
घाटबोरी येथे कबड्डी स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
“मीही लाल मातीच्या मैदानातील खेळाडूच”; माजी आ. संजय रायमुलकर
मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथे माजी सरपंच गजानन चनेवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपबापू देशमुख, सरपंच अरुण दळवी, तेजराव बाप्पू देशमुख, सरपंच ज्ञानेश्वर माऊली देशमुख, माजी ग्रामविकास अधिकारी डी.बी. जाधव, भगवान राठोड, गजानन धामनकर, विलास पाखरे, भानुदास इंगोले, आनंदा नवले, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ व युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते माजी सरपंच गजानन चनेवार यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने माजी उपसरपंच विजय पाटील नवले यांनी माजी आमदार रायमुलकर यांचा सन्मान केला. यावेळी माजी उपसरपंच सुभाष नवले, अमोल नवले, प्रकाश लोळेवार, आनंदा नवले, गजानन धामनकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी शाल व श्रीफळ देऊन माजी आमदारांचा सत्कार केला. वाढदिवसाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या या कबड्डी स्पर्धेमुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना माजी आमदार संजय रायमुलकर यांनी गजानन चनेवार यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. “गजानन चनेवार हे माणसे जोडणारे नेतृत्व आहे. त्यांचा स्वभाव शांत असून त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच सकारात्मकतेचे तेज दिसते. ते माणसांच्या गर्दीत हरवलेले असले, तरी त्यांच्या भोवती कायम माणसांचा गोतावळा असतो. गावाच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले असून आपल्या कारकिर्दीत गावाचा चेहरामोहरा बदलून टाकलेला आहे. सामाजिक जीवनात त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे,” असे गौरवोद्गार माजी आमदार संजय रायमुलकर यांनी काढले. यावेळी त्यांनी चनेवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दीर्घायुष्य, सुख, समृद्धी व आरोग्य लाभो, अशी सदिच्छा व्यक्त केली. यानंतर माजी आमदार रायमुलकर यांच्या हस्ते कबड्डी मैदानात नारळ फोडून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून विविध संघांनी मैदानात उतरून आपले कौशल्य सादर करण्यास सुरुवात केली. क्रीडा क्षेत्राबाबत बोलताना माजी आमदार रायमुलकर म्हणाले,
“मीही लाल मातीच्या मैदानातील खेळाडूच आहे. राजकारणात येण्यापूर्वी मी स्वतः अनेक कबड्डी सामने खेळले व जिंकलेले आहेत. खेळामुळे शिस्त, जिद्द, चिकाटी व संघभावना निर्माण होते. त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांनी खेळाकडे गांभीर्याने व सकारात्मक दृष्टीकोनातून पाहावे.” तसेच कबड्डीसारख्या पारंपरिक खेळांचे जतन व संवर्धन होणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपबापू देशमुख यांनीही मनोगत व्यक्त करत ग्रामीण युवकांना खेळाचे व्यासपीठ मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. “कबड्डी हा ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. अशा स्पर्धांमुळे युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यास मदत होते,” असे ते म्हणाले. या कबड्डी स्पर्धेत तालुक्यातील विविध गावांतील संघ सहभागी झाले असून सामने पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात आणि घोषणांच्या गजरात सामने रंगतदार ठरले. एकूणच, माजी सरपंच गजानन चनेवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली ही कबड्डी स्पर्धा क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरली असून युवकांमध्ये खेळाची आवड निर्माण करणारा आदर्श उपक्रम म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात आहे.



