ताजे अपडेट

अपशकुनाच्या परंपरांना मोडीत काढत समाजपरिवर्तनाचा आदर्श

घाटबोरी, प्रतिनिधी

अपशकुनाच्या परंपरांना मोडीत काढत समाजपरिवर्तनाचा आदर्श

विधवा महिलांनी ॲड. माधुरी पवार यांना लावले हळदी-कुंकू

मेहकर तालुक्यातील ॲड. माधुरी देवानंद पवार या कर्तृत्ववान समाजसेविकेने समाजातील कुजलेल्या अपशकुनी परंपरांना मोडीत काढत स्त्रीविरोधी व अन्यायकारक रूढींना थेट आव्हान देत सामाजिक उपक्रमाचा नवा अध्याय सुरु केला आहे. आजवर विविध सामाजिक उपक्रमांतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात समाजसेवेचा ठसा उमटवणाऱ्या ॲड. माधुरी पवार यांनी यावेळी विधवा महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ आयोजित करून अपशकुनाच्या मानसिकतेला मोडीत काढले आहे. “मीही एक स्त्री आहे; माझ्यासारख्या प्रत्येक स्त्रीला सन्मानाने, निर्भयपणे आणि स्वतंत्रपणे जगता आलंच पाहिजे,” या ठाम विचारातून ॲड. माधुरी पवार यांनी हा धाडसी उपक्रम राबवला. हा कार्यक्रम केवळ धार्मिक सोहळा नव्हता, तर समाजातील दांभिकता, अन्याय आणि स्त्रीदमनाविरोधातील ठाम भूमिका स्पष्ट करणारा उपक्रम होता. मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे पार पडलेल्या या ऐतिहासिक हळदी-कुंकू सोहळ्यात विधवा महिलांनीच परंपरेला फाटा देत, ॲड. माधुरी पवार यांना हळदी-कुंकू लावले. हा क्षण अनेकांसाठी भावनिक, तर समाजासाठी अंतर्मुख करणारा ठरला. देवानंद पवार फाउंडेशन आणि सखी रिसायकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमाने समाजमनाला जबरदस्त धक्का देत सकारात्मक परिवर्तनाची ठिणगी पेटवली. आजही पतीच्या निधनानंतर महिलांवर सण, उत्सव, आनंद आणि धार्मिक विधींवर बंदी घातली जाते. अशा रुढी-परंपरांमुळे विधवा महिलांना मानसिक, सामाजिक आणि आर्थिक पातळीवर प्रचंड संघर्ष सहन करावा लागतो. मात्र ॲड. माधुरी पवार यांनी या अन्यायाला ठाम नकार देत विधवा महिलाही पूर्ण माणूस आहेत, त्यांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, हे कृतीतून समाजासमोर मांडले. या सोहळ्यात जात, धर्म आणि आर्थिक स्थिती यांची कोणतीही भिंत न ठेवता हजारो महिलांनी सहभाग घेतला होता. अनेक वर्षे समाजाच्या विविध कार्यक्रमापासून दूर असलेल्या त्या विधवा महिलांना या कार्यक्रमाने सन्मानाने मुख्य प्रवाहात आणले. हळदी-कुंकवाच्या कार्मायक्रमात मिळालेला मानसन्ममान महिलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, आत्मविश्वास आणि समाधान पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. अनेक महिलांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू वेदनेचे नव्हते, तर आत्मसन्मान पुन्हा मिळाल्याचे प्रतीक होते. कार्यक्रमाला प्रबोधनात्मक गायिका कांताबाई शिंदे यांची प्रभावी उपस्थिती लाभली. त्यांच्या प्रबोधनात्मक गीतांनी स्त्री स्वाभिमान, अन्यायाविरोधातील लढा आणि परिवर्तनाचा संदेश बुलंद केला. ॲड. माधुरी पवार यांच्या सामाजिक कार्याचा गीतांतून केलेला गौरव उपस्थित महिलांसाठी प्रेरणादायी ठरला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजीम नवाज राही यांनी करुन उपस्थितांची मने जिंकली होती. जानेफळ सर्कलसह परिसरातील विविध गावांतून महिलांची उस्फूर्त उपस्थिती बदलत्या समाजमनाचे स्पष्ट दर्शन घडवणारी होती. हा सोहळा केवळ हळदी-कुंकू कार्यक्रम न राहता स्त्री सक्षमीकरण, सामाजिक एकात्मता आणि माणुसकीच्या मूल्यांचे प्रभावी प्रतीक ठरला. कार्यक्रमानंतर महिलांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अशा उपक्रमांमुळे महिलांना बोलण्याचे बळ मिळते, अन्यायाविरोधात उभे राहण्याची हिंमत मिळते आणि समाजातील दांभिक रूढींना थेट आव्हान देता येते.
ॲड. माधुरी पवार, देवानंद पवार फाउंडेशन आणि सखी रिसायकल्स यांचा हा उपक्रम समाजाला आरसा दाखवणारा असून उपेक्षित महिलांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश पेरणारा आणि अपशकुनी परंपरा मोडीस काढणारा ठरला आहे.

एक वृद्ध महिला भावूक होत म्हणाली,
“२२ वर्षांनी माझ्या कपाळावर कुंकू लागलं. आज मला माणूस म्हणून पुन्हा स्वीकारल्यासारखं वाटतं.”
हा उपक्रम समाजाने विधवा महिलांवर लादलेल्या अन्यायाची जुन्या परंपरा मोडणारा आहे असे सांगितले.

ॲड. माधुरी पवार यांच्या पुढाकारातून मेहकर तालुक्यात विधवा महिलांसाठी नवी सामाजिक चळवळ उभी राहत आहे. मानसिक आधार, सामाजिक मार्गदर्शन, कायदेशीर हक्कांची माहिती आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांना केवळ ‘विधवा’ म्हणून नव्हे, तर स्वाभिमानी आणि सक्षम स्त्री म्हणून समाजात स्थान मिळत आहे. जानेफळ सर्कलमधील हा हळदी-कुंकू सोहळा समाजपरिवर्तनाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल असल्याचे दिसून येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका