ताजे अपडेट

जानेफळात ‘लेकीचा उंबरठा’ कॉग्रेस कार्यालयात महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव

घाटबोरी, प्रतिनिधी

 

जानेफळात ‘लेकीचा उंबरठाकॉग्रेस कार्यालयात महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव

“तिच्यामुळे आपल्या घराला आहे घरपण…” : ॲड. माधुरी पवार

मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे ‘लेकीचा उंबरठा’ या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना ॲड. माधुरी देवानंद पवार यांनी स्त्रीशक्तीच्या महानतेवर भाष्य करत, “तिच्यामुळे आपल्या घराला घरपण लाभते,” असे भावपूर्ण प्रतिपादन केले. स्त्री ही केवळ कुटुंबापुरती मर्यादित नसून ती संपूर्ण समाजाची आधारस्तंभ आहे. त्याग, प्रेम, कणखरपणा आणि प्रेरणेचे प्रतीक म्हणजे स्त्री होय, असे सांगताना ॲड. माधुरी पवार म्हणाल्या की, स्त्री आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अनेक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असते. आई म्हणून ती मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आयुष्यभर झटते, बहीण म्हणून भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते, पत्नी म्हणून जोडीदाराच्या सुख-दुःखात सहभागी होते आणि मुलगी म्हणून कुटुंबाच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची जिद्द ठेवते. महिलांचा सन्मान करणे आणि त्यांच्या योगदानाची दखल घेणे हे समाजाचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी नमूद केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, स्त्री आपल्या आयुष्यात कधी आई, कधी बहीण, कधी मैत्रीण तर कधी जीवनसाथी म्हणून साथ देत असते. तिच्या प्रत्येक भूमिकेत प्रेम, समर्पण आणि जबाबदारी दडलेली असते. त्यामुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीचे आपण मनापासून आभार मानले पाहिजेत. स्त्रीशक्तीशिवाय जीवनाची कल्पनाही अपूर्ण आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मेहकर येथील महिला विकील ॲड. इषिता किरण डोंगरदिवे यांनीही मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो ही गोष्ट वास्तव आहे. पूर्वी स्त्रियांना ‘चूल आणि मूल’ या मर्यादेत पाहिले जात होते; मात्र आज स्त्रिया शिक्षण, व्यवसाय, संशोधन, प्रशासन अशा विविध क्षेत्रांत आपली ओळख निर्माण करत आहेत. त्या कुटुंब सांभाळण्यासोबतच समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीतही मोलाची भूमिका बजावत आहेत असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला ॲड. माधुरी पवार, ॲड. इषिता डोंगरदिवे मॅडम, सौ.विजयाताई मिटकरी (अध्यक्षा), सौ.लताताई मिटकरी, सौ. जमुनाताई हिवरकरताई, सौ. लेकुरवाळे मॅडम, सौ. राऊत मॅडम, यांच्यासह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या उपक्रमातून महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका