ताजे अपडेट

घाटबोरीत तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थीकलशाची मिरवणूक

घाटबोरी, प्रतिनिधी

 

घाटबोरीत तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थीकलशाची मिरवणूक

अडीच हजार वर्षांनंतर विदर्भाच्या वटफळी येथून आलेल्या महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांच्या थायलंड येथील पवित्र अस्थींचे दर्शन मेहकर तालुक्यातील घाटबोरीसह संपूर्ण जिल्ह्यातील बौद्ध अनुयायांना घडले. हा क्षण ऐतिहासिक आणि भावनिक ठरला. करुणा, शांती आणि मंगलमैत्रीचा संदेश देणाऱ्या या पवित्र अस्थीकलशांच्या दर्शनाने अनुयायांच्या डोळ्यांत श्रद्धा तर मनात समाधान स्पष्टपणे दिसून आले. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीकलशांची भव्य व मंगलमय मिरवणूक फुलांनी सजवलेल्या बगीरथातून काढण्यात आली. ही मंगलमैत्री मिरवणूक पूज्य भदंत अश्वघोष थेरो, पूज्य भदंत तन्हकर थेरो आणि पूज्य भदंत आनंद धम्मदीप थेरो यांच्या पावन उपस्थितीत पार पडली. मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसर धम्ममय वातावरणाने न्हाऊन निघाला होता. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या बौद्ध अनुयांनी फुलांचा वर्षाव केला तसेच गावात ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या माध्यमातून गावकऱ्यांनी आपली श्रद्धा व्यक्त केली. प्रत्येकांच्या चेहऱ्यावर भक्तीभाव,आदर दिसत होता. बगीचारथामागे चालणारी समता सैनिकांची शिस्तबद्ध तुकडी होती. त्यापाठोपाठ पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले हजारो धम्म उपासक व उपासिका “बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि” या घोषणांचा निनाद करत होते. या घोषणांनी अवघा परिसर भारावून गेला होता. या ऐतिहासिक मिरवणुकीत लहान बालकांपासून वृद्धांपर्यंत, महिला-पुरुष सर्वच वयोगटांतील उपासक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पूज्य भदंत अश्वघोष थेरो, पूज्य भदंत तन्हकर थेरो आणि पूज्य भदंत धम्मदीप थेरो यांनी धम्मोपदेश केला. या मंगल मैत्री मिरवणुकीने तथागत बुद्धांचे विचार आजही तितकेच जिवंत असून, तेच समाजाला योग्य दिशा दाखवणारे दीपस्तंभ आहेत, याची जाणीव या धम्मोपदेशातून करून देण्यात आली. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीकलशांचे दुसऱ्यांदा दर्शन घाटबोरी गावातील बौद्ध अनुयायांना घडवून आणण्याचे पुण्यकार्य पत्रकार संतोष अर्जुन अवसरमोल यांनी केले. या ऐतिहासिक व भावनिक प्रसंगामुळे गावातील बौद्ध अनुयायांमध्ये भक्तीभाव आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर्षी या पवित्र अस्थीकलश दर्शनाच्या आयोजनात पत्रकार संतोष अवसरमोल यांच्यासह शेषराव अंभोरे, उमेश सोनुने, संतोष अंभोरे, सुधिर कोरडे, दिनकर अंभोरे आणि सत्यभान मोरे यांनी विशेष योगदान दिले. आयोजकाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे घाटबोरी गावातील सर्वच अनुयायांना तथागतांच्या करुणेचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी विचारांचा साक्षात्कार झाला. या दर्शनामुळे अनुयायांमध्ये धम्मभावना अधिक दृढ झाली असून, तथागत बुद्धांचे शांती, करुणा आणि समतेचे विचार समाजात अधिक प्रभावीपणे पोहोचले. हे आयोजन सामाजिक एकात्मतेचे प्रतीक ठरले. तथागतांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घडल्याने “आम्ही धन्य झालो” अशी भावना उपस्थित उपासक व उपासिका यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हासह दूरवरुन आलेल्या सर्व उपस्थित अनुयांचे आभार संतोष अवसरमोल, शेषराव अंभोरे, संतोष अंभोरे, सुधीर कोरडे, उमेश सोनुने, दिनकर अंभोरे, सत्यभान मोरे यांनी मानले.

—————————————————————-

घाटबोरीच्या मातीशी नाळ जुळलेले सामाजिक कार्यकर्ते विलास कटारे हे संभाजीनगर येथून सहकुटुंब येऊन तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेऊन नतमस्तक झाले. “आज जीवन धन्य झाले,” अशी भावना व्यक्त करत त्यांनी उपस्थित बौद्ध अनुयायांना संबोधित केले. विलास कटारे म्हणाले की, तथागत गौतम बुद्धांनी जगाला दया, करुणा, क्षमा आणि शांतीचा मार्ग दिला. हिंसा, द्वेष आणि अहंकारातून मानवतेला मुक्त करण्याचे महान कार्य बुद्धांनी केले. तर युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा परिवर्तनाचा मंत्र दिला. शिक्षणाच्या माध्यमातून माणूस आत्मनिर्भर बनतो आणि विवेक जागृत होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नसून संपूर्ण मानवमुक्तीचे शिल्पकार होते. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी शोषित-वंचितांना हक्क दिले आणि बौद्ध धम्म स्वीकारून अहिंसा, करुणा व समतेचा मार्ग समाजासमोर ठेवला, असे कटारे म्हणाले. बौद्ध धर्म हा अहिंसा, करुणा, मैत्री आणि प्रज्ञेचा महान मार्ग असल्याचे प्रतिपादन करत, हिंदू कोड बिल, आरक्षण यांसारख्या विषयांवरही त्यांनी सखोल विचार मांडले. समाजपरिवर्तनासाठी बुद्ध आणि बाबासाहेबांचे विचार अंगीकारणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विलास कटारे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका