अजीम नवाज राही यांच्या शब्दप्रवासाने साखरखेर्डा गावाला मानसन्मानाचे वलय : ठाणेदार गजानन करेवाड
घाटबोरी, प्रतिनिधी

अजीम नवाज राही यांच्या शब्दप्रवासाने साखरखेर्डा गावाला मानसन्मानाचे वलय : ठाणेदार गजानन करेवाड
प्रख्यात मराठी कवी व नामवंत निवेदक अजीम नवाज राही यांच्या लेखणीने आणि वाणीने साखरखेर्डा गावाच्या नावाभोवती मान-सन्मानाचे वलय निर्माण केले आहे. त्यांच्या कवितेत एकीकडे सकस आशय तर दुसरीकडे रसाळ अभिव्यक्ती आढळते. जीवनातील जगणं आणि भोगणं यामधील वास्तव कोणताही आडपडदा न ठेवता ते आपल्या कवितेतून कागदावर उतरवतात. त्यांच्या कविता सर्वसामान्य कष्टकरी माणसाच्या दैनंदिनीचे प्रतिनिधित्व करतात, असे प्रतिपादन साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे साहित्यरसिक ठाणेदार गजानन दिगंबरराव करेवाड यांनी केले.
दि. ६ मार्च रोजी साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने अजीम नवाज राही यांच्या “वळीवाच्या वेळा” या गाजत असलेल्या कवितासंग्रहाला राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार २०२५ प्राप्त झाल्याबद्दल पोलीस स्टेशनच्या मुख्य कार्यालयात सत्काराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ठाणेदार गजानन दिगंबरराव करेवाड आणि दुय्यम ठाणेदार संदीप मेंधणे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन अजीम नवाज राही यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अजीम नवाज राही म्हणाले की, “ज्या गावात माझा जन्म झाला आणि ज्या साखरखेर्डा गावाने मला घडवलं, मढवलं त्या मातीचा सृजनशील सुगंध माझ्या संपूर्ण शब्दप्रवासात ओतप्रोत भरलेला आहे. गावकरी माझ्या सन्मानाला स्वतःचा सन्मान मानतात ही बाब मला नवी ऊर्जा आणि नवं बळ देणारी आहे. त्यांच्या अतुलनीय प्रेमामुळेच प्रतिकूल परिस्थितीतही जटिल आव्हानांना सामोरं जाण्याची ताकद मला मिळाली.” ते पुढे म्हणाले की, दिनांक १८ फेब्रुवारी रोजी साखरखेर्डा सार्वजनिक उत्सव समितीने “अमोघ शब्दधन” पुरस्कार देऊन माझ्या शब्दयात्रेचा गौरव केला. त्यानंतर आज साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने झालेला जिव्हाळ्याचा सत्कारही माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. “जिथे पिकते तिथे विकत नाही” ही म्हण माझ्या गावाने मोडून काढली आहे. गावकऱ्यांच्या ऋणाच्या ओझ्याखाली माझी शब्दयात्रा विनम्रपणे वाकून गेली आहे.”अशा शब्दात आपल्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केले.




