माध्यमविश्व

आत्मशोधाच्या नंददीपात उजळलेला कवी: प्रमोद श्रीपाद पंत

घाटबोरी, प्रतिनिधी

 

आत्मशोधाच्या नंददीपात उजळलेला कवी: प्रमोद श्रीपाद पंत

हृदयाच्या गाभाऱ्यात अखंड तेवत असणारा नंदादीप हा केवळ प्रकाश देण्यासाठी नसतो, तर तो माणसाला स्वतःशी भेटवून देण्यासाठी असतो. आयुष्याच्या प्रवासात जेव्हा मन फाटते, स्वप्नांना तडे जातात, अपेक्षा कोलमडतात आणि वेदनेच्या अंधारात अस्तित्व चाचपडू लागते, तेव्हा त्या फटीतून जेव्हा हा सूक्ष्म, पण तेजस्वी प्रकाश आत शिरतो, तेव्हा तो केवळ डोळ्यांना दिसत नाही, तर तो अंतरंगात उतरतो. त्या क्षणी बुद्धीचा कोलाहल थांबतो, अहंकाराचे आवरण विरघळते आणि आत्म्याशी थेट संवाद सुरू होतो. हाच क्षण म्हणजे कविता. म्हणूनच कविता ही शब्दांची सजावट नसून ती आत्मशोधाची, आत्मशुद्धीची आणि आत्मप्रकाशाची प्रक्रिया आहे. अशा आत्मशोधाच्या प्रकाशात स्वतःला पूर्णपणे झोकून देणारा, शब्दांच्या ज्वालांत स्वतःला होरपळून घेणारा कवी म्हणजे प्रमोद श्रीपाद पंत. अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर या साध्या, मातीशी नाळ जोडलेल्या शहरात जन्मलेले प्रमोद श्रीपाद पंत हे मराठी साहित्यविश्वातील एक संवेदनशील, प्रामाणिक आणि सातत्याने लिहिणारे कवी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कवितांमध्ये कृत्रिम चमक नाही, बौद्धिक दिखावा नाही; आहे तो फक्त अनुभवांचा गंध, वेदनेचा ओलावा आणि आत्म्याच्या खोल कप्प्यांतून आलेली साद. त्यांच्या कवितेतील भाषा सहज, साधी वाटत असली तरी ती आत खोलवर रुजणारी आहे. ती वाचकाला थांबवते, विचार करायला भाग पाडते आणि नकळत स्वतःच्या आयुष्याशी तुलना करायला लावते.
महाविद्यालयीन जीवनात असतानाच कविता लेखनाचा छंद त्यांच्या मनात अलगद रुजत गेला. शब्द हे केवळ संवादाचे साधन न राहता जगण्याचे, सहन करण्याचे आणि प्रश्न विचारण्याचे माध्यम बनले. मात्र हा छंद घराच्या चार भिंतींत सहज स्वीकारला गेला नाही. विशेषतः आईचा कविता लेखनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत व्यवहारवादी होता. संसाराच्या ओझ्याखाली, गरजांच्या वास्तवात जगणाऱ्या आईला कविता ही उपजीविकेची वाट वाटत नव्हती. “नुसताच आयतं खातो मेल्या आणि काळे कागद भरतो! कवितेने तुझं काय पोट भरणार आहे?” अशा शब्दांत तिचा विरोध व्यक्त व्हायचा. त्या शब्दांमध्ये कडवटपणा असला तरी त्यामागे असलेली काळजी, भीती आणि लेकराच्या भविष्याची तगमग आजही कवीच्या मनात घर करून आहे. आज कवितेमुळे मिळालेली प्रतिष्ठा, सन्मान, पुरस्कार आणि वाचकांचे प्रेम पाहण्यासाठी ती आई हयात नाही, ही जाणीव त्यांच्या अंतरंगात कायमची जखम बनून राहिली आहे. प्रत्येक यशाच्या क्षणी ही अनुपस्थिती अधिक तीव्रतेने बोचत राहते. साहित्यिक प्रवास हा कधीच सरळ रेषेत चालणारा नसतो. टीका, अपमान, दुर्लक्ष आणि गैरसमज हे त्याचे अविभाज्य भाग असतात. प्रमोद पंत यांच्या वाट्यालाही असे अनेक अनुभव आले. दैनिक लोकमतमध्ये सुरू असलेल्या, सुरेश भट यांच्या “रंग माझा वेगळा” या साप्ताहिक सदरासाठी त्यांनी गझलसदृश्य कविता पाठवली होती. मनात अपेक्षा होती की कुठेतरी दखल घेतली जाईल, मार्गदर्शन मिळेल. पण मिळालेला प्रतिसाद अत्यंत कटू होता. “तू पाठवलेली गझल ही गझलही नाही आणि कविताही नाही,” असे स्पष्टपणे सांगण्यात आले. हा अभिप्राय दिशाभूल करणारा ठरला, पण तोच त्यांच्या आयुष्यातील निर्णायक वळण ठरला. या शब्दांनी त्यांना खचवले नाही, तर अधिक पेटवले. त्यांनी या टीकेला आव्हान मानले आणि नव्या जिद्दीने, अधिक ताकदीने कविता लेखनाकडे झोकून दिले. प्रस्थापितांच्या दडपणाखाली न झुकता, स्वतःच्या अनुभूतींवर विश्वास ठेवून त्यांनी स्वतःचा मार्ग शोधला. ते स्वतः म्हणतात, कविता ही आकाशातली वीज आहे; ती पकडण्याचा प्रयत्न करणारा शंभर टक्के होरपळतो. कविता लिहिणे म्हणजे आत्म्याला उघड्यावर ठेवणे, शब्दांच्या ज्वालांत स्वतःला जाळणे आणि तरीही मागे न हटणे. या आत्मदाहातूनच ‘आत्मशोध’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह जन्माला आला. हा संग्रह महाराष्ट्र राज्य शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानास पात्र ठरला आणि त्यांच्या लेखनाला अधिकृत मान्यता मिळाली. त्यानंतर ‘लिटिल रॅबिट’, ‘रडकीबोळवण’, ‘प्रश्नांच्या हातबल देठाशी’ आणि ‘सचित्र गजाननमहाराज करुणाष्टक’, असे कवितासंग्रह प्रकाशित झाले. “थोडंसं लिहायचं, पण चांगलं लिहायचं” या वैचारिक प्रगल्भतेवर ठाम राहून त्यांनी शब्दांची काटकसर राखली, पण आशयाची खोली कधीही कमी होऊ दिली नाही. त्यांच्या कवितेतून प्रश्न जन्माला येतात, पण ती उत्तर लादत नाही; ती वाचकाला स्वतःकडे पाहायला भाग पाडते. आजवर त्यांच्या लेखनाला महाराष्ट्रभर विविध पुरस्कार, सन्मान आणि मानसन्मान लाभले आहेत. मिळणारे अभिप्राय हे केवळ कौतुक नसून पुढे जाण्याची ऊर्जा देणारे ठरले. याच ऊर्जेतून त्यांनी अभंग या पारंपरिक पण अत्यंत आत्मिक काव्यप्रकाराकडे वाटचाल केली. संतसाहित्याच्या परंपरेशी नाते जोडत, आधुनिक संवेदनशीलतेचा स्पर्श देत त्यांनी स्वतःचे अभंग लिहिले. “पंतांचे अभंग” हे त्यांचे सहावे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर असून हा प्रयोग मराठी साहित्यविश्वात नवा संवाद घडवेल, अशी अपेक्षा आहे. या अभंगांमधून केवळ भक्ती नाही, तर प्रश्न, अस्वस्थता आणि आत्मसंवादही प्रकटतो. तीस वर्षांपूर्वी सोशल मीडियाचे अस्तित्व नसताना कविता वाचकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे तपश्चर्याच होती. दिवाळी अंक, वृत्तपत्रे, नियतकालिके आणि साहित्य संमेलने हीच व्यासपीठे होती. प्रमोद पंत यांनाही याच मार्गाने मोठा संघर्ष करत आपली कविता पोहोचवावी लागली. आजच्या नवकवींना जे सहज उपलब्ध आहे, त्यासाठी त्यांनी दीर्घ प्रतीक्षा आणि संयम अनुभवला. पण या संघर्षानेच त्यांचे लेखन अधिक शुद्ध, अधिक प्रामाणिक आणि अधिक आत्मसाक्षी बनवले. प्रमोद श्रीपाद पंत यांचा साहित्यप्रवास हा केवळ यशाचा आलेख नाही; तो आत्मसंघर्षाचा, आत्मशोधाचा आणि आत्मशोधाच्या प्रक्रियेतून घडलेला प्रवास आहे. आईच्या विरोधातून, टीकेच्या जखमांतून, शब्दांच्या आगीतून घडत गेलेला हा कवी आजही तितक्याच निष्ठेने शब्दांची साधना करतो आहे. त्यांच्या कवितेत अनुभवांचा साठा नाही, तर अनुभवांची शुद्ध राख आहे जी अधिक तेजस्वीपणे उजळते.
त्यांची कविता वाचकाच्या मनात अलगद उतरते, त्याला हलवते, अस्वस्थ करते आणि अखेरीस अंतर्मुख करून सोडते. म्हणूनच प्रमोद पंत यांची कविता एकदाच वाचून संपत नाही; ती पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते, कारण प्रत्येक वेळी तिचा अर्थ नव्याने उलगडत जातो. आज बदलत्या काळात, झपाट्याने निर्माण होणाऱ्या आणि तितक्याच वेगाने विस्मरणात जाणाऱ्या लिखाणाच्या गर्दीत प्रमोद पंत यांची कविता वेगळी ठरते. ती काळाच्या गदारोळात हरवत नाही, कारण तिचे मूळ माणसाच्या शाश्वत भावनांमध्ये रुजलेले आहे. म्हणूनच हा कवी आणि त्याची कविता केवळ वर्तमानाची नोंद न ठेवता, काळाच्या पलीकडे जाण्याची क्षमता बाळगतात. आत्मशोधाचा हा नंददीप काळोख कितीही दाट झाला, तरीही विझणार नाही, कारण तो बाहेरून पेटवलेला नाही; तो अंतरंगातून अखंड तेवत राहणारा आहे. म्हणूनच त्यांची कविता म्हणजे आत्मशोध आणि हा आत्मशोध मराठी साहित्याच्या आकाशात अखंड तेवत राहणारा नंददीप आहे.
———————————————

संतोषजनक लेखणीतून….✍️
संतोष अवसरमोल (पत्रकार/लेखक)
मु. पो. घाटबोरी, ता. मेहकर, जि. बुलढाणा
मो.:- 9689777129
////////////////////////////////////////

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका