
शब्दांच्या आरशात प्रतिबिंबित अंतर्मन : कवयित्री संगीता अरबुने
मराठी साहित्याच्या व्यापक, सजीव आणि सतत बदलत्या प्रवाहात काही लेखन असे असते, जे काळाच्या ओघात अधिक ठळकपणे उभे राहते, तर काही लेखन वाचकाच्या अंतःकरणात खोलवर घर करीत समाजाच्या अंतर्मनाचं प्रतिबिंब बनते. अशा लेखनाची ओळख म्हणजे कवयित्री संगीता सुहास अरबुने यांची लेखनकला. त्यांच्या कवितांमध्ये, कथांमध्ये, ललित लेखांमध्ये आणि वैचारिक लेखनात केवळ साहित्यप्रकाराचीच मांडणी नाही, तर स्त्रीजीवन, मध्यमवर्गीय वास्तव, मानसिक संवेदनशीलता आणि जीवनातील विविध अनुभवांचं जिवंत दस्तऐवज दिसून येतं. त्यांच्या लेखनामध्ये शब्द फक्त भाषेची रचना नसून, प्रत्येक ओळीत सत्याचा, अनुभवाचा आणि अंतर्मनाचा भार जाणवतो. साताऱ्याच्या ग्रामीण-सांस्कृतिक पार्श्वभूमीत वाढलेल्या संगीता अरबुने यांनी आपल्या लेखनामध्ये गावकुसातील साध्या माणसांचा स्वभाव, आनंद-दु:खाचे अनुभव, संघर्ष आणि वेदना यांच्या सजीवतेला स्थान दिलं आहे. गावातील मातीच्या सुगंधाची ओतप्रोत आठवण करून देणाऱ्या घराच्या स्वप्नांचा अनुभव त्यांच्या लेखनामध्ये स्पष्टपणे झळकतो. मात्र संगीता या केवळ गावातच थांबल्या नाहीत; B.Com. चे शिक्षण पूर्ण करून मुंबई आणि वसईसारख्या महानगरीय परिसरात वास्तव्यास आल्या. शहरातील या सगळ्या धावपळीचा, दगदगीचा, सामाजिक विविधतेचा अनुभव आणि कुटुंब व व्यक्तीगत अपेक्षा यांचा संगम त्यांच्या लेखनामध्ये अधिक स्पष्टपणे दिसून येतो. गावातील माती आणि महानगरातील आवाज यांचा समन्वय त्यांच्या शब्दांत सहज मिसळलेला आहे. संगीता अरबुने यांचे लेखन वाचनापासून सुरु झाले. विद्यार्थीदशेत कविता वाचताना त्यांना लेखनाची प्रेरणा मिळाली. पहिली कविता मैत्रीवर आधारित होती, जिच्यात मैत्रिणीच्या प्रेमाच्या भावनांचा सुंदर आणि प्रामाणिक प्रवाह होता. या पहिल्या कवितेमुळे लेखणीला बळकटी मिळाली आणि त्यांनी वाचनातून आणि अनुभवातून स्वतःच्या अंतर्मनाला आकार देण्याची सुरुवात केली. वाचन आणि अनुभवांचा संगम त्यांच्या लेखन प्रवासाला दिशा देणारा ठरला. त्यांनी केवळ शब्द लिहिले नाहीत, तर येणारे अनुभव, अंतर्मनातील खळबळ, समाज, जीवन आणि पडणारे अनेक प्रश्न यांचे सहजसुंदर पडसाद त्यांच्या लिखाणात पडलेले आहेत. संगीता अरबुने यांच्या कवितांचं मर्म म्हणजे त्यांच्या कवितांची निर्मिती प्रक्रिया, सामाजिक विषया संबंधातली त्यांची प्रतिक्रिया आणि प्रश्न विचारण्याची क्षमता. त्यांच्या कवितांना केवळ भावनात्मक उठाव दाखवायचा उद्देश नसतो, तर त्या वाचकाला विचार करायला, अस्वस्थ व्हायला आणि स्वतःच्या अंतर्मनात डोकावायला भाग पाडतात.
‘प्रतिबिंब’ या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहात आत्मपरीक्षण, स्त्रीमनाची अंतर्मुखता आणि सभोवतालच्या वास्तवाकडे पाहण्याची संवेदनशील दृष्टी स्पष्ट दिसते. हा कवितासंग्रह आपल्याला आपल्या अंतर्मनाच्या खोल स्तरावर घेऊन जातो. प्रत्येक ओळींत एक विचार, प्रश्न किंवा अनुभव दडलेला असतो. वाचक त्या ओळींच्या मागे स्वतःच्या भावनांचा शोध घेतो आणि स्वतःच्या आयुष्याच्या अनुभवाशी त्या जोडतो. या कवितांचा प्रभाव वाचकाच्या अंतर्मनावर दीर्घकाळ टिकतो, त्यामुळे त्या केवळ वाचनापुरत्या मर्यादित राहत नाहीत. ‘ओंजळीतलं चांदणं’ या दुसऱ्या कवितासंग्रहातील त्यांची कविता अधिक हळवी आणि भावनिक स्वरूपाची दिसते. नात्यांमधील सूक्ष्म ताणतणाव, प्रेमाची मिठास, आपुलकी आणि गमावलेल्या आठवणींचा ओलावा या संग्रहात प्रकर्षाने जाणवतो. वाचक त्या शब्दांत स्वतःच्या जीवनाचा अंश शोधतो आणि त्यातून त्यांच्याही जीवनाचा अनुभव अधिक समृद्ध होतो. ‘स्वतःला आरपार ओवताना’ हा संग्रह त्यांच्या कवितेतील एक निर्णायक टप्पा ठरतो. येथे स्त्री केवळ भावनिक नाही, तर ती सजग, आत्मभानाने उभी आणि स्वतःच्या प्रश्नांची उत्तर शोधणारी दिसते. ती स्वतःकडे स्वतःच्याच नजरेने पाहते, स्वतःचे प्रश्न स्वतःलाच विचारते आणि उत्तरांची जबाबदारीही स्वतःवर घेत असते. ही कविता अधिक निर्भीड, थेट आणि समाजाला समोर ठेवणारी आहे.
‘बायका झुळझुळत ठेवतात आयुष्याचा पदर’ या संग्रहात स्त्रीजीवनातील सूक्ष्म अनुभव, संघर्ष, प्रश्न, विरोध आणि स्वतःच्या स्थानासाठी ठाम उभे राहण्याची क्षमता स्पष्टपणे दिसून येते. या कवितांमध्ये स्त्री केवळ सहन करणारी नाही; ती जगते, झेलते, तडजोड करते आणि गरज पडल्यास संघर्ष करण्यास तयार असते. या कवितांमधून स्त्रीजीवनातील लहान वाटणाऱ्या पण खोलवर जखम करणाऱ्या अनुभवांना शब्द मिळतात, आणि वाचकाला त्या अनुभवांमध्ये स्वतःची ओळखही दिसते.
संगीता अरबुने यांच्या कथालेखनातही स्वतंत्र ओळख आहे. ‘चौकट’ या कथासंग्रहात समाजाने, कुटुंबाने आणि परंपरेने स्त्रीभोवती आखलेल्या चौकटींवर प्रकाश टाकला आहे. या कथांमध्ये केवळ घटनांचे वर्णन नाही, तर त्या चौकटीतील घुसमट, अपराधभावना, बंडखोरी आणि स्वतःला शोधण्याची धडपड त्या उलगडतात. या कथा वाचताना वाचक अस्वस्थ होतो कारण त्या आपल्या आजूबाजूच्या वास्तवाशी थेट भिडतो. कथांमधील पात्रे सामान्य वाटली तरी त्यांची अंतर्मनातील गुंतागुंत, प्रश्न विचारण्याची क्षमता आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध ही लेखिकेची खरी ताकद आहे.
ललित लेखन हा संगीता अरबुने यांच्या लेखन प्रवासातील अत्यंत जिव्हाळ्याचा भाग आहे. ‘मनीमानसी’ आणि ‘एकसोबीस हरीपत्ती लौंग आणि मी’ या ललित लेख संग्रहांतून जीवनातील साध्या क्षणांना, आठवणींना, नात्यांना आणि अनुभवांना अत्यंत तरल आणि प्रामाणिक भाषेत मांडले आहे. या लेखांमध्ये कुठेही कृत्रिमपणा नाही. त्या वाचकांशी गप्पा मारतात, कधी हसवतात, कधी अंतर्मुख करतात आणि नकळत जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. त्यांच्या ललित लेखनातील संवादशीलता, हृदयस्पर्शी अनुभव आणि जीवनविषयक सूक्ष्म निरीक्षण यामुळे वाचकाला जीवनाचे नवे अर्थ समजतात.
संगीता अरबुने यांचे लेखन वर्तमानपत्रे, नियतकालिके आणि विविध माध्यमांतून सातत्याने वाचकांपर्यंत पोहोचले आहे. लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, नवशक्ती, प्रहार यांसारख्या प्रमुख दैनिकांमध्ये तसेच मौज, लोकप्रभा, स्त्री, सामना, खेळ, कवितारती, उर्मी, साहित्य, साहित्य मैफिल, झपूर्झा, वाघुर, शब्द दरवळ, संवाद, चारचौघी, अधिष्ठान, रणांगण, ज्योत यांसारख्या साहित्यिक माध्यमांतून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. कविता, कथा, ललित लेख, वैचारिक लेख, पुस्तक परीक्षणे आणि मुलाखती अशा विविध प्रकारच्या लेखनातून त्यांनी वाचकांशी दीर्घकालीन संवाद साधला आहे. ‘वळणवाटा’, ‘मनीमानसी’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ आणि ‘शब्द फुलोरा’ यांसारख्या सदरांमधून त्यांनी जीवनातील वळणं, मानसिक आंदोलने, नातेसंबंधातील गुंतागुंत आणि स्त्रीजीवनातील सूक्ष्म अनुभव प्रभावीपणे मांडले. हे सदर लेखन वाचताना वाचकाला असे वाटते की ही लेखिका आपल्या आजूबाजूच्या जगाकडे अत्यंत सजग नजरेने पाहत आहे.
त्यांच्या साहित्यिक कार्याची दखल अनेक पुरस्कारांनी घेतली गेली आहे. पद्मश्री नारायण सुर्वे पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, इंदिरा संत पुरस्कार, शांता शेळके पुरस्कार, राणी लक्ष्मीबाई पुरस्कार, विमलताई देशमुख पुरस्कार, भगवंत देशमुख पुरस्कार, गुणवंत गौरव पुरस्कार आणि इतर अनेक सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. तथापि, पुरस्कारांपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे वाचकांचा विश्वास आणि प्रेम, जे त्यांच्या लेखनाचे खरे यश आहे.
संगीता अरबुने साहित्यिक व्यासपीठावरही सक्रिय आहेत. राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रित कवी संमेलनात पाच वेळा सहभाग, महानगर साहित्य संमेलने, विभागीय आणि महिला संमेलने, समरसता संमेलने आणि विविध परिसंवादांमध्ये सहभाग त्यांनी घेतला आहे. त्या केवळ कविता वाचत नाहीत, तर रसिकांशी थेट संवाद साधतात. आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांतून त्यांनी कविता, कथा आणि ललित लेखांचे सातत्यपूर्ण सादरीकरण केले. सह्याद्री वाहिनीवरील कवी संमेलने, साम टीव्हीवरील ‘अशी मी घडले’ आणि ‘सोशल मीडिया आणि समाज’ यांसारख्या कार्यक्रमांतून त्यांचा प्रभाव अधिक व्यापक झाला. संपादकीय आणि संघटनात्मक पातळीवरही त्यांनी मोठे योगदान दिले आहे. ‘कोकण दिनांक’ ‘लीलाई’, ‘कुसुमाकर’, ‘स्वेद’ यांसारख्या दिवाळी अंकांसाठी सहसंपादक म्हणून नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळवून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. कोकण मराठी साहित्य परिषद वसई शाखेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. दुसऱ्या अखिल भारतीय स्वकुळ साळी समाज साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्षपद भूषवताना त्यांनी संघटन कौशल्याचे दर्शन घडवले. ‘आम्ही मनमुक्ता’ या व्हॉट्सॲप समूह आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून त्यांनी साहित्यिक संवादाचे नवे दालन खुले केले. लॉकडाऊनसारख्या कठीण काळातही त्यांनी साहित्याची ज्योत विझू दिली नाही. विविध डिजिटल मंचांवरून त्यांनी कविता, साहित्य प्रवास, मुलाखती आणि चर्चासत्रे सादर केली. ‘झिम्माड’, ‘मुक्त सृजन’, ‘मराठी साहित्य वार्ता’, ‘विदर्भ वऱ्हाडी साहित्य प्रतिष्ठान’, ‘क कवितेचा’, ‘जे के मीडिया’, ‘सृजन साहित्य संघ’, ‘वाचकपीठ’ यांसारख्या उपक्रमांमधून त्यांनी साहित्य रसिकांशी सातत्याने नाते जपले. संगीता अरबुने यांचे साहित्य स्त्रीजीवनाचा आरसा आहे, पण ते केवळ वेदना दाखवत नाही. ते स्त्रीची ताकद, जिद्द, सर्जनशीलता आणि जगण्यातील सौंदर्यही व्यक्त करते. त्यांच्या लेखनात स्त्री केवळ दयनीय नसून, सजग, विचारशील आणि आत्मभानाने उभी असते. म्हणूनच त्यांचे लेखन केवळ स्त्रियांचे नसून सर्व संवेदनशील वाचकांचे आहे. समकालीन मराठी साहित्यप्रवाहात संगीता सुहास अरबुने यांचे स्थान केवळ लेखिका म्हणून नाही, तर साहित्याच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणाऱ्या सजग साहित्यिक म्हणून अत्यंत महत्त्वाचे आहे. शब्दांमधून जीवनाचा अर्थ शोधणारी, अनुभवांना प्रामाणिकपणे सामोरी जाणारी आणि समाजाशी संवाद साधणारी ही लेखनयात्रा पुढील काळातही अशीच समृद्ध होत राहो, हीच साहित्यप्रेमींची अपेक्षा आहे.
———————————————
संतोषजनक लेखणीतून….✍️
संतोष अवसरमोल (पत्रकार/लेखक)
मु+पो.घाटबोरी, ता. मेहकर, जि. बुलढाणा
मो:-9689777129



