डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत साजरी करा : संतोष खाडे, एसडीपीओ
घाटबोरी, प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत साजरी करा : संतोष खाडे, एसडीपीओ
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर विचार आत्मसात करून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करावी आणि समाजात एक आदर्श निर्माण करावा. बाबासाहेबांची जयंती उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी केले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. सदर बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, कर्तव्यदक्ष ठाणेदार अमरनाथ नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर घायाळ यांच्यासह प्रत्येक गावातील पोलीस पाटील, शांतता समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि पत्रकार उपस्थित होते.
यावेळी एसडीपीओ संतोष खा डे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत साजरी करण्यासाठी पोलीस प्रशासन आपल्याला पूर्ण सहकार्य करेल. ज्या प्रमाणे आपण दरवर्षी महापुरुषांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजऱ्या करतो, त्याचप्रमाणे यंदाही हा उत्सव आनंदात आणि शांततेत पार पाडावा. उत्साहाच्या भरात कुठेही मद्यपान करून वाद घालणे तसेच मिरवणुकांमध्ये अडथळे निर्माण करणे टाळावे. तसेच सोशल मीडियावर पोस्ट करताना कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
आणि जयंतीच्या पवित्र उत्सवाला कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या बैठकीत डोणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमधील पोलीस पाटील, शांतता समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. जयंतीनिमित्त गावागावांत निघणाऱ्या मिरवणुकांबाबत आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले.



