ताजे अपडेट

जिल्हा पोलीस अधीक्षक निलेशजी तांबे : जनतेचा विश्वास, गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ

घाटबोरी, प्रतिनिधी

 

सुरक्षित बुलढाणा– कायद्याचा जिल्हा

पोलीस अधीक्षक निलेशजी तांबे : जनतेचा विश्वास, गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ

कोणत्याही जिल्ह्याची खरी ओळख केवळ त्याच्या भौगोलिक सीमा, ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक परंपरा किंवा विकासकामांनी घडत असली; तर त्या जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था, नागरिकांच्या मनातील सुरक्षिततेची भावना आणि न्यायव्यवस्थेवरील अढळ विश्वास यांमुळेच अधिक दृढ विश्वासार्हता प्राप्त होते. ज्या भूमीत कायद्याचे राज्य सर्वांसाठी समानतेने लागू होते, जिथे गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनात पोलीस प्रशासनाविषयी विश्वास असतो, तो जिल्हा विकासाच्या दिशेने अधिक आत्मविश्वासाने वाटचाल करतो.

बुलढाणा जिल्हा आज अशाच सकारात्मक परिवर्तनाचा साक्षीदार ठरत असून, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेशजी तांबे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली कायदा-सुव्यवस्था अबाधित असून, सामाजिक सलोखा, एकोपा, समानता असून बुलढाणा जिल्हा सुरक्षित असून कायदाचा जिल्हा
अधिक बळकट झाल्याचे चित्र, जनतेच्या विश्वासामुळे स्पष्टपणे दिसून येत आहे.

कायदा हा केवळ शासनाने घालून दिलेला नियम नसतो; तो सुसंस्कृत समाजाचा कणा असतो. कायद्याचा आदर राखणाऱ्या समाजात शांतता, सुव्यवस्था, सामाजिक सलोखा आणि विकासाची प्रक्रिया अधिक वेगाने घडते. या जाणिवेतून बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने गेल्या वर्षभरात गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेत प्रभावी आणि परिणामकारक कारवाया राबविल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेशजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलीस यंत्रणा जनतेशी संवाद साधत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी करत कार्यरत आहे.

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अवैध धंद्यांविरोधातील सातत्यपूर्ण कारवाया, संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण, अमली पदार्थांविरोधातील विशेष मोहिमा, सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण, वाहतूक शिस्तीची काटेकोर अंमलबजावणी आणि संवेदनशील परिस्थितीचे नियोजनबद्ध व्यवस्थापन या सर्व बाबींमध्ये बुलढाणा पोलीसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा अधिक सक्षम, विश्वासार्ह आणि जनाभिमुख बनली आहे.

१९ कोटींपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

गेल्या वर्षभरात बुलढाणा जिल्हा पोलीसांनी विविध गुन्ह्यांमध्ये तब्बल १९ कोटी १९ लाख १५ हजार ६०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही केवळ आकडेवारी नसून गुन्हेगारीविरोधातील कठोर कारवाईचे आणि कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचे जिवंत उदाहरण आहे. या कारवायांमुळे गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.

गंभीर गुन्ह्यांच्या उकलण्यात उल्लेखनीय यश

खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांपैकी ७९ टक्के गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात जिल्हा पोलीसांना यश आले आहे. गुन्ह्यांचा जलद तपास, आरोपींचा शोध, वैज्ञानिक पुराव्यांचा वापर आणि तपासातील काटेकोरपणा यामुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. ही यशस्वी उकल केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नसून गुन्हेगारांसाठी कायद्याचा स्पष्ट इशारा ठरली आहे.

मिशन परिवर्तन’ने अमली पदार्थांच्या जाळ्याला जबरदस्त धक्का

जिल्हा पोलीस अधीक्षक निलेशजी तांबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘मिशन परिवर्तन’ या मोहिमेने अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायावर मोठा आघात केला आहे. या मोहिमेत ५५ गुन्हे दाखल करून ५८ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच ३२४.८४६ किलो गांजा व अफूसह सुमारे १ कोटी ९९ लाख ७८ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यासोबतच व्यसनमुक्ती अभियान, शाळा-महाविद्यालयांतील जनजागृती कार्यक्रम आणि युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.

अवैध रेती तस्करीविरोधात धडक कार्यवाही

पर्यावरणाच्या दृष्टीने घातक ठरणाऱ्या अवैध रेती उत्खनन व तस्करीविरोधात बुलढाणा पोलीसांनी व्यापक मोहीम उघडली. या कारवाईत ५३ गुन्हे दाखल, १०१ आरोपींना अटक आणि ५ कोटी ७८ लाख २४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवायांमुळे रेती माफियांना मोठा आर्थिक फटका बसला असून बेकायदेशीर उत्खननावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

प्रतिबंधित गुटखा, अवैध मद्यविक्री आणि जुगाराविरोधात कठोर कारवाई

आरोग्यास अपायकारक प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध व्यापाराविरोधात १२ गुन्हे दाखल करून १४ आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत १ कोटी ८ लाख ३९ हजार १५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याशिवाय मद्यविक्री कायद्यांतर्गत १,९८१ गुन्ह्यांमध्ये २,०२८ आरोपींवर कारवाई, तर जुगारविरोधी ८४२ कारवायांमध्ये १,२१५ आरोपींना कायद्याचा दणका देण्यात आला. या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे समाजविघातक प्रवृत्तींना मोठा आळा बसल्याचे दिसून येत आहे.

सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण

डिजिटल युगात वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी बुलढाणा पोलीसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. हरवलेले २१७ मोबाईल फोन मूळ मालकांना परत मिळवून देण्यात आले. तसेच सायबर फसवणुकीतील १७ लाख २८ हजार १३८ रुपये तक्रारदारांना परत मिळवून देण्यात यश आले आहे. सायबर जनजागृती अभियान, ऑनलाइन फसवणुकीबाबत मार्गदर्शन आणि तातडीची पोलीस मदत यामुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

हरविलेल्या व्यक्तींचा शोध; अपहरण प्रकरणांत यश

अपहरणाच्या ११० प्रकरणांपैकी ९१ व्यक्तींची सुरक्षित सुटका, तसेच हरविलेल्या ७१८ व्यक्तींपैकी ५१२ जणांचा शोध घेण्यात पोलीसांना यश आले आहे. संवेदनशील तपास आणि तातडीच्या शोधमोहीमांमुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

वाहतूक शिस्तीवर भर

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ५५ हजार ९२९ प्रकरणांत कारवाई करून ४ कोटी १४ लाख ४६ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ११२ वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली. या उपाययोजनांमुळे रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती वाढण्यास मदत झाली आहे.

जनतेशी थेट संवाद साधणारी पोलीस व्यवस्था

केवळ गुन्हे उघडकीस आणणे किंवा आरोपींना अटक करणे एवढ्यावरच बुलढाणा पोलीसांचे कार्य मर्यादित राहिलेले नाही. कम्युनिटी पोलीसिंग, महिला व बालक सुरक्षा, डायल ११२ सेवा, सायबर सुरक्षा जनजागृती, शाळा-महाविद्यालयांतील मार्गदर्शन कार्यक्रम, वृक्षारोपण मोहिमा, जनजागृती रॅली, सामाजिक सलोखा निर्माण करणारे उपक्रम आणि नागरिकांशी थेट संवाद यामुळे पोलीस दलाने जनतेशी विश्वासाचे नाते अधिक दृढ केले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना, संवेदनशील घटनांचे प्रभावी व्यवस्थापन, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांदरम्यान शांतता राखणे आणि प्रत्येक नागरिकाला तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न यामुळे बुलढाणा जिल्ह्यात सुरक्षिततेची भावना अधिक मजबूत झाली आहे.

जनतेचा विश्वास, गुन्हेगारांना धाक

जिल्हा पोलीस अधीक्षक निलेशजी तांबे यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने कठोर कारवाई आणि संवेदनशील जनसंपर्क यांचा प्रभावी समतोल साधला आहे. गुन्हेगारांसाठी कायद्याचा कठोर संदेश देतानाच सर्वसामान्य नागरिकांना विश्वास देणारी पोलीस व्यवस्था उभी करण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय ठरत आहे. त्यामुळेच आज जिल्ह्यात “जनतेचा विश्वास आणि गुन्हेगारांना धाक” अशी पोलीस प्रशासनाची ओळख निर्माण झाली आहे.

सुरक्षित बुलढाण्याकडे भक्कम वाटचाल

आज बुलढाणा जिल्हा केवळ भौगोलिक सीमांनी ओळखला जाणारा जिल्हा राहिलेला नाही; तर प्रभावी कायदा-सुव्यवस्था, सक्षम पोलीस यंत्रणा आणि जनतेच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या प्रशासनामुळे “सुरक्षित बुलढाणा, कायद्याचा जिल्हा” म्हणून नवी ओळख निर्माण करत आहे. शांतता, सुरक्षितता, न्याय आणि कायद्याचे अधिराज्य हीच प्रगत समाजाची खरी ताकद असते. ही ताकद अधिक बळकट करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने उभारलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी असून, भविष्यातही बुलढाणा जिल्हा सुरक्षित, शांत आणि कायद्याचा आदर्श जिल्हा म्हणून ओळखला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका