ दाटून आला. ती रडू लागली. सभागृहातील वातावरण अधिकच भावनात्मक दाटून आले. कारण त्या शब्दांमध्ये रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीच्या नात्यांची ताकद होती. सुभाषराव देशमुख सरांनी उत्तरपर भाषणात अत्यंत नम्रतेने सर्वांचे आभार मानले. “मी जे काही केले ते माझे कर्तव्य होते,” असे ते म्हणाले. “शिक्षक म्हणून समाजाने माझ्यावर ठेवलेला विश्वास फेडण्याचा प्रयत्न केला.” त्यांनी आपल्या कुटुंबाचे विशेष आभार मानले. “घरच्यांच्या समजुतीमुळेच मी शाळेला वेळ देऊ शकलो,” असे सांगताना त्यांच्या आवाजातही भावनांचा कंप जाणवत होता. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते; पण डोळ्यांत ओल होती. कारण शाळा ही त्यांच्यासाठी केवळ कार्यस्थळ नव्हते; ती त्यांची कर्मभूमी होती. त्या दालनात त्यांनी आयुष्याची अनेक वर्षे घालवली होती. त्या भिंतींमध्ये त्यांच्या आठवणी होत्या, विद्यार्थ्यांच्या हास्याचे प्रतिध्वनी होते, आणि असंख्य स्वप्नांचे प्रतिबिंब होते.
समारंभाच्या शेवटी शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेली गीते, कवितांनी वातावरण अधिकच भावपूर्ण केले. प्रत्येक शब्दात कृतज्ञता होती.
सेवानिवृत्ती म्हणजे शेवट नव्हे; ती नव्या अध्यायाची सुरुवात असते. पण त्या दिवशी प्रत्येकाच्या मनात एक पोकळी निर्माण झाली होती. इतका मोठा आधार, इतके समर्पित व्यक्तिमत्त्व रोजच्या शाळेच्या दालनात दिसणार नाही, ही जाणीव सगळ्यांना हळवी करून गेली.
देशमुख सरांनी जपलेली मूल्ये, त्यांनी रुजवलेली शिस्त, त्यांनी दिलेली प्रेरणा हीच त्यांची खरी परंपरा आहे. त्यांनी घडवलेली शेकडो विद्यार्थी आणि शिक्षक हेच त्यांचे जिवंत स्मारक आहेत. तो दिवस इतिहासात नोंदवला जाईल; पण लोकांच्या मनात तो कायम जिवंत राहील. कारण तो निरोप नव्हता… तो एका युगाचा सन्मान होता. लेकीच्या पाणावलेल्या डोळ्यांत उमटलेला अभिमान हा त्यांच्या आयुष्यभराच्या कर्तृत्वाचा खरा गौरव होता. अश्रूंनी ओलावलेला तो क्षण आजही आठवला की मन भरून येते. कारण त्या अश्रूंमध्ये केवळ भावनाच नव्हत्या; तर एका कर्तव्यनिष्ठ शिक्षकाचा, एका समर्पित प्रशासकाचा आणि एका प्रेमळ पित्याचा संपूर्ण जीवनप्रवास दडलेला होता. तो निरोप नव्हता… तो ‘धन्यवाद’ होता. तो शेवट नव्हता… ती नव्या सुरुवातीची चाहूल होती. आणि त्या दिवशी प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती असा शिक्षक पुन्हा होणे कठीण, पण त्यांचे आदर्श जपणे हेच त्यांना खरे अभिवादनात्मक मानाचा मुजरा ठरेल.
संतोषजनक लेखणीतून…
संतोष अवसरमोल (पत्रकार/लेखक) ,मु. पो. घाटबोरी, ता. मेहकर, जि. बुलढाणा मो:- 9689777129





