विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया घडवणारी आणि संस्कारधन पेरणारी आदर्श शाळा : सरपंच राजकुमार पाखरे
घाटबोरी, प्रतिनिधी

पीएमश्री घाटबोरी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया घडवणारी आणि संस्कारधन पेरणारी आदर्श शाळा : सरपंच राजकुमार पाखरे
“देशाचे भवितव्य तरुण पिढीच्या हातात असते, असे म्हटले जाते; मात्र त्या तरुण विद्यार्थ्यांना घडविण्याचे आणि त्यांच्या मनावर शिक्षणरूपी संस्कारधन पेरण्याची जबाबदारी ही जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांवर असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया अधिक मजबूत करणारी संस्था म्हणजे जिल्हा परिषद शाळा होय,” असे प्रतिपादन घाटबोरीचे सरपंच राजकुमार पाखरे यांनी केले.
देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी सजग, सुजाण आणि सुसंस्कारित तरुण पिढी घडवणे तसेच त्यांचा शैक्षणिक पाया अधिक दृढ करणे ही जबाबदारी जिल्हा परिषद शाळा प्रभावीपणे पार पाडत आहेत, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात संस्कारधनाची पेरणी करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा भक्कम पाया येथेच रचला जातो, असेही सरपंच पाखरे म्हणाले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडतो, असेही त्यांनी सांगितले. ते मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथील पीएमश्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलत होते. या स्नेहसंमेलनाचे आयोजन अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी उत्सवमय चैतन्याचे वातावरण सकाळपासूनच शाळेच्या परिसरात दिसून आले. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण शाळा आनंदाने न्हालेली होती. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रिबन कापून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सरपंच राजकुमार पाखरे, पत्रकार संतोष अवसरमोल, उपसरपंच विजयसिंग चव्हाण, शाळा समिती अध्यक्ष सचिन कोरडे, उपाध्यक्ष शंकर राठोड, मुख्याध्यापक सुभाष देशमुख यांच्यासह शाळा समिती सदस्य सौ. सुवर्णा सोनुने, सौ. छाया खिल्लारी, सौ. स्वातीताई नवले, सौ. मंजुळाबाई राठोड, श्रीराम जाधव, गोविंद दांडदे, सुधीर कोरडे, संजय नवले, राजेश नवले, शेषराव अंभोरे, अफसर मिस्री, तसेच शाळेतील शिक्षक विजय दांडदे, प्रमोद देशमुख, मंचक नालेगावकर, महेश इंगळे, साकेत पैठणे, गणेश मांडवेकर, जनार्धन पांचाळ, वासुदेव निकम, इरफान रिजवी, सद्दाम शहा आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शैक्षणिक प्रगतीसोबतच संस्कार, कला आणि सामाजिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पोशाखात उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे प्रत्येक सादरीकरण प्रभावी ठरले. गोड सुरांनी सजलेले गायन आणि समाजप्रबोधन करणारे नाट्यप्रयोग उपस्थितांच्या मनाला भिडणारे ठरले आणि त्यांच्याकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. या प्रसंगी शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे, बक्षिसे आणि गौरवचिन्हे प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या गौरवामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत झाला तसेच इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली. वार्षिक स्नेहसंमेलन हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा उत्सव ठरला. शिक्षकांचे परिश्रम, विद्यार्थ्यांची प्रतिभा आणि पालकांचा भक्कम पाठिंबा यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद आणि पालकवर्गाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
बालकाच्या आयुष्याची पहिली शाळा म्हणजे त्याचे घर होय : सुभाष देशमुख, मुख्याध्यापक

आई-वडिलांकडून मिळणारे संस्कार विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भक्कम पाया घडवतात, तर शिक्षक त्या पायावर ज्ञान, शिस्त आणि शिक्षणरूपी संस्कारधनाची मजबूत उभारणी करतात. आजचा काळ हा केवळ प्रगतीचा नसून मूल्यांच्या कसोटीचा काळ आहे. यश, स्पर्धा आणि धावपळ यांच्या गर्जनेत माणुसकी, शिस्त आणि संस्कार टिकवून ठेवणे हेच सर्वांत मोठे आव्हान बनले आहे. अशा परिस्थितीत केवळ हुशार नव्हे, तर संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हेच खरे कर्तव्य आहे. आज सुसंस्कृत आणि सुजाण नागरिक घडविण्याची जबाबदारी पालक आणि शिक्षक यांच्यावर आहे, असे मुख्याध्यापक सुभाष देशमुख यांनी सांगितले.



