राजकारण

‘लेकीचा उंबरठा’ : माणुसकीची सावली, आधाराचं घर; ॲड. माधुरी पवार

घाटबोरी, प्रतिनिधी

 

‘लेकीचा उंबरठा’ : माणुसकीची सावली, आधाराचं घर; ॲड. माधुरी पवार

‘लेकीचा उंबरठा’ म्हणजे एक नाव नाही, तर ‘देवानंद पवार’ नावाच्या माणसाचं काळीज आहे. सर्वसामान्य गोरगरीब, कष्टकरी, निराधार आणि वंचित गरजूंसाठी, खचलेल्या मनाला उभारी देणारी ही आशेची सावली आहे. आणि वेदनांनी थकलेल्या माणसांसाठी उघडलेला विश्वासाचा दरवाजा आहे. आज येथे येता-जाता अनेकजण ‘लेकीच्या उंबरठ्या’वर येऊन थांबतात. इथे येणारा प्रत्येकजण आपली कहाणी घेऊन येतो आणि मन मोकळ्या मनाने ती आपल्या वेदनांची कहाणी सांगतो. त्यावेळी ‘लेक’ सुद्धा सर्वांचा आदर करत, माधुरी देवानंद पवार ही मोठ्या आपुलकी, जिव्हाळ्याच्या भावनेने थकलेल्या, खचलेल्या मनाला उभारी देते, सहानुभूतीने हात धरून त्या माणसाला आत्मविश्वासाचं बळ देत, त्यांना पुन्हा उभं करते. “मी आहे ना…” या शब्दांचा आधार देते, आणि त्या वेदनेच्या जखमा भरुन काढण्याचा पर्यंत्न करीत असते. ‘लेकीचा उंबरठा’ हा फक्त भिंतींनी उभा केलेला किंवा बांधलेला नाही; तर माणुसकीच्या ओलाव्याने उभा आहे. माणुसकी, करुणा आणि दातृत्वाच्या हातांनी गंधारलेला आहे. प्राजक्ताच्या फुलांनी बहरलेला आहे. म्हणून तो सावली देणारा आशेचा आधारवड आहे. हा ‘उंबरठा’ फक्त कॉग्रेसपक्षाच्या कार्यालयाचा पत्ता नाही; तर आशेचं, विश्वासाचं आणि मायेची उब देणारं, जिव्हाळ्याचं नातं निर्माण करणारं एक कुटुंब आहे. येथे प्रत्येक कोपऱ्यात जिवंत माणुसकीचा झरा पाझरतो. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मदत मिळते, समजून घेणारी सहानुभूती मिळते. म्हणूनच अडचणीत मदत करणारे हात आणि दुःखात सांत्वन करणारी माणसं कधीही विसरता येत नाहीत. कारण, त्यांच्या अंतःकरणात कुठेतरी एक कोपरा असतो, जिथे तो फक्त ‘दुसऱ्यांसाठी’ जगण्याचा विचार करतो. हीच खरी समाजसेवेची तहान असते. याच उद्दात भावनेतून राजकारणात राहूनही समाजसेवेच्या तहानेने व्याकूळ झालेला, सामाजिक बांधिलकीच्या वाटेवर चालणारा, मेहकर तालुक्यातील जानेफळ जि. प. सर्कलमधील काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत शिलेदार देवानंद पवार शिस्तीच्या झाडासारखा मोहोरलेला दिसतो. अशा सावली देणाऱ्या वृक्षांना आणि आधार देणाऱ्या माणसांना विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही. अशा व्यक्तींचा जन्मच मुळात स्वतःचं दुःख बाजूला ठेवून इतरांचं दुःख कमी करण्यासाठी, त्यांना आनंद देण्यासाठी झालेला असतो. अशी माणसं आयुष्यभर एखाद्या वृक्षाप्रमाणे गरजूंना आधाराची सावली देत राहतात. त्यामुळे आयुष्यात खचलेल्या, पिचलेल्या माणसांना बळ देणारा देवानंद पवार सारखा माणूस प्रत्येकालाच आपलंसं नेतृत्व वाटतो. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारा आणि सर्वांना मायेचं पांघरूण घालणारा देवानंद पवार विरोधकांमध्येही नेहमी आदरयुक्त चर्चेचा विषय राहिला आहे. जमिनीवर पाय असलेल्या या नेतृत्वाने सामान्य माणसाला कायम मोठा दिलासा दिला आहे. सर्वधर्मसमभावाची वागणूक, नेतृत्वगुण, दूरदृष्टी, काटकसर, आध्यात्मिकता अशा सर्वगुणसंपन्न परोपकारी संस्कृतीने पवार परिवार मोहरलेला आहे. याच सुसंस्कृत, मायाळू परिवारातील देवानंद पवारांची लाडकी लेक ॲड. माधुरी देवानंद पवार हाताला समाजसेवेचं कंगण बांधून समाजाच्या सुखदुःखाशी समरस होत निष्काम दातृत्वाची सेवाव्रती झालेली आहे. समाजसेवा हीच देवपूजा मानून जीवन जगणाऱ्या आणि स्वतःपेक्षा समाजाचा अधिक विचार करणाऱ्या, वडिलांकडून समाजसेवेचा वारसा लाभलेल्या ॲड. माधुरी देवानंद पवार प्रेरणेची ज्योत घेऊन इतरांच्या आयुष्यात ‘मायेची ऊब’ देण्यासाठी सतत कार्यरत आहेत. प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य गोरगरीब, निराधारांवर मायेची सावली पांघरून त्यांना जगण्याचं, लढण्याचं बळ देत आहेत. अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्या विचारांनी प्रभावित झालेली, ॲड. माधुरी पवार यांनी स्वतःला समाजसेवेत झोकून दिलं आहे. सप्तशृंगी महिला अर्बनच्या अध्यक्ष ॲड. माधुरी देवानंद पवार यांच्याकडे पाहिल्यावर त्यांच्या देहबोलीतून किंवा सुसंवादातून कधीही अहंकार जाणवत नाही. कोणीही त्यांना परकं वाटत नाही. सगळ्यांना त्या आपली लाडकी ताई, बहिण, लेक वाटतात हवेहवेसे वाटणारं आदर्श व्यक्तिमत्त्व. राजकारणाच्या पलीकडे असलेल्या जनसागराचा तळ माधुरी पवार यांनी गाठलेला आहे. स्वप्नरंजनाच्या नभात तरंगणाऱ्या नव्हे, तर वास्तवाच्या भूमीवर भक्कम पाया रोवून उभ्या असलेल्या मोठ्या मनाचं हे व्यक्तिमत्त्व खरोखरच समाजभूषण आहे. ॲड. माधुरी देवानंद पवार सामाजिक बांधिलकी जपत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजसेवा करत आहेत. पतीच्या निधनानंतर अनेक महिलांवर मोठी कौटुंबिक जबाबदारी येते. विधवा म्हणून त्यांना अनेकदा कार्यक्रमांपासून दूर ठेवले जाते. प्रथा-परंपरांच्या नावाखाली त्यांना वेगळी वागणूक दिली जाते. या अन्यायकारक अपशकुनी प्रथांना फाटा देत ॲड. माधुरी पवार यांनी समाजाच्या प्रवाहापासून दूर ठेवलेल्या त्या विधवा महिलांना हळदीकुंकवाचा मान देऊन त्यांचा मानसन्मान केला. या उपक्रमामुळे त्या महिलांना मानसिक बळ मिळालं आहे. इतकंच नव्हे, तर समाजाने नाकारलेल्या तृतीयपंथींना सोबत घेऊन ॲड. माधुरी पवार यांनी त्यांना तीळगुळ व गजरे देत, फुले उधळून औक्षण केलं. “समाज तुम्हाला स्वीकारतोय, तुम्ही आमच्यात सामील व्हा,” या भावनेतून राबवलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा वृद्धिंगत झाला आहे. समाजाप्रती काहीतरी देणं लागतं ही आपली जबाबदारी आहे, या भावनेतून ॲड. माधुरी पवार यांनी शालेय व गोरगरीब विद्यार्थ्यांना वही-पेन, नोटबुक आणि शैक्षणिक साहित्य वाटप केलं आहे आणि करत आहेत. त्यामुळे त्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची लाडकी ताई झाल्या आहेत. समाजसेवेची आवड माधुरी यांच्या नसानसात भिनलेली आहे. गोरगरीबांची सेवा करण्याची तळमळ त्यांच्या अंतःकरणात असल्यामुळे ॲड. माधुरी पवार यांनी ‘गोरगरीब, निराधार आणि वंचितांची सेवा म्हणजेच खरी ईश्वरसेवा’ या नितळ भावनेतून नेत्रतपासणी शिबिरांच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास पंधरा हजारांहून अधिक नागरिकांची मोफत डोळे तपासणी करून त्यांना चष्म्यांचे वाटप केलं आहे. इतकंच नव्हे, तर हजारो नागरिकांच्या मोफत शस्त्रक्रियाही करण्यात आल्या आहेत आणि हा उपक्रम आजही सुरू आहे. आजचा तरुण विद्यार्थी म्हणजे उद्याचं उज्ज्वल भविष्य. विद्यार्थ्यांना उंच भरारी घेण्यासाठी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी
ॲड. माधुरी पवार यांनी आतापर्यंत हजारो गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘झाडे वाचवा, झाडे वाढवा’ या संदेशासह त्यांनी हजारो वृक्षांचे रोपण केलं आहे. सामाजिक एकोपा वृद्धिंगत करण्यासाठी दरवर्षी राखी पौर्णिमेला माधुरी पवार हजारो भावांचे औक्षण करून त्यांना प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. विशेष म्हणजे दरवर्षी घरच्या घरी राखी तयार करण्यासाठी अनेक महिलांना काम देऊन त्यांच्या आर्थिक अडचणी सोडवतात.
सर्वधर्मसमभाव ही माधुरी पवार यांची ओळख आहे. मागासवर्गीय समाजाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो, बंजारा समाजाच्या पारंपरिक उत्सवात त्या आनंदाने सहभागी होतात, सर्वधर्मीय समाजाचे सण-उत्सव आपलेसे मानून साजरे करतात, तर हिंदू संस्कृतीतील प्रत्येक उत्सवात तन्मयतेने सहभागी होतात. वारकरी बांधवांना टाळ, मृदंग, वीणा साहित्य वाटप करून त्या पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होतात. अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून
ॲड. माधुरी देवानंद पवार ‘गोरगरीब, निराधार आणि वंचितांच्या सेवेतच खरी ईश्वरसेवा आहे’ या भावनेतून समाजसेवा करत आहेत. त्यामुळे आपुलकी, उद्यमशीलता आणि स्थितप्रज्ञतेचा अनुपम संगम म्हणजे खचलेल्या मनाला उभारी देणारी, ॲड. माधुरी देवानंद पवार आहेत. म्हणून देवानंद पवार यानी जानेफळ येथे कॉग्रेसपक्षाचा कार्यालयाला ‘लेकीचा उंबरठा’ नांव दिले आहे.

————————————————————————

संतोष अवसरमोल ( पत्रकार/ लेखक)
मु. पो. घाटबोरी, ता. मेहकर
मो:- 9689777129

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका