सत्तेसाठी संघर्ष, पंगतीत मात्र एकत्र : देऊळगाव साकर्शातील आजी-माजी आमदारांचा फोटो चर्चेत !
घाटबोरी, प्रतिनिधी

सत्तेसाठी संघर्ष, पंगतीत मात्र एकत्र : देऊळगाव साकर्शातील आजी-माजी आमदारांचा फोटो चर्चेत !
राजकारणात कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो, हे वास्तव महाराष्ट्राच्या राजकारणात वेळोवेळी दिसून आले आहे. हे वास्तव पुन्हा एकदा ठळकपणे समोर आले. मेहकर मतदारसंघातील देऊळगाव साकर्शा येथे घडलेल्या एका प्रसंगामुळे राजकीय वर्तुळात तसेच सामान्य जनतेमध्ये मोठी चर्चा सुरु झाली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात थेट लढलेले आणि प्रचाराच्या रणधुमाळीत एकमेकांवर कठोर शब्दांचे वार करणारे, आजी व माजी आमदार, एका धार्मिक कार्यक्रमात एकत्र दिसल्याने हा फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मेहकर मतदारसंघातील उबाठा शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात आणि शिंदे शिवसेनेचे माजी आमदार संजय रायमुलकर हे श्री संत नारायणपुरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित देऊळगाव साकर्शातील कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर तसेच महाप्रसादाच्या पंगतीत एकत्र दिसून आले. हा क्षण कॅमेऱ्यात कैद होताच, फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि राजकीय वर्तुळासह सामान्य जनतेतही चर्चा रंगू लागली. निवडणुकीच्या रणांगणात कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे हे दोन्ही नेते, श्रद्धा आणि परंपरेच्या चौकटीत मात्र एकत्र आलेले दिसल्याने हा प्रसंग विशेष लक्ष वेधून घेत आहे. महाप्रसादाच्या पंगतीत माजी आमदार संजय रायमुलकर भाविकांसोबत खाली बसून प्रसाद घेताना दिसले, तर आमदार सिद्धार्थ खरात भाविकांना प्रसाद वाटताना दिसले. संतांच्या चरणी नतमस्तक होत, राजकीय मतभेद बाजूला ठेवले जात असल्याचे चित्र या दृश्यातून स्पष्ट झाले. हा क्षण कॅमेऱ्यात कैद होताच संबंधित फोटो सोशल मीडियावर पसरला आणि त्यावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. निवडणुकीच्या रणांगणात आरोप-प्रत्यारोप, संघर्ष आणि टोकाची भूमिका पाहायला मिळते; मात्र सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक प्रसंगी तेच नेते एकत्र येताना दिसतात. सत्ता, निवडणूक आणि राजकीय समीकरणांसाठी संघर्ष अटळ असतो; तरीही श्रद्धा, परंपरेपूढे अनेकदा राजकीय अंतर कमी होत असल्याचे चित्र समोर येते. या फोटोमुळे सामान्य नागरिकांमध्येही प्रतिक्रिया उमटत आहेत. “आपण उगाचच नेत्यांसाठी आपसात भांडतो”, “राजकारण हे फक्त सत्तेसाठीच आहे” अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. नेते वेळेनुसार संघर्ष करतात, प्रसंगानुरूप एकत्र येतात; परंतु त्या संघर्षाची किंमत अनेकदा कार्यकर्ते आणि मतदारांना मोजावी लागते, हा मुद्दाही या चर्चेतून पुढे येत आहे. देऊळगाव साकर्शातील हा प्रसंग महाराष्ट्राच्या राजकारणाला एक ठळक संदेश देतो. तो म्हणजे, राजकारण हे भावनांपेक्षा गणितावर चालते, आणि प्रसंगानुरूप आपली दिशा बदलते. श्रद्धा, समाज आणि परंपरेसमोर राजकीय भिंती क्षणभर बाजूला पडतात. शेवटी, हा व्हायरल फोटो फक्त एका कार्यक्रमापुरता मर्यादित नसून, तो राजकारणाच्या वास्तवावर प्रकाश टाकणारा आरसा आहे. राजकारणात विरोध असतो, पण तो कायमचा वैर नसतो, आणि हेच या छायाचित्रातून ठामपणे अधोरेखित होते.



