जनतेचा विश्वास हीच माझ्या सेवेला मिळालेली खरी पावती : ठाणेदार अमरनाथ नागरे
घाटबोरी, प्रतिनिधी

जनतेचा विश्वास हीच माझ्या सेवेला मिळालेली खरी पावती : ठाणेदार अमरनाथ नागरे
“पोलीस अधिकारी म्हणून जनतेच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावणे ही माझी जबाबदारी होती; मात्र सेवाकाळात जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि आत्मीयता हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. आज पेरणीच्या धावपळीच्या दिवसातही असंख्य नागरिक केवळ शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू आणि मनातील प्रेम पाहून मी अक्षरशः भारावून गेलो. हीच माझ्या प्रामाणिक कर्तव्यनिष्ठेची खरी पावती आहे,” अशा भावनिक शब्दांत डोणगावचे ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
डोणगाव येथे संजीवनी सेवाभावी परिवाराच्या वतीने ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या निरोप समारंभासह नवनियुक्त ठाणेदार गणेश इंगोले आणि पोलीस उपनिरीक्षक विजय अजमिरे यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन अत्यंत उत्साहपूर्ण भावनिक वातावरणात करण्यात आले. शांतता समितीचे सदस्य हमीदभाई मुल्लाजी यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपल्या मनोगतात अमरनाथ नागरे पुढे म्हणाले, “या तीन वर्षांच्या सेवाकाळात अधिकारी म्हणून काम करताना अनेकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. जनतेचा विश्वास संपादन करता आला, हेच माझ्यासाठी सर्वात मोठे यश आहे. बदली हा शासकीय सेवेचा अविभाज्य भाग असला तरी डोणगाव-घाटबोरीच्या परिसरातील नागरिकांनी दिलेले प्रेम आयुष्यभर विसरणार नाही. माझ्यानंतर येणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यालाही अशीच साथ आणि आपुलकी द्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य जीवनसिंह दिनोरे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच संजय आखाडे, शांतता समितीचे ज्येष्ठ सदस्य अशोकराव पळसकर, सरपंच शिवचरण आखाडे, उपसरपंच शाम इंगळे, सुप्रसिद्ध साहित्यिक संतोष अवसरमोल यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन अधिकारींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. नकुल फुले यांनी या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना समाज आणि पोलीस यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. यावेळी विविध सामाजिक संस्था, पत्रकार, शांतता समितीचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ठाणेदार अमरनाथ नागरे व पोलीस उपनिरीक्षक विजय अजमिरे यांचा सत्कार करून त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला. यावेळी घाटबोरी येथील रहिवासी असलेले, सुप्रसिद्ध साहित्यिक संतोष अवसरमोल, उपप्राचार्य सुरेंद्रसिंह चव्हाण आणि बशीर शाह यांनी आपल्या मनोगतात नागरे यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळातील कर्तव्यदक्षता, जनसंपर्क, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि सर्वसामान्यांशी जपलेला जिव्हाळा यांचा विशेष उल्लेख करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक विजय अजमिरे यांनी आपल्या मनोगतात जातीय सलोखा, सामाजिक ऐक्य आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हमीद मुल्लाजी यांनी केले, तर गजानन खिल्लारी यांनी आभार मानले.
या प्रसंगी सैय्यद अब्बास, दीपक आखाडे, बंकुसेठ सारडा, आसीफ खान, किरण देवकर, डॉ. जमील पठाण, राजेश वाघमारे, जलाल खान, गणेश पळसकर, अबरार खान, प्रल्हाद खोडके, जावेद खान ठेकेदार, शब्बीरभाई, आलिम साहेब, सालार बेग, गणेश घोगल, राजीक खान, राजू पुजारी, सामाजिक कार्यकर्त्या महेफुजा परवीन सैय्यद यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डोणगावमध्ये पार पडलेला हा निरोप समारंभ केवळ एका अधिकाऱ्याच्या बदलीचा कार्यक्रम नव्हता; तर जनतेच्या मनामनात आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, विश्वास निर्माण करणाऱ्या एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याप्रती व्यक्त झालेल्या कृतज्ञतेचा अविस्मरणीय सोहळा होता.



