
विवेकनिष्ठ धम्मसेवक : विलास आनंदा कटारे
पर्वताची उंची त्याच्या शिखरावरून मोजली जात नाही; ती मोजली जाते त्याने किती वादळांचा सामना केला, किती ऊन-पावसाचे प्रहार आपल्या अंगावर झेलले आणि किती शतकांचा इतिहास आपल्या कुशीत जपला यावरून. समुद्रातील मोत्याचे मोल त्याच्या झगमगाटात नसते; त्या झळाळीमागे दडलेल्या संयमात, संघर्षात आणि काळाच्या कठोर परीक्षेत असते. चंदन स्वतः झिजल्याशिवाय सुगंध देत नाही, दीप स्वतः जळल्याशिवाय अंधार दूर करू शकत नाही आणि नदी असंख्य दगडधोंडे, खाचखळगे, वळणे आणि अडथळे पार केल्याशिवाय अथांग सागराला जाऊन मिळत नाही. निसर्गाचा हा शाश्वत नियम मानवी जीवनालाही तितकाच लागू पडतो. संघर्षाशिवाय यशाला अर्थ नसतो, त्यागाशिवाय कर्तृत्वाला तेज प्राप्त होत नाही, विवेकाशिवाय विचारांना दिशा मिळत नाही आणि मानवसेवेशिवाय आयुष्याला खरे अमरत्व लाभत नाही.
काळाच्या प्रदीर्घ प्रवासात अनेक साम्राज्ये उदयास आली आणि लयालाही गेली. अनेक व्यक्तींनी वैभव, संपत्ती आणि सत्तेची शिखरे गाठली; परंतु इतिहासाने त्यांचे स्मरण फार काळ केले नाही. मात्र ज्यांनी आपल्या जीवनाचा प्रत्येक श्वास समाजहितासाठी अर्पण केला, ज्यांनी अन्यायाच्या अंधारात आशेचा दीप प्रज्वलित केला, अशा व्यक्तिमत्त्वांना इतिहासाने आपल्या सुवर्णपानांवर अजरामर केले. त्यांची ओळख पद, पैसा किंवा प्रतिष्ठेने होत नाही; त्यांच्या विचारांच्या उंचीने, चारित्र्याच्या निर्मळतेने आणि समाजासाठी केलेल्या निःस्वार्थ योगदानाने होत असते.
जीवनाच्या प्रत्येक वळणावर अशी काही माणसे भेटतात, ज्यांच्या अस्तित्वामुळे समाज अधिक सुसंस्कृत, अधिक विवेकी आणि अधिक संवेदनशील होत जातो. त्यांच्या शब्दांत केवळ विचार नसतात; ते कृतीतून जिवंत झालेले तत्त्वज्ञान असते. त्यांच्या आचरणात केवळ प्रामाणिकपणा नसतो; तर माणुसकीची अखंड साधना असते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अहंकाराला स्थान नसते; त्याऐवजी करुणा, समता, विवेक आणि मानुसकीचा गंध दरवळत असते. अशी माणसे काळाच्या ओघात केवळ व्यक्ती राहत नाहीत; ती समाजाच्या विवेकाची ओळख बनतात. त्यांच्या आयुष्याचे प्रत्येक पान प्रेरणेचा ग्रंथ बनते आणि प्रत्येक कृती पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरते.
समाजजीवनात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांचा परिचय करून देण्यासाठी मोठमोठ्या विशेषणांची आवश्यकता भासत नाही. त्यांचे जीवनच त्यांच्या कार्याचा सर्वोत्तम परिचय असते. त्यांची ओळख त्यांच्या पदाने नसते; तर त्यांनी जोडलेल्या माणसांनी, त्यांनी घडविलेल्या विद्यार्थ्यांनी, त्यांनी उभ्या केलेल्या विचारप्रवाहाने आणि त्यांनी केलेल्या निःस्वार्थ समाजसेवेने असते. ते स्वतःसाठी नव्हे, तर समाजासाठी जगतात. स्वतःच्या यशापेक्षा इतरांच्या प्रगतीत त्यांना आनंद मिळतो. स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यात त्यांना समाधान लाभते. अशाच सृजनशील, प्रज्ञावंत, विचारवंत, विवेकनिष्ठ आणि धम्मनिष्ठ व्यक्तिमत्त्वाचे नाव म्हणजे विलास आनंदा कटारे. त्यांच्या नावाचा उच्चार होताच डोळ्यांसमोर उभे राहते ते साधेपणाने नटलेले, विचारांनी समृद्ध, तत्त्वांशी निष्ठावान आणि मानवतेच्या सेवेसाठी आयुष्य अर्पण केलेले व्यक्तिमत्त्व. त्यांची ओळख केवळ शिक्षक, मुख्याध्यापक किंवा सामाजिक कार्यकर्ते एवढीच नाही; तर ते समतेचे उपासक, विवेकवादी विचारांचे वाहक, धम्मसेवेचे अखंड साधक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवमुक्तीच्या विचारांचे कृतीशील अनुयायी आहेत.
गोरगरीब, वंचित, शोषित, उपेक्षित, निराधार आणि दुःखाने पिचलेल्या समाजघटकांच्या वेदना त्यांनी केवळ पाहिल्या नाहीत; त्या आपल्या अंतःकरणात जपल्या. दुसऱ्यांच्या दुःखाकडे प्रेक्षक म्हणून न पाहता, त्या दुःखाच्या निवारणासाठी स्वतः झटणे हीच त्यांची जीवनपद्धती बनली. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात करुणा आणि संघर्ष, विवेक आणि कृती, संवेदनशीलता आणि धैर्य यांचा विलक्षण संगम दिसून येतो.
मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील घाटबोरी या छोट्याशा गावात एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. गाव छोटे होते; पण संस्कारांचे आकाश विशाल होते. घरात आर्थिक सुबत्ता नव्हती; परंतु माणुसकीचे वैभव ओसंडून वाहत होते. दारिद्र्य होते; पण स्वाभिमानाची श्रीमंती होती. साधेपणा होता; पण चारित्र्याची उंची अफाट होती. बालपणापासूनच त्यांनी अभावांना जवळून पाहिले. अनेक वेळा परिस्थितीने त्यांची कठोर परीक्षा घेतली; परंतु प्रत्येक वेळी त्यांनी संकटांसमोर न झुकता नव्या जिद्दीने उभे राहण्याचा निर्धार केला. गरिबीने त्यांच्या पावलांना अडविण्याचा प्रयत्न केला; पण स्वप्नांच्या आकाशाला ती बांध घालू शकली नाही. प्रतिकूल परिस्थितीने मार्गात काटे पेरले; पण त्या काट्यांवरून चालत पुढे जाण्याची हिंमत त्यांनी सोडली नाही. प्रत्येक अडचण त्यांनी संधीमध्ये रूपांतरित केली आणि प्रत्येक संकटाला त्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जात आपल्या व्यक्तिमत्त्वाला अधिक सक्षम बनविले. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला. शेवटी जन्मभूमीच्या मायेचा निरोप घेत त्यांनी औरंगाबाद नगरीची वाट धरली. हे स्थलांतर केवळ रोजगारासाठी नव्हते; तर एका नव्या जीवनप्रवासाची सुरुवात होती. डोळ्यांत स्वप्ने होती, मनात जिद्द होती आणि हृदयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा होती. या भांडवलावर त्यांनी नव्या शहरात आयुष्याची नवी पायाभरणी करण्यास प्रारंभ केला.
औरंगाबादमध्ये सुरुवातीचे दिवस अत्यंत कष्टाचे होते. कोणतेही काम कमीपणाचे नाही, हा विचार त्यांनी मनाशी पक्का केला होता. श्रमाची प्रतिष्ठा जपत हाताला मिळेल ते काम त्यांनी प्रामाणिकपणे केले. उपजीविकेसाठी कष्ट करत असतानाच शिक्षणाची ओढ त्यांनी कधीही कमी होऊ दिली नाही. दिवस श्रमात जात असे, तर रात्र अभ्यासात. शरीर थकत असे; पण मनातील ध्येयाचा दीप कधीही विझत नव्हता. याच संघर्षमय काळात नागसेनवनाच्या पावन भूमीने त्यांच्या विचारविश्वाला नवी दिशा दिली. शिक्षणाबरोबरच समता, स्वातंत्र्य, बंधुता, वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधाननिष्ठा आणि धम्ममूल्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वात खोलवर रुजली. पुस्तकी ज्ञानाबरोबरच समाज समजून घेण्याची दृष्टी त्यांना येथे मिळाली. माणसामाणसांतील विषमता, जातीय अन्याय, अंधश्रद्धा आणि सामाजिक शोषण यांचे वास्तव त्यांनी जवळून अनुभवले. त्या अनुभवांनी त्यांच्या मनात परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित केली.
याच काळात त्यांनी स्वतःशी एक निःशब्द संकल्प केला, हे जीवन केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी नाही; तर समाजातील शेवटच्या माणसाच्या उन्नतीसाठी जगायचे. हा संकल्पच पुढे त्यांच्या संपूर्ण जीवनाचा आधारस्तंभ ठरला आणि एका संघर्षशील युवकाच्या आयुष्याला समाजपरिवर्तनाच्या अखंड प्रवासाची दिशा मिळाली.
औरंगाबादच्या भूमीत सुरू झालेला विलास आनंदा कटारे यांचा प्रवास हा केवळ शिक्षणाचा किंवा उदरनिर्वाहाचा नव्हता; तो एका विचारशील, संवेदनशील आणि परिवर्तनवादी व्यक्तिमत्त्वाच्या घडणीचा प्रवास होता. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष त्यांच्या सोबत होता; पण त्या संघर्षाने त्यांच्या मनात कटुता निर्माण केली नाही. उलट प्रत्येक संकटाने त्यांच्या विचारांना अधिक धार दिली, प्रत्येक अपयशाने त्यांच्या आत्मविश्वासाला नवे बळ दिले आणि प्रत्येक अनुभवाने त्यांच्या समाजभिमुख जीवनाला नवी दिशा दिली.
विद्यार्थीदशेत त्यांनी समाजाचे वास्तव अतिशय जवळून अनुभवले. जातीच्या नावावर होणारी विषमता, शिक्षणापासून वंचित राहणारी गरीब मुले, अन्यायाने पिचलेले समाजघटक, अंधश्रद्धेच्या जोखडात अडकलेली माणसे आणि मानवी प्रतिष्ठेचा होत असलेला अवमान हे सारे चित्र त्यांच्या अंतःकरणाला अस्वस्थ करून सोडत असे. अनेक जण अशा वास्तवाकडे दुर्लक्ष करतात; काही त्यावर चर्चा करतात; परंतु फार थोडी माणसे त्याविरुद्ध उभी राहतात. विलास कटारे यांनी तिसरा मार्ग निवडला…संघर्षाचा, जागृतीचा आणि परिवर्तनसाथीचा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. बुद्धांच्या करुणामय धम्माची, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक विचारांची, राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक समतेच्या कार्याची आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांची त्यांनी मनापासून साधना केली. या अभ्यासाने त्यांना केवळ ज्ञान मिळाले नाही; तर जीवन जगण्याची दिशा मिळाली. त्यांनी ओळखले की, समाजाचा खरा विकास केवळ आर्थिक प्रगतीने होत नाही; तो विवेक, शिक्षण, समता आणि मानवी मूल्यांच्या जोपासनेतून घडतो.
याच जाणिवेतून त्यांनी स्वतःला आंबेडकरी सामाजिक चळवळीत पूर्णपणे झोकून दिले. मोर्चे, आंदोलने, विचारपर परिषद, जनजागृती अभियान, धम्मपरिषद, संघटनात्मक बांधणी, सामाजिक प्रश्नांवरील संवाद आणि वंचितांच्या न्यायासाठीची लढाई, या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी निष्ठेने काम केले. त्यांच्या कार्यात प्रसिद्धीची अपेक्षा नव्हती; त्यामागे होती समाजाप्रती असलेली प्रामाणिक बांधिलकी.
लवकरच त्यांच्या धडाडीच्या, अभ्यासू आणि प्रामाणिक कार्याची दखल ज्येष्ठ आंबेडकरी नेते तथा माजी मंत्री गंगाधर गाडे यांनी घेतली. तरुण कार्यकर्त्यामधील प्रामाणिकपणा, संघटनकौशल्य आणि विचारांप्रती असलेली निष्ठा ओळखून त्यांनी विलास कटारे यांच्यावर विश्वास टाकला. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करण्याची मिळालेली संधी ही विलास कटारे यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण वळण ठरली. या काळात मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता. हा संघर्ष केवळ एका विद्यापीठाच्या नावाचा नव्हता; तो सामाजिक स्वाभिमानाचा, इतिहासाच्या न्यायाचा आणि समतेच्या मूल्यांचा लढा होता. या ऐतिहासिक चळवळीत विलास कटारे यांनी सक्रिय सहभाग घेतला. अनेक अडचणी, विरोध, दडपशाही आणि संकटांचा सामना करत त्यांनी संविधानिक मार्गाने चळवळ अधिक बळकट करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्यासाठी चळवळ म्हणजे घोषणाबाजी नव्हती; ती समाजजागृतीची अखंड प्रक्रिया होती. गावोगावी फिरून त्यांनी लोकांशी संवाद साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, भारतीय संविधानाचे महत्त्व, समतेची मूल्ये, शिक्षणाची गरज आणि धम्माचा मानवतावादी संदेश सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले. त्यांचे भाषण प्रभावी असायचे आणि आहे; परंतु त्यापेक्षाही प्रभावी असायची त्यांची जीवनशैली. ते जे बोलतात, तेच आचरणात आणतात.
काळ पुढे सरकत गेला. आयुष्यात विवाह झाला. संसाराच्या नव्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आल्या. अनेकदा समाजकार्य आणि कुटुंब या दोन आघाड्यांवर समतोल राखणे कठीण ठरते; पण त्यांनी या दोन्ही जबाबदाऱ्या अत्यंत संयमाने आणि कर्तव्यभावनेने सांभाळल्या. कुटुंब ही त्यांच्यासाठी प्रेरणेची शक्ती होती आणि समाजकार्य हे जीवनाचे ध्येय. याच काळात त्यांची शासकीय आश्रमशाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. अनेकांच्या दृष्टीने ही नोकरी होती; पण विलास कटारे यांच्या दृष्टीने ती राष्ट्रनिर्मितीची संधी होती. कारण त्यांना ठाऊक होते की, समाजपरिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग शिक्षणातूनच जातो. शिक्षक हा केवळ धडा शिकवणारा नसतो; तो विचार जागवणारा, चारित्र्य घडवणारा आणि भविष्य घडवणारा कु़ंभार असतो.
आदिवासी आणि वंचित समाजातील विद्यार्थ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. त्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी स्वतःचे बालपण पाहिले. त्यांच्या डोळ्यांतील स्वप्ने, त्यांच्या आयुष्यातील अभाव आणि त्यांच्या मनातील सुप्त क्षमता त्यांनी ओळखली. म्हणूनच त्यांनी वर्गखोलीला केवळ अध्यापनाची जागा न ठेवता, ती संस्कारांची कार्यशाळा बनविली. ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील धडे शिकवत; पण त्याचबरोबर जीवनाचे धडेही देत. स्वाभिमानाने जगणे, संविधानाचा आदर करणे, स्त्री-पुरुष समानता मानणे, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे, श्रमाची प्रतिष्ठा जपणे, अंधश्रद्धेला नकार देणे आणि प्रत्येक माणसाशी माणुसकीने वागणे, ही मूल्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर खोलवर कोरली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा महाउपदेश त्यांनी स्वतःच्या जीवनात तर उतरवलाच; पण तो हजारो विद्यार्थ्यांच्या मनातही रुजविला. त्यांच्या प्रेरणेने अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेतले, विविध क्षेत्रांत यश मिळविले आणि समाजात स्वाभिमानाने उभे राहण्याचे धैर्य प्राप्त केले. अनेक विद्यार्थ्यांसाठी ते शिक्षक नव्हते; ते मार्गदर्शक, पालक आणि प्रेरणास्थान होते. त्यांच्या मते शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नव्हे; तर माणसाला माणूस बनविण्याची प्रक्रिया आहे. म्हणूनच त्यांनी ज्ञानाबरोबरच संस्कार, शिस्त, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारी यांवरही तितकाच भर दिला. त्यांच्या अध्यापनातून विद्यार्थ्यांना केवळ रोजगाराचा मार्ग सापडला नाही; तर जीवनाकडे पाहण्याची व्यापक दृष्टीही मिळाली.
याच काळात समाजकार्य, धम्मकार्य आणि शिक्षक म्हणूनची जबाबदारी यांचा त्यांनी सुंदर समतोल साधला. दिवसा विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारा शिक्षक आणि सुटीनंतर समाजजागृती करणारा धम्मसेवक, ही त्यांची दुहेरी भूमिका समाजासाठी प्रेरणादायी ठरली. त्यांनी कधी पदाचा उपयोग प्रतिष्ठेसाठी केला नाही; तर प्रत्येक पदाचा उपयोग समाजहितासाठी केला. हळूहळू त्यांच्या कार्याचा सुगंध शाळेच्या भिंतींपलीकडे जाऊन समाजात दरवळू लागला. त्यांच्या प्रामाणिकपणाने, साधेपणाने, अभ्यासू वृत्तीने आणि निःस्वार्थ सेवाभावाने असंख्य माणसे त्यांच्याशी जोडली गेली. त्यांनी पदे जिंकण्याचा प्रयत्न केला नाही; त्यांनी माणसे जिंकली. आणि माणसे जिंकण्याइतके मोठे यश दुसरे कोणतेच नसते. अशा प्रकारे संघर्षातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता समाजघडणीच्या व्यापक टप्प्यात प्रवेश करत होता. शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाश पेरला, तर धम्मसेवक म्हणून समाजात विवेक, समता आणि मानवतेची मशाल तेवत ठेवली.
पुढील काळात मुख्याध्यापक म्हणून त्यांनी उभारलेले कार्य आणि धम्मचळवळीत दिलेले योगदानकर्ता त्यांच्या जीवनाला अधिक उंचीवर घेऊन गेले. शिक्षक हा केवळ ज्ञानदान करणारा नसतो; तो समाजाच्या भविष्याचा आकार देणारा कुंभार असतो. एका वर्गखोलीत उभा असलेला शिक्षक प्रत्यक्षात एका राष्ट्राचे भविष्य घडवत असतो. त्याच्या ओठांवरून उच्चारलेला प्रत्येक शब्द, त्याच्या आचरणातून व्यक्त होणारे प्रत्येक मूल्य आणि त्याच्या कृतीतून दिसणारी प्रत्येक नैतिकता विद्यार्थ्यांच्या मनावर आयुष्यभरासाठी कोरली जात असते. म्हणूनच शिक्षकाची खरी ओळख त्याने किती धडे शिकविले यावर होत नाही; तर त्याने किती माणसे घडविली यावर ठरते.
विलास आनंदा कटारे यांनी शिक्षक म्हणून हीच भूमिका आयुष्यभर जपली. त्यांच्यासाठी अध्यापन ही केवळ शासकीय जबाबदारी नव्हती; ती एक पवित्र सामाजिक साधना होती. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील स्वप्ने साकार करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या सुख-दुःखाचा कधीही विचार केला नाही. प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या कुटुंबातील सदस्य आहे, या भावनेने त्यांनी शिक्षणाचे कार्य केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्याविषयी भीती नव्हती; आदर, आपुलकी आणि विश्वास होता. शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेणारी बहुसंख्य मुले आदिवासी, वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांतील होती. अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षण हीच एकमेव आशेची किरण होती. विलास कटारे यांनी ही जाणीव मनात ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष दिले. त्यांनी कोणत्याही विद्यार्थ्याची क्षमता त्याच्या परिस्थितीवरून मोजली नाही; तर त्याच्या जिद्दीवर, प्रयत्नांवर आणि स्वप्नांवर विश्वास ठेवला. वर्गखोलीतील प्रत्येक तास हा त्यांच्यासाठी केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा नव्हता; तर विचार जागविण्याचा होता. ते विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला शिकवत, विवेकाने विचार करायला शिकवत, संविधानाची मूल्ये समजावून सांगत आणि समाजातील प्रत्येक माणसाकडे समानतेने पाहण्याची दृष्टी देत. त्यांच्या अध्यापनात पाठ्यपुस्तकाबरोबरच जीवनाचे वास्तवही असायचे. म्हणूनच त्यांच्या वर्गातून बाहेर पडणारे विद्यार्थी केवळ परीक्षेत यशस्वी होत नसत; ते जीवनाच्या परीक्षेतही सक्षम ठरत.
काळाच्या ओघात त्यांच्या कार्याचा गौरव होत गेला आणि मुख्याध्यापक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. अनेकांसाठी मुख्याध्यापकपद म्हणजे प्रशासकीय अधिकाराचे प्रतीक असते; परंतु विलास कटारे यांनी त्याला सेवाभावाचे माध्यम मानले. त्यांनी कार्यालयात बसून आदेश देण्याऐवजी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि समाज यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण केले. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने केवळ शैक्षणिक प्रगतीच केली नाही; तर संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि गुणवत्तेच्या बाबतीतही उल्लेखनीय उंची गाठली. शाळेचे वातावरण अधिक सुसंस्कृत, अधिक अभ्यासपूर्ण आणि अधिक विद्यार्थीकेंद्रित बनले. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या क्षमतेनुसार प्रगतीची संधी मिळावी, हा त्यांचा कायम आग्रह होता. ते विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असत की, “शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नाही; ते स्वतःला ओळखण्याचे, समाजाला घडविण्याचे आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे सामर्थ्य आहे.” या विचाराचा प्रभाव हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनावर पडला. अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन अधिकारी, शिक्षक, अभियंते, डॉक्टर, उद्योजक आणि विविध क्षेत्रांतील जबाबदार नागरिक बनले. आजही त्यांच्याबद्दल बोलताना अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू दाटून येतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी शिक्षण आणि धम्म यांचा सुंदर समन्वय साधला. त्यांनी कधीही धम्माचा अर्थ कर्मकांडात शोधला नाही. त्यांच्यासाठी धम्म म्हणजे करुणा, प्रज्ञा, मैत्री, समता, अहिंसा आणि विवेकपूर्ण जीवनपद्धती. भगवान तथागत बुद्धांनी सांगितलेली करुणा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली समतेचा मार्ग त्यांनी आपल्या जीवनात कृतीतून उतरविला.
शाळेच्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी धम्मकार्याची अखंड ज्योत तेवत ठेवली. सुट्टीचे दिवस, सायंकाळचे तास आणि उपलब्ध प्रत्येक क्षण त्यांनी समाजजागृतीसाठी अर्पण केला. धम्मपरिषद, विचारगोष्टी, व्याख्याने, प्रबोधनपर कार्यक्रम, संविधान जनजागृती अभियान, बुद्ध व आंबेडकरी साहित्याचा प्रसार, युवकांना संघटित करणे आणि सामाजिक समतेचा संदेश गावोगावी पोहोचविणे, हे त्यांच्या जीवनाचे अखंड कार्य बनले. त्यांच्या भाषणात आक्रमकता नव्हती; परंतु विचारांची ताकद होती. कटुता नव्हती; पण सत्याची स्पष्टता होती. द्वेष नव्हता; पण अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य होते. म्हणूनच त्यांचे प्रत्येक व्याख्यान लोकांच्या मनाला स्पर्श करत असे. ते लोकांना कोणाविरुद्ध भडकवत नसत; तर स्वतःमध्ये परिवर्तन घडविण्यास प्रेरित करत.
त्यांनी समाजात संविधाननिष्ठ विचारांचा सातत्याने प्रचार केला. भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून समानतेचा, न्यायाचा, स्वातंत्र्याचा आणि बंधुतेचा जीवनमार्ग आहे, ही जाणीव त्यांनी असंख्य युवकांमध्ये निर्माण केली. त्यांच्या मते समाज बदलायचा असेल तर माणसाचा विचार बदलला पाहिजे, आणि विचार बदलण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे शिक्षण आणि प्रबोधन. त्यांच्या आयुष्याची खरी कमाई संपत्ती नव्हती; तर त्यांनी जोडलेली माणसे होती. हजारो विद्यार्थी, शेकडो सहकारी, असंख्य सामाजिक कार्यकर्ते, धम्मबंधू, हितचिंतक आणि सर्वसामान्य नागरिक यांच्याशी त्यांनी आत्मीयतेचे नाते जोडले. त्यांच्या घरी आलेला कोणताही माणूस रिकाम्या मनाने परत गेला नाही. प्रत्येकाला त्यांनी प्रेम, मार्गदर्शन, धीर आणि योग्य दिशा दिली. त्यांच्या साधेपणात विलक्षण मोठेपण दडलेले आहे. त्यांनी कधी प्रसिद्धीचा हव्यास धरला नाही, पदांचा मोह बाळगला नाही किंवा कार्याचे श्रेय स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी आयुष्यभर एकच ध्येय जपले…”माणूस घडला पाहिजे, समाज जागा झाला पाहिजे आणि समतेची मूल्ये प्रत्येकाच्या जीवनात रुजली पाहिजेत.”
आज त्यांच्या कार्याकडे पाहिले तर सहज जाणवते की, त्यांनी केवळ एक शाळा उभी केली नाही; तर विचारांची परंपरा घडविली. त्यांनी केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण दिले नाही; तर स्वाभिमान दिला. त्यांनी केवळ धम्माचा प्रचार केला नाही; तर मानवतेचा मार्ग जगून दाखविला. त्यांनी केवळ समाजकार्य केले नाही; तर समाजाच्या अंतःकरणात विवेकाचा अखंड दीप प्रज्वलित ठेवला. म्हणूनच विलास आनंदा कटारे हे केवळ शिक्षक, मुख्याध्यापक किंवा धम्मसेवक नाहीत. ते शिक्षणातून संस्कार घडविणारे, धम्मातून करुणा जागविणारे, संविधानातून समतेचा संदेश देणारे आणि आपल्या संपूर्ण जीवनातून मानवतेची अखंड साधना करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या कार्याचा प्रकाश अनेक पिढ्यांच्या जीवनाला दिशा देत राहील आणि त्यांनी पेटविलेला विवेकाचा दीप समाजमनात दीर्घकाळ तेजाने प्रज्वलित राहील.
काळाच्या प्रवाहात प्रत्येक प्रवासाला एक औपचारिक टप्पा येतो. ऋतू बदलतात, पाने गळतात, नद्या समुद्राला जाऊन मिळतात, सूर्य मावळतो आणि पुन्हा नव्या पहाटेचा जन्म होतो. पण काही प्रवास असे असतात की त्यांचा शेवट हा अंत नसतो; तो नव्या अध्यायाची सुरुवात असतो. अशा व्यक्तिमत्त्वांच्या जीवनात सेवानिवृत्ती हा शब्द केवळ शासकीय सेवेतून मुक्त होण्याचा असतो; समाजसेवा, विचारसेवा आणि धम्मसेवा यांना मात्र निवृत्ती नसते. विलास आनंदा कटारे यांचे आयुष्य हे याच सत्याचे जिवंत उदाहरण आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस समाजासाठी जगला. प्रत्येक जबाबदारीला कर्तव्य म्हणून स्वीकारले. प्रत्येक संकटाकडे धैर्याने पाहिले. प्रत्येक यशाकडे नम्रतेने पाहिले आणि प्रत्येक माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याची शिकवण आपल्या आचरणातून दिली.
आज ते मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त होत असले तरी त्यांच्या विचारांचा प्रवास थांबणारा नाही. कारण विचारांना निवृत्ती नसते, करुणेला सीमा नसते, विवेकाला वय नसते आणि मानवसेवेला शेवट नसतो. ज्यांनी संपूर्ण आयुष्य समतेचा संदेश देण्यात, विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात आणि समाजमनात प्रज्ञेचा दीप प्रज्वलित करण्यात घालविले, अशा व्यक्तिमत्त्वाचा प्रवास एका आदेशपत्राने कधीच संपत नाही.
शासकीय सेवेत असताना त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. अनेकांना शिक्षणाची प्रेरणा दिली. अनेकांच्या मनातील न्यूनगंड दूर केला. अनेकांना स्वाभिमानाने जगण्याचे बळ दिले. कित्येक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून स्वतःचे भविष्य घडविले आणि आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत. हे विद्यार्थीच त्यांच्या आयुष्याची खरी कमाई आहेत. पद, पुरस्कार आणि सन्मान यांपेक्षा विद्यार्थ्यांच्या यशातच त्यांनी आपल्या जीवनाचे समाधान शोधले. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याबरोबरच धम्मप्रसार, संविधान जनजागृती, सामाजिक समता, विवेकवादी विचार आणि मानवतावादी मूल्यांच्या प्रसारासाठी त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांनी कधीही विचारांचा व्यापार केला नाही; विचारांचे दान केले. त्यांनी कधीही समाजात मतभेद निर्माण केले नाहीत; तर मैत्री, बंधुता आणि परस्पर सन्मानाची संस्कृती रुजविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची सहजता. मोठेपण असूनही त्यांनी साधेपणा कधी सोडला नाही. यश मिळूनही अहंकार जवळ येऊ दिला नाही. समाजात मान-सन्मान मिळूनही त्यांनी स्वतःला सामान्य माणसापासून कधी दूर केले नाही. म्हणूनच त्यांना भेटणारा प्रत्येकजण त्यांच्यात अधिकारी, शिक्षक किंवा नेते पाहत नाही; तर आपला माणूस पाहतो.
आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने विविध सामाजिक, शैक्षणिक, धम्म आणि आंबेडकरी संघटनांकडून होत असलेला गौरव हा केवळ एका मुख्याध्यापकाचा सत्कार नाही. हा एका विचाराचा सन्मान आहे. हा आयुष्यभर जपलेल्या प्रामाणिकपणाचा गौरव आहे. हा समतेवरील निष्ठेचा सन्मान आहे. हा विवेकाच्या अखंड साधनेचा आदर आहे. हा करुणा, मैत्री, संविधाननिष्ठा आणि मानवसेवेच्या मूल्यांना वाहिलेली कृतज्ञ अभिवादनाची मानवंदना आहे. गावोगावी, शाळाशाळांत, समाजाच्या प्रत्येक स्तरावर त्यांनी पेरलेले विचारांचे बीज आज मोठ्या वृक्षात रूपांतरित होत आहे. त्या वृक्षाच्या सावलीत असंख्य विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि धम्मबंधू नव्या उमेदीने उभे राहत आहेत. हेच त्यांच्या कार्याचे सर्वात मोठे यश आहे. घाटबोरीसारख्या छोट्याशा गावातून निघालेला एक सर्वसामान्य युवक, ज्याच्या हातात संपत्ती नव्हती, सत्तेचे बळ नव्हते, कोणत्याही प्रकारचे राजकीय पाठबळ नव्हते, त्याने आपल्या जिद्दीच्या, प्रामाणिकपणाच्या, शिक्षणनिष्ठेच्या आणि धम्मसेवेच्या बळावर हजारो माणसांच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण केले. हा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नाही; तर संघर्ष, स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकीच्या विजयाचा आहे.
आज त्यांच्या आयुष्याकडे मागे वळून पाहिले तर प्रत्येक टप्प्यावर संघर्ष आहे; पण त्या संघर्षावर मात करणारी जिद्दही आहे. प्रत्येक वळणावर अडचणी आहेत; पण त्या अडचणींना संधीमध्ये रूपांतरित करणारे धैर्यही आहे. प्रत्येक यशामागे निःस्वार्थ परिश्रम आहेत आणि प्रत्येक परिश्रमामागे समाजाप्रती असलेली अखंड निष्ठा आहे. म्हणूनच त्यांचे जीवन हे चरित्र नसून प्रेरणेचा अखंड झरा आहे. आजच्या स्पर्धेच्या, स्वार्थाच्या आणि मूल्यसंकटाच्या काळात विलास आनंदा कटारे यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वे समाजासाठी दीपस्तंभ ठरतात. ती आपल्याला शिकवतात की, मोठेपणा पदात नसतो; तो विचारात असतो. श्रीमंती संपत्तीत नसते; ती संस्कारांत असते. विजय इतरांवर मिळविण्यात नसतो; तो स्वतःच्या स्वार्थावर मिळविण्यात असतो. आणि अमरत्व स्मारकांत नसते; ते माणसांच्या मनात जिवंत राहण्यात असते.
भगवान बुद्धांनी दिलेली प्रज्ञा, करुणा आणि मैत्री, महात्मा फुले यांनी दिलेला सत्यशोधाचा मार्ग, छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली सामाजिक समतेची प्रेरणा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संविधाननिष्ठ मानवमुक्तीची दिशा, या चार महान विचारप्रवाहांचा सुंदर संगम विलास आनंदा कटारे यांच्या जीवनात दिसून येतो. त्यांनी हे विचार केवळ वाचले नाहीत; ते जगले. त्यांनी ते केवळ सांगितले नाहीत; कृतीतून सिद्ध केले.
माणसाने किती वर्षे जगले यापेक्षा त्याने किती माणसे घडविली, किती अश्रू पुसले, किती विचार जागविले आणि किती हृदयांमध्ये आशेचा दीप प्रज्वलित केला हेच त्याच्या आयुष्याचे खरे मोजमाप असते. या कसोटीवर पाहिले तर विलास आनंदा कटारे यांचे आयुष्य विलक्षण समृद्ध, यशस्वी आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरते. त्यांचा हा गौरवशाली जीवनप्रवास आगामी पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहो. त्यांच्या विचारांचा प्रकाश अधिक व्यापक होवो. त्यांनी घडविलेले विद्यार्थी समाजात विवेक, समता आणि मानवतेची मशाल अधिक तेजाने प्रज्वलित ठेवोत. त्यांनी सुरू केलेली धम्मसेवेची परंपरा अधिक बळकट होत राहो. त्यांनी जपलेली संविधाननिष्ठ मूल्ये प्रत्येकाच्या जीवनात रुजोत. याच सदिच्छांसह या साध्या, संवेदनशील, कर्तव्यनिष्ठ, विवेकवादी आणि धम्मनिष्ठ व्यक्तिमत्त्वाला कृतज्ञ अभिवादन.
विलास आनंदा कटारे हे केवळ सेवानिवृत्त मुख्याध्यापक नाहीत; ते प्रज्ञेचा दीप, समतेचे वारकरी, मानवतेचे उपासक आणि विवेकनिष्ठ धम्मसेवेचे अखंड दीपस्तंभ आहेत. त्यांच्या कार्याचा सुवास काळाच्या पलीकडे दरवळत राहील, आणि त्यांनी प्रज्वलित केलेला विवेक, करुणा, समता आणि मानवतेचा दीप पुढील अनेक पिढ्यांच्या मार्गाला प्रकाश देत राहील.
संतोष अर्जुन अवसरमोल (पत्रकार तथा लेखक) मु.पो. घाटबोरी, ता. मेहकर, जि. बुलढाणा मो:- 9689777129



