
नामांतराचा सूर्य शहीदांच्या बलिदानातूनच उगवला : भाई प्रदीप अंभोरे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी १७ वर्षांच्या अखंड संघर्षात अनेक भिमसैनिकांनी बलिदान दिले. गौतम वाघमारे, प्रतिभा तायडे यांसारख्या वीर शहीदांच्या बलिदानामुळेच नामांतराचा सूर्य उगवला, असे भावनिक उद्गार नामांतर वादी नेते आणि भूमी मुक्ती मोर्चाचे संस्थापक भाई प्रदीप अंभोरे यांनी खामगांव विश्राम भवन येथे आयोजित नामांतर स्मृतिदिन कार्यक्रमात व्यक्त केले. भाई अंभोरे म्हणाले, “त्या काळी अनेक भिमसैनिक घरावर तुळशीपत्र ठेवून लढ्यात सहभागी झाले, अनेक जण जेलमध्ये गेले, आंदोलनात लाठ्या-काठ्या सहन केल्या, तरीही मागे हटले नाही. त्या काळात ‘बहता है खून तो बहने दो!’ अशा घोषणांनी नामांतर लढ्याला प्रचंड उर्जा मिळाली होती. आजच्या तरुण पिढीसाठी भिमसैनिक शहीदांच्या बलिदानाची आठवण उजळून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. फुले, शाहू आणि आंबेडकरी विचारांचा प्रकाश कायम ठेवून समाजात न्याय, समानता आणि बंधुत्वाचे बीज पेरावे,” असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाई बाबुराव सरदार होते. त्यांच्यासह सारंगधर वाकोडे, रमेश गाडेकर, श्रीकृष्ण मोरे, भीमशक्ती नेते, महेंद्र खंडारे, प्रकाश भारसाखळे, विलास पहूरकर यांसारख्या आंबेडकरी चळवळीच्या जेष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.
सदर अभिवादन कार्यक्रम संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी नामांतर लढ्यातील शहीदांना अभिवादन करण्यात आले. उपस्थित होते: भास्कर अंभोरे, कदीरभाई शेषराव तायडे, विलास गवई, प्रकाश भारसाखळे, शक्ती जाधव, गौतम जाधव, दिपा पवार, विशाल खंडारे, राजेंद्र वानखडे, जनार्धन वानखडे, शांताबाई चव्हाण, शोभा वानखडे आणि अनेक भिमसैनिक होते. भाई अंभोरे यांनी पुढे सांगितले की, नामांतराच्या लढ्यात बुलढाणा जिल्हातील भिमसैनिक अग्रेसर होते. लॉंग मार्चपासून नामांतर मार्चपर्यंत या भूमीत हजारो भिमसैनिकांनी आपले योगदान दिले आहे. नामांतराचा संघर्ष, शहीदांचे बलिदान आणि आंबेडकरी विचारांचा प्रकाश आपल्या जीवनात जपावा. या लढ्याच्या स्मृतीने तरुण पिढीला सामाजिक न्याय, समानता आणि बंधुत्वाची शिकवण मिळावी. शहीदांच्या बलिदानामुळेच आज समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद आणि नवा मार्ग निर्माण झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
भाई बाबुराव सरदार यांनी जाहीर केले की, जिल्हास्तरीय नामांतर स्मृतिदिन सोहळा येत्या ३० जानेवारी रोजी उदयनगर (उंद्री) येथे साजरा केला जाईल. यशस्वी कार्यक्रमासाठी संघटनेच्या जिल्हा व तालुका नेत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र खंडारे यांनी केले, तर सूत्रसंचालन शिवदास तायडे यांनी केले.



