‘राखीच्या पवित्र धाग्यातून उमटलेला बहीण-भावाचा जिव्हाळा; अॅड. माधुरी पवार
घाटबोरी, प्रतिनिधी

राखीच्या पवित्र धाग्यातून उमटलेला बहीण-भावाचा जिव्हाळा; अॅड. माधुरी पवार
राखी… मनगटावर बांधला जाणारा एक छोटासा धागा. दिसायला साधा, नाजूक आणि हलका; मात्र त्यामागे दडलेली भावना अतिशय खोल, व्यापक आणि कालातीत आहे. भारतीय संस्कृतीत रक्षाबंधन हा केवळ सण नसून तो नात्यांचा उत्सव आहे. बहिणीच्या प्रेमाचा, भावाच्या जबाबदारीचा आणि परस्पर विश्वासाचा हा उत्सव शतकानुशतके साजरा होत आला आहे. काळ बदलला, जीवनशैली बदलली, सणांचे स्वरूप बदलले; मात्र राखीच्या धाग्यात गुंफलेली माणुसकी आजही तितकीच जिवंत आहे. आजच्या डिजिटल, वेगवान आणि बाजारप्रधान युगात अनेक सण औपचारिकतेपुरते मर्यादित होत चालले आहेत. झगमगत्या राख्या, महागड्या भेटवस्तू, सोशल मीडियावरील औपचारिक शुभेच्छा आणि काही मिनिटांत आटोपणारा सण एवढ्यापुरताच अनेक ठिकाणी उरलेले दिसत आहेत. नात्यांमधील आपुलकी, संवाद आणि जबाबदारी मागे पडत आहे. अशा काळातही काही व्यक्ती आणि काही उपक्रम असे आहेत, जे या सणाला पुन्हा त्याच्या मूळ मूल्यांशी जोडतात आणि समाजाला विचार करायला भाग पाडतात. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ जि.प. सर्कलमधील अॅड. माधुरी देवानंद पवार यांनी रक्षाबंधनाला दिलेले सामाजिक रूप हे त्याचे ठळक उदाहरण आहे. सप्तश्रृंगी महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत असलेल्या अॅड. माधुरी पवार यांनी चार वर्षांपूर्वी रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक वेगळा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला साध्या कल्पनेतून सुरु झालेला हा उपक्रम आज महिला सक्षमीकरण, सामाजिक सलोखा आणि माणुसकीच्या मूल्यांचा प्रभावी मंच ठरला आहे. हा उपक्रम केवळ राख्या तयार करण्यापुरता मर्यादित नाही; तर तो अनेक महिलांच्या आयुष्यात आशेचा, आत्मविश्वासाचा आणि स्वाभिमानाचा नवा धागा विणणारा प्रवास आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या महिला विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीतून आलेल्या आहेत. काही गृहिणी, काही कष्टकरी महिला, ज्यांच्या हाताला काम होते, पण कलेची ओळख नव्हती; तर काही आर्थिक विवंचनेत संघर्षाचे होते. अनेक महिलांना पहिल्यांदाच राखीचा पवित्र धागा गुंफण्याची संधी या उपक्रमातून मिळाली. राखी तयार करताना त्यांच्या हातात केवळ रंगीत धागे आणि मणी येत नाहीत, तर त्यांच्या मनात आत्मविश्वासाची घट्ट गाठ बांधली जाते. “आपणही काही करू शकतो,” ही भावना अनेक महिलांसाठी आयुष्य बदलणारी ठरली आहे. काही महिलांसाठी हा उपक्रम म्हणजे पहिल्यांदाच स्वतःच्या कष्टातून कला जोपासण्याचा अनुभव. यंदा या उपक्रमातून सुमारे शंभर महिलांना थेट रोजगार मिळाला. हा आकडा केवळ संख्येपुरता मर्यादित नाही; कारण प्रत्येक आकड्यामागे एक स्वप्न दडलेले आहे. त्यातून मिळणारा स्वाभिमान आणि आत्मविश्वास, जिव्हाळा, अमूल्य आहे. या उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यामागील व्यापक सामाजिक दृष्टिकोन. पारंपरिक रक्षाबंधन हे बहिण-भाऊ या रक्ताच्या नात्यापुरते मर्यादित असते; मात्र अॅड. माधुरी पवार यांच्या उपक्रमात “समाजातील प्रत्येक भाऊ आपलाच” ही भावना प्रत्यक्षात उतरते. जात, धर्म, भाषा किंवा आर्थिक स्तर यांचा कोणताही भेद न करता तयार केलेल्या राख्या समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवल्या जातात. शेतकरी, कामगार, पोलीस, सफाई कर्मचारी, अधिकारी, कर्मचारी सर्वांच्या हातावर या राख्या बांधल्या जातात. गेल्या चार वर्षांत मेहकर तालुक्यात एक लाखांहून अधिक राख्या भावांच्या हातावर बांधण्यात आल्या आहेत. हा आकडा केवळ विक्रम म्हणून महत्त्वाचा नाही; तर तो समाजातील परस्पर विश्वास, आपुलकी आणि स्वीकाराचे प्रतीक आहे. प्रत्येक राखीसोबत पाठवले जाणारे हस्तलिखित पत्र हा या उपक्रमाचा आणखी एक भावनिक आणि प्रभावी पैलू आहे. “काळजी घ्या,” “आपली जबाबदारी जपा,” “समाजासाठी काहीतरी करा,” अशा साध्या पण अर्थपूर्ण शब्दांतून एक अनामिक बहीण समाजातील भावाशी संवाद साधते. अनेक भावांनी ही पत्रे आजही जपून ठेवलेली आहेत. या उपक्रमातील सर्वात हृदयस्पर्शी बाब म्हणजे अनाथ मुलांसाठी केलेले कार्य. अनेक मुलांच्या आयुष्यात बहिणीचे नाते नसते. कोण राखी बांधणारे नसते, कोण “भाऊ” म्हणून हाक मारणारे नसते. अशा मुलांना स्वतः अॅड. माधुरी पवार राखी बांधतात. त्या क्षणी राखी केवळ सण राहत नाही; ती आधार, विश्वास आणि मायेचा स्पर्श बनते. अनेक मुलांसाठी ती राखी म्हणजे “आपणही कुणाचे आहोत” या भावनेची पहिली ओळख ठरते. अॅड. माधुरी पवार यांचे सामाजिक कार्य या उपक्रमापुरते मर्यादित नाही. महिलांना स्वावलंबी करणे, वंचित कुटुंबांसाठी घरे उभारणे, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत, आपत्तीग्रस्तांसाठी तत्काळ मदतीचा हात या सर्व कार्यांचा केंद्रबिंदू एकच आहे: माणूस. त्यांच्या कार्यातून नेतृत्वाची वेगळीच व्याख्या समोर येते. नेतृत्व म्हणजे केवळ पद नव्हे; नेतृत्व म्हणजे जबाबदारी आणि संवेदनशीलता. या उपक्रमाला स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या राख्या स्वीकारून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला आहे. विशेष म्हणजे तरुण वर्ग स्वयंसेवक म्हणून पुढे येऊन, राखी वितरण, पत्र लेखन, नियोजन आणि आयोजनात तरुणांचा सक्रिय सहभाग दिसून आलेला आहे. त्यामुळे सण साजरे करताना समाजासाठी काहीतरी देण्याची जाणीव या उपक्रमातून निर्माण झालेली आहे. आज हा उपक्रम केवळ जानेफळ किंवा मेहकर तालुक्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो एक विचार म्हणून पुढे जात आहे. अनेक सामाजिक संस्था, महिला बचतगट आणि तरुण या उपक्रमाकडे प्रेरणेने पाहत आहेत. कारण येथे नुसती राखी बांधली जातनाही; येथे आत्मसन्मान घडवला जातो. जिव्हाळ्याच नाते घट्ट विणली जातात. राखी दिसायला लहान असते; पण जेव्हा तिच्या धाग्यात स्वप्ने, स्वाभिमान, संघर्ष आणि आपुलकी गुंफली जाते, तेव्हा ती समाजाला घट्ट बांधून ठेवणारी ताकद बनते. अॅड. माधुरी देवानंद पवार यांच्या या उपक्रमाने हे ठामपणे सिद्ध केले आहे की केवळ रोजगाराची संधी नसून, अनेकांच्या आयुष्यात प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचा ओलावा निर्माण केला आहे. आज ज्या काळात नाती तुटक होत चालली आहेत, त्या काळात राखीच्या या धाग्यातून उलगडणारी माणुसकीची ही चळवळ समाजाला नवी दिशा देणारी ठरत आहे. म्हणूनच ही राखी केवळ सण नाही. ती आहे माणुसकीचा अखंड धागा जो समाजाला, नात्यांना आणि मूल्यांना एकत्र बांधून ठेवतो.



